(पॅन्क्रिज). शरीरातील एक महत्त्वाची ग्रंथी. सर्व पृष्ठवंशी प्राण्यांच्या शरीरात स्वादुपिंड ही ग्रंथी असते. मनुष्याच्या शरीरात ही ग्रंथी जठराच्या मागे, उदराच्या वर डाव्या बाजूला असते. प्रौढांमध्ये त्याची लांबी १२–१५ सेंमी. असून वजन सु. ८५ ग्रॅ. असते. शरीर खंडयुक्त व त्रिकोणाकृती असून रंग गुलाबी-पिवळा असतो. स्वादुपिंड ही विषमग्रंथी असून ती अंत:स्रावी तसेच बहि:स्रावी अशी दोन प्रकारची कार्ये करते. अंत:स्रावी ग्रंथी म्हणून कार्य करीत असताना ती रक्तातील ग्लुकोजची पातळी नियमित राखण्यासाठी इन्शुलीन, ग्लुकागॉन, सोमॅटोस्टॅटीन, पॉलिपेप्टाइडे इ. संप्रेरके स्रवते. बहि:स्रावी ग्रंथी म्हणून कार्य करताना ती पचनसंस्थेसाठी आद्यांत्रात पाचक स्राव स्रवते. या स्रावात बायकार्बोनेटे आणि विकरे असतात. बायकार्बोनेटामुळे जठरातून आद्यांत्रात आलेल्या जठरातील आम्लाचे उदासिनीकरण होते; विकरे अन्नातील कर्बोदके, प्रथिने, मेद यांचे पचन करतात.

स्वादुपिंड

स्वादुपिंड हा लहान आतड्याच्या सुरुवातीच्या कमानीच्या भागात (इंग्लिश सी (C) आकारात) आद्यांत्राला लागून असतो. आद्यांत्राला लागून असलेल्या स्वादुपिंडाच्या भागाला त्याचे ‘डोके’ म्हणतात. तो भाग तेथून डावीकडे निमुळता होत जाऊन प्लीहेला टेकलेला असतो. स्वादुपिंडाच्या प्लीहेला टेकलेल्या भागाला ‘शेपटी’ म्हणतात. स्वादुपिंडाचा सर्वांत मोठा भाग म्हणजे शरीर, जे जठराच्या मागे असते. स्वादुपिंडाच्या डोक्याभोवती दोन रक्तवाहिन्या असतात; आंत्रयोजी धमनी आणि प्रतिहारी शीर. स्वादुपिंडाला रक्तपुरवठा आंत्रयोजी धमनीच्या शाखांद्वारे होतो. स्वादुपिंडात वापरले गेलेले रक्त प्रतिहारी शिरेत उतरते. स्वादुपिंडाच्या प्लीहेकडील बाजूने मुख्य स्वादुपिंड वाहिनी (विरसंग वाहिनी) आणि दुसऱ्या बाजूकडून लहान सहायक स्वादुपिंड वाहिनी (सांतोरीनी वाहिनी) वाहत असतात. या वाहिन्यांतून स्वादुपिंडात उत्पन्न झालेला स्राव आद्यांत्राच्या लहान फुग्यासारख्या उंचवट्यात उतरतो. या भागाला ‘फाटर कुंभ’ म्हणतात.

स्वादुपिंडाला दोन प्रकारच्या चेतांचा पुरवठा होतो — (१) अनुकंपी चेतासंस्था आणि (२) परानुकंपी चेतासंस्था. या चेतांच्या उद्दीपनामुळे स्वादुपिंडाचा स्राव कमीअधिक होतो.

स्वादुपिंडामध्ये अंत:स्रावी तसेच बहि:स्रावी ग्रंथीचे कार्य करणाऱ्या वेगवेगळ्या ऊती असतात. सूक्ष्मदर्शीखाली त्यांच्यातील भेद ठळकपणे दिसून येतात. ज्या ऊती अंत:स्रावी म्हणून कार्य करतात, असे पेशीसमूह रंजकाचा वापर केल्यास फिकट रंगाचे दिसून येतात. त्यांना स्वादुपिंड द्वीपक किंवा लांगरहान्स द्वीपक म्हणतात. या द्वीपकांमध्ये आल्फा, बीटा, डेल्टा आणि गॅमा (पीपी पेशी) अशा चार प्रकारच्या पेशी असतात. प्रत्येक प्रकारच्या पेशी वेगवेगळी संप्रेरके स्रवतात. या पेशी स्वादुपिंडाच्या ठरावीक भागात असतात. उदा., आल्फा-पेशी ग्लुकागॉन स्रवतात; या पेशी द्वीपकाच्या कडांवर दिसून येतात. बीटा-पेशी इन्शुलीन स्रवतात; या पेशी द्वीपकाच्या मध्यभागी आढळतात. स्वादुपिंड द्वीपकांमध्ये सु. ३,००० स्रावी पेशी असतात. त्यांच्यात अनेक धमनिका व शीरिका असून त्यांच्याद्वारे स्रवलेली संप्रेरके रक्तप्रवाहात मिसळतात.

स्वादुपिंडाच्या अधिकतर बहि:स्रावी ऊती पचनक्रियेसाठी मदत करतात. या ऊती रंजक टाकल्यास गडद दिसतात. या पेशी गुच्छाने असून अनेक गुच्छ एकत्र आल्याने त्यांचे खंड बनलेले असतात. गुच्छांभोवती तंतुमय भित्तिका असून त्यांना रक्तवाहिन्या, लसीकावाहिन्या व चेता यांचा पुरवठा असतो. स्वादुपिंडाच्या गुच्छांपासून निघालेल्या अनेक सूक्ष्मवाहिन्यांपासून खंडवाहिनी बनतात व अनेक खंडवाहिन्या स्वादुपिंड वाहिनीत उतरतात. गुच्छातील पेशी ट्रिप्सिनोजेन नावाची अक्रियाशील पाचक विकरे स्रवतात. ही विकरे लहान गोळ्यांच्या स्वरूपात असतात, त्यांना पूर्वविकरे (झायमोजन) म्हणतात आणि ती बाहेरच्या सूक्ष्मवाहिन्यांमध्ये विसर्जित होतात.

स्वादुपिंडाचे कार्य : (१) रक्तातील ग्लुकोजचे नियमन : ग्लुकोजची पातळी नियमित राखणाऱ्या स्वादुपिंडाच्या पेशी लांगरहान्स द्वीपकात असतात. जेव्हा रक्तातील ग्लुकोजची पातळी (रक्तशर्करा) घटते, तेव्हा आल्फा-पेशी ग्लुकागॉन स्रवतात; त्यामुळे ग्लुकोजची पातळी वाढते. ग्लुकागॉनमुळे शरीरातील बिगर कर्बोदकांपासून (प्रथिने, मेद इ.) ग्लुकोज निर्मिती होते. तसेच यकृतातील ग्लायकोजेनचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते. जेव्हा रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते, तेव्हा बीटा-पेशी ग्लुकोजची पातळी कमी होण्यासाठी इन्शुलीन स्रवतात. इन्शुलीनमुळे पेशींद्वारे ग्लुकोज वापरले जाऊन ग्लुकोजची पातळी कमी होते. तसेच प्रथिने, मेद व कर्बोदके यांच्या निर्मितीला चालना मिळते. डेल्टा-पेशी सोमॅटोस्टॅटीन स्रवतात. त्यामुळे इन्शुलीन आणि ग्लुकोज, दोन्हींची पातळी कमी होते. या क्रिया स्वायत्त चेतासंस्थेद्वारे नियंत्रित होतात.

(२) पचनक्रिया : स्वादुपिंड दररोज १.५–३ लि. पाचक स्राव स्रवते. या स्रावाला रंग किंवा गंध नसतो. या स्रावात मुख्यत: विकरे असून ती आद्यांत्रात सोडली जातात. जठरातून अन्न याच भागात येते. ही विकरे कर्बोदके, प्रथिने व मेद यांचे पचन होण्यास मदत करतात. अन्न खायला सुरुवात केल्याबरोबर स्वादुपिंडाला चेतासंस्थेकडून मिळालेल्या उद्दीपनामुळे स्वादुपिंडाच्या पेशींचा स्राव वाढतो. हा स्राव पेशीगुच्छांमधून वाहत जाऊन स्वादुपिंड वाहिनीत पूर्वविकरांच्या स्वरूपात जमा होतो व तेथून आद्यात्रांत येतो. येथे ‘एंटेरोकायनेझ’ विकरांची क्रिया झाल्यामुळे हा स्राव क्रियाशील बनतो. यात तीन प्रकारची विकरे असतात. त्यांपैकी एका प्रकारच्या विकरांना ‘ट्रिप्सीन’ म्हणतात. स्वादुपिंडात त्यांचे स्वरूप वर उल्लेखलेल्या ‘ट्रिप्सिनोजेन’ या पूर्वविकराचे असून आद्यांत्रात आल्यावर त्याचे रूपांतर ‘ट्रिप्सीन’ मध्ये होते. ही विकरे प्रथिनांचे विघटन व पचन करतात. प्रथिनांचे विघटन होऊन ‘पॉलिपेप्टाइडे’ बनतात आणि त्यांचे पेप्टाइड व अखेर ॲमिनो आम्ले यांच्यात रूपांतर होते. ही ॲमिनो आम्ले रक्तात शोषली जातात. याशिवाय स्वादुपिंडात ‘कायमोट्रिप्सीन’ आणि ‘कार्बॉक्सीपेप्टिडेज’ ही दोन विकरे असतात. त्यांची क्रिया ट्रिप्सीनच्या कार्याला पोषक असते. काही कारणांनी विकरांचे प्रमाण घटल्यास प्रथिनांचे पचन नीट होत नाही.

स्वादुपिंडातून स्रवलेल्या लायपेज विकराद्वारे मेद पदार्थांचे पचन घडून येते. यात मेदांचे विघटन होऊन ग्लिसरीन व मेदाम्ले तयार होतात आणि ती लसीकेवाटे शोषली जातात. याशिवाय अमायलेज विकरे ही स्टार्च व कर्बोदके यांचे पचन करतात. यातून बनलेले ग्लुकोज रक्तात शोषले जाते. स्वादुपिंडाच्या स्रावात बायकार्बोनेटांचे प्रमाण पुष्कळ असून फॉस्फेटे, क्लोराइडे इ. असतात. बायकार्बोनेटामुळे स्रावाचा सामू अल्कधर्मी राहतो. त्यामुळे विकरांच्या क्रिया प्रभावीपणे होतात आणि जठरातील आम्लाचे आद्यांत्रात पोहोचण्याआधी उदासिनीकरण होते. ही विकरे भ्रमण चेतेद्वारे होणाऱ्या उद्दीपनाच्या तसेच सिक्रिटीन, कोलेसिस्टोकोनीन, ॲसिटील कोलीन इ. संप्रेरकांच्या प्रभावामुळे स्रवली जातात. जठराच्या आम्लाद्वारे आद्यांत्रातील (विशिष्ट) श्लेष्मल पेशींवर परिणाम होऊन सिक्रिटीन स्रवते. ते रक्तात शोषले जाऊन रक्तामार्गे स्वादुपिंडात पोहोचल्यावर तेथील पेशींचा स्राव वाढतो.

विकार : स्वादुपिंडाच्या शोथाला (सूजेला) स्वादुपिंडशोथ म्हणतात. जी व्यक्ती मद्यप्राशन करते किंवा ज्यांच्या शरीरात पित्तखडे असतात, त्यांना हा विकार होऊ शकतो. पोटावर जोराने मार बसल्यास किंवा अंत:दर्शी (एंडोस्कोपी) करताना, शस्त्रक्रिया करताना अथवा औषधांचा परिणाम झाल्यास हा विकार उद्भवू शकतो. तीव्र स्वादुपिंडशोथामुळे पोटात भयंकर वेदना होतात, उलट्या होतात किंवा अन्नावरची वासना उडते. काही वेळा स्वादुपिंडाचा रक्तस्राव होऊन त्याचे परिणाम पूर्ण शरीरावर दिसतात. कुसेवर किंवा बेंबीच्या खाली जखमा होतात. स्रावातील विकरे स्वादुपिंडाच्या ऊतींची हानी करतात. रक्ताची चाचणी केल्यास रक्तात अमायलेज आणि लायपेज ही विकरे आढळतात. सोनोग्राफी किंवा संगणीकृत छेदचित्रण (सीटी स्कॅन) केल्यास स्वादुपिंडशोथाचे निदान होते. या रोगावर उपचार करताना शिरेतून लवणद्राव (सलाइन) देतात, तसेच रक्तप्रथिनेही देतात. वेदना कमी होण्यासाठी वेदनाशामके देतात. संक्रामण होऊ नये म्हणून प्रतिजैविके देतात. तसेच एसीटीएच (ॲडिनोकॉर्टिकोट्रॉपिक) व कॉर्टिसोन या औषधांचा वापर करतात.

स्वादुपिंडाचा कर्करोग असाध्य मानला जातो. सामान्यपणे ४०–७० या वयाच्या दरम्यान स्वादुपिंडाचा कर्करोग होऊ शकतो. पोटदुखी, कावीळ, वजन कमी होणे ही प्राथमिक लक्षणे दिसतात. स्वादुपिंडशोथ, वार्धक्य, धूम्रपान, लठ्ठपणा, मधुमेह इ. बाबी स्वादुपिंडाच्या कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतात. याची लक्षणे उशिरा दिसत असल्याने त्यावर शस्त्रक्रिया करता येत नाही.