ख्रिस्ती समूह एक आध्यात्मिक वास्तव असला, तरी ख्रिस्ती माणसांचे जीवन ऐहिक जगात नात्यांच्या धाग्यादोऱ्यांनी विणलेले असते. ख्रिस्ती माणसांच्या शेजारी निरनिराळ्या धर्मांची किंवा कुठलाही धर्म न पाळणारी व्यक्ती असतात. जगात वावरताना कोणत्या ना कोणत्या कारणाने अनेक धर्मांच्या व्यक्तींशी संबंध येत असतो. जगात शांती, सलोखा आणि समेट येण्यासाठी हे संबंध जोपासणे, वृद्धिंगत करणे व एकमेकांचे जीवन सुकर करणे फारच महत्त्वाचे आहे. म्हणून चर्च तिच्या सर्व घटकांना अन्य धर्मीयांशी विधायक, सकारात्मक व मैत्रीचे संबंध ठेवण्याचा सल्ला देते. परिस्थिती व बदलत्या वास्तवाला धरून वादविवाद करण्यास, मूलभूत तत्त्वांशी निष्ठा राखून, व्यापारी किंवा राजकारणी मानसिकता वर्ज्य मानून स्नेह-सोबतीचा हात पुढे करण्यासाठी प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला प्रोत्साहन देते. मतभेदातसुद्धा एकत्र राहून, नेहमी सत्याची कास धरून, मैत्रीचे पूल बांधून, सर्वांना एकत्रित करून जगातील शांती टिकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत राहण्यासाठी चर्च ख्रिस्ती बांधवांना आवर्जून उपदेश करते.
धर्म हे पोकळीत जगत नसतात. अंतर्यामातील आणि सद्सद्विवेकाशी प्रामाणिक राहून प्रत्येक व्यक्ती आपले धार्मिक जीवन जगत असते व आपापल्या जीवनाला अर्थ देत असते. बहुधर्मीय समाज अशा निरनिराळ्या व्यक्तींचा बनलेला असतो. अशा बहुधर्मीय, बहुआयामी व बहुसंस्कृतीने नटलेल्या समाजात परस्परांमध्ये मैत्रीचे, स्नेहाचे, समेटाचे, परोपकाराचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील असावे, असा बोध चर्च ख्रिस्ती लोकांना करते; ही प्रत्येक श्रद्धावंताने स्वीकारलेली जबाबदारी आहे. अत्युच्च पदावर असलेल्यांपासून ते अगदी तळागाळातील ख्रिस्ती व्यक्ती या जबाबदारीला बांधील असले पाहिजे, हा चर्चचा हेतू असतो.
१९६२ ते १९६५ या कालावधीत रोम येथे संपन्न झालेल्या व्हॅटिकन दुसऱ्या परिषदेने छोटेखानी जाहीरनामा प्रसिद्ध करून अन्य धर्मीयांशी सुसंवाद करण्यासाठी मार्गदर्शन आणि चालना दिली. त्या लहानशा रोपट्याचा आता वटवृक्ष झालेला आपल्याला दिसून येतो.
समाजातील सर्वधर्मीय व्यक्तींना सुसंवादात सामील करून जिच्या-तिच्या धार्मिक तत्त्वांशी एकनिष्ठ राहून एकमेकांच्या सहकार्याने शांती, समेट, सलोख्याचे संबंध रुजवून पुढे येणाऱ्या पिढ्यांसाठी परस्पर आदरांची संस्कृती तयार होऊ शकते. हे होणे फार गरजेचे आहे; कारण मुळात आपण सर्व एकाच देवाची अपत्ये आहोत व आपणामध्ये जात्याच बंधुत्वाची नाती आहेत, असे चर्च मानते.
निर्माणकर्त्या परमेश्वराने प्रत्येक व्यक्ती त्याच्या रूपात आणि प्रतिमेत घडविली आहे, असे ख्रिस्ती श्रद्धा ठासून सांगते. तेथून प्रत्येक व्यक्तीला मान-प्रतिष्ठा प्राप्त होते. प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्यात जगते व त्या व्यक्तीची देवधर्मावरील श्रद्धा त्या स्वातंत्र्यातून उगम पावते. म्हणून प्रत्येक व्यक्तीचे मूल्य या ऐहिक जीवनापलीकडे झेप घेते; ऐहिक जगापलीकडील सत्याच्या शोधातून प्रत्येक व्यक्ती स्वत:ला अलौकिक मूल्य प्राप्त करून देते. येथे अन्यधर्मीय सुसंवादाचा पाया व मूळ आहे. अंतिम सत्याला झुगारून देऊन सुसंवाद संपन्न होऊ शकत नाही. ‘सत्यस्य सत्यम्’ बाहेर ठेवल्याने सुसंवादाला अर्थ नसतो. काल्पनिक उद्दिष्टापेक्षा वास्तव परिस्थितीला धरून संवाद साधायचा असतो. धर्माधर्मांतील फरक जाणून घेतल्याने व त्या फरकांना आदराने पाहिल्यावर धर्माधर्मांतील संवाद सुफळ बनतो. संवादात सहभागी झालेल्या व्यक्तींवर ‘ती व्यक्ती या धर्माची म्हणून अशीच किंवा तशीच’ अशा पूर्वग्रहाने संवाद फलदायक होत नसतो. वास्तवाला धरून, जरी परिस्थिती प्रतिकूल किंवा कितीही विवाद्य किंवा कठीण असली तरी, सुसंवाद सोडायचा नसतो. गैरसमज, अविश्वास किंवा विरोध यांवर मात करून सुसंवाद सफल करायचा असतो. संवादातील सहभागीदारीत व्यक्तीला प्रेरित करायचे असते, प्रवृत्त करायचे असते. मैत्रीत जगण्याची जणू एक भाषा तयार करून एकमेकांना समजून घ्यायचे असते व परस्परांतील संवादाला संभाषणाची जोड दिली जाणे महत्त्वाचे ठरते. याचे एक उत्तम उदाहरण खालीलप्रमाणे सांगता येईल :
ख्रिश्चन-मुस्लीम धर्मीयांमध्ये सु. ७०० वर्षांपूर्वी धर्मयुद्ध शिगेला पोहचले असताना तेराव्या शतकातील असिसीचे महान संत फ्रान्सिस हे धाडस करून इटलीहून ईजिप्तला गेले. ते त्यांचे स्वप्न होते. सर्वांच्या दृष्टिकोणातून ती एक अशक्य अशीच गोष्ट नव्हती, तर कोणी वेडेपणा केल्याचे लक्षण मानले जात असे. मुस्लिमांच्या छावणीत संत फ्रान्सिस यांनी प्रवेश केला. अनेक वर्षे धार्मिक युद्ध जिंकण्यासाठी द्वेष आणि घृणा ख्रिश्चनांच्या मनात भरविली गेली असल्याची पूर्ण जाणीव मुस्लिमांना होती. ख्रिश्चनांचा सूड घेण्यासाठी त्यांनी संत फ्रान्सिस यांचा अमानुष छळ केला असता अशी परिस्थिती होती; कारण ते शत्रूच्या गटातील होते असे मुस्लिमांना वाटणे योग्यच होते. परंतु संत फ्रान्सिस अन्य धर्मीयांशी सुसंवाद करणारी व्यक्ती होती. ते अंतर्बाह्य शांतीने ओतप्रोत भरलेले होते. त्यांच्याकडे शस्त्रास्त्रे तर नव्हतीच, परंतु हातात जपमाळेशिवाय दुसरे काहीच नव्हते. युद्धरेषा पार करून; स्मित हास्य करून त्यांनी सुलतानाला भेटण्याची नम्र विनंती केली. दामियनाचा मालिक अल कामिल याने संत फ्रान्सिस यांचे स्वागत करून त्यांचा अनेक दिवस पाहुणचार केला. सुलतानाशी पडलेल्या गाठीमुळे भारावून जाऊन संत फ्रान्सिस सुखरूप मायदेशी परतले. त्यांच्यासाठी व त्यांच्या आजपर्यंत जगात असलेल्या हजारो अनुयायांसाठी संत फ्रान्सिस यांनी नवीन आणि सर्जनशील दृष्टीने सुसंवादाच्या जीवनाची दिशा आखली.
सर्वांशी सुसंवाद ही संकल्पना ख्रिस्ती श्रद्धेच्या गाभ्यातच मुळावली आहे. सुसंवादाची प्रक्रिया म्हणजे धर्मपालन फक्त मानवी मेंदूचेच (अकलेचे) कार्य नाही. परस्परसंबंध जोडणे, जोपासणे, वाढविणे म्हणजे सुसंवादात जगणे. संबंध जोडणे व टिकविणे अतिशय नाजूक बाब असते. धर्माधर्मांतील व्यक्तींमध्ये सामान्य ते काय ते शोधून सुसंवादाला सुरुवात होणे महत्त्वाचे आहे. ‘आमच्यात फरक काय?’ यापेक्षा ‘आम्हा सर्वांना एकत्र आणणारे ते काय?’, ‘सार्वजनिक हिताचे ते काय?’ असे प्रश्न संवाद सुरू करण्यासाठी अपरिहार्य ठरतात. चर्चा, परस्परांत विश्वास आणि सलोखा निर्माण करणारे विषय सुसंवादाला अनुकूल ठरतात, हा अनुभव आहे. स्वधर्माची अस्मिता सुसंवादात सहभागीदार असलेल्या व्यक्तीला हिणविण्यासाठी, तिचा अवमान करण्यासाठी कदापि नसावी.
सुसंवादाचा उगम डावपेच, स्वकीय आवडी-निवडीची बाब संबंधित कदापि नसते. सुसंवाद एक अध्यात्म आहे. सर्वधर्मसुसंवादाचा हेतू ‘फक्त माझाच धर्म महान’ असा नसावा. आजच्या युगात स्वत:चा धर्म जगला, तर सर्व धर्म जगतील. स्वत:चा धर्म नाश पावला, तर सर्व धर्म नाश पावतील. म्हणून प्रत्येक व्यक्तीने निवडलेल्या धार्मिक अंगाचे संरक्षण होणे जरूरीचे आहे. हीच शिकवण ख्रिस्ती लोकांना चर्च आज देते व तसे जगण्यासाठी व इतरांना जगू देण्यासाठी प्रोत्साहित करते.
संदर्भ :
- Dias, Mario Saturnino, Ed., Evangelization in the light of Ecclesia In Asia, Bangalore, 2003.
- Flanery, Austin, Vatican Council II : Post Conciliar Documents, Vols. 1 & 2, Mumbai, 2014.
समीक्षक : फ्रान्सिस कोरिया