राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी) ही संस्था नवी दिल्लीच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) सदतीस प्रयोगशाळांपैकी एक असून तिचे मुख्यालय गोव्यातील दोना पावला येथे आहे. ‘एनआयओʼ या इंग्रजी आद्याक्षरांनीही ही संस्था ओळखली जाते. कोची, मुंबई आणि विशाखापट्टणम येथे या संस्थेची प्रादेशिक केंद्रे आहेत.
आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमधून हिंदी महासागराचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी पहिली आंतरराष्ट्रीय हिंदी महासागर मोहीम काढण्यात आली (१९५९-६५). भारताचा या मोहिमेत सहभाग होता. या मोहिमेनंतर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान या संस्थेची स्थापना १ जानेवारी १९६६ रोजी झाली. हिंदी महासागराचे विस्तृत व व्यापक संशोधन करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश असून संस्थेला समुद्र विज्ञान या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली आहे. संस्थेच्या गोव्यातील मुख्यालयात, तसेच प्रादेशिक केंद्रांवर अनेक अत्याधुनिक प्रयोगशाळा आहेत. तसेच संस्थेकडे बहुविद्याशाखीय निरीक्षणासाठी सुसज्ज अशा आरव्ही सिंधू संकल्प आणि आरव्ही सिंधू साधना या दोन संशोधन नौका आहेत. समुद्र विज्ञानाच्या जैविक, रासायनिक, भूवैज्ञानिक आणि भूभौतिकीय या पारंपरिक शाखांखेरीज संस्थेत सागरी पुरातत्त्व ही महत्त्वाची शाखा आहे.
भारतात अधोजल पुरातत्त्वीय संशोधनाची सुरुवात एस. आर. राव (१९२२–२०१३) यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणातून निवृत्त झाल्यानंतर केली (१९८१). या शाखेने भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर अनेक ठिकाणी सर्वेक्षण व उत्खनन केलेले आहे. अधोजल पुरातत्त्वाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या स्थळांमध्ये द्वारका, बेट द्वारका, पुम्पुहार व महाबलीपुरम, कोडिनार, सोमनाथ, विजयदुर्ग आणि घारापुरी (एलिफंटा) यांचा समावेश होतो. तसेच सागरी पुरातत्त्व शाखेतील पुरातत्त्वज्ञांनी गोवा, ओडिशा व लक्षद्वीप या भागांमध्ये जहाजबुडीचे पुरातत्त्वीय संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत.
संदर्भ :
- Tripati, Sila, An Overview of Shipwreck Explorations in Indian Waters, Shipwrecks around the World (Ed., Tripati, Sila), pp. 783-810, Delta Bookworld, Delhi, 2015.
- https://www.nio.org/about_nio/general-information/nio-at-a-glance
समीक्षक : शंतनू वैद्य