इसवी सन १९६० च्या दरम्यान लॅटिन अमेरिकेत एका वैचारिक क्रांतीची पहाट झाली. कार्ल मार्क्स यांच्या विश्लेषण पद्धतीचा आधार घेऊन विद्यापीठांतील प्राध्यापक, धर्मगुरूंना प्रशिक्षण देणारे धर्मपंडित आणि त्यांचे विद्यार्थी यांनी सामाजिक विश्लेषणाच्या प्रक्रियेला सुरुवात केली. लॅटिन अमेरिका या खंडातील प्रचंड विषमता, दारिद्र्य, बेरोजगारी या वस्तुस्थितीचा त्यांनी अभ्यास केला. दुसऱ्या बाजूने त्यांनी गोरगरिबांच्या नजरेतून बायबलचा अन्वयार्थ लावण्यास सुरुवात केली. ‘नव्या करारा’त प्रभू येशू ख्रिस्त यांनी शोषितांच्या बाजूने स्पष्ट भूमिका घेतली आहे, असे त्यांना दिसून आले.
नवीन संदर्भ लाभल्यामुळे बायबलच्या वाचनाला आणि ख्रिस्ती धर्माला नवा आयाम मिळाला. एका हाती कार्ल मार्क्स यांचे दास कॅपिटल आणि दुसऱ्या हाती बायबल घेऊन धर्मपंडित चर्चा करू लागले. त्यात प्रामुख्याने जे. बी. मेट्ज, गुस्ताव्हो गूत्येर्रेज, ज्युआन लूईस सेगुंडो, एल्सा तामेझ, जोस मिगेज-बोनिनी, लिओनार्डो बॉफ, अर्नेस्टो कार्डेनाल ही काही आघाडीची नावे आहेत. व्हॅटिकन धर्मपीठाची मुक्तिवादी तत्त्वमीमांसेला (Liberation Theology) तत्त्वत: मान्यता होती; परंतु काही विचारवंतांना कार्ल मार्क्स हेच मसीहा वाटू लागले. काहींनी न्याय मिळविण्यासाठी प्रत्यक्षाप्रत्यक्ष हिंसाचाराचे समर्थन सुरू केले, तर काहींनी (विशेषत: लिओनार्डो बॉफ यांनी) चर्चच्या अधिकारालाच आव्हान दिले, तेव्हा चर्चने त्यांना समज दिली.
इसवी सन १९८० च्या दरम्यान मुक्तिवादी तत्त्वमीमांसेचे दुसरे पर्व सुरू झाले. मुक्तीचा विचार विद्यापीठांतून आणि मध्यमवर्गीय विचारवंतांकडून गल्लीबोळांत आणि खेड्यापाड्यांत पोहोचला. गोरगरिबांचे शेकडो गावगट अस्तित्वात आले. हे उपेक्षित लोक हाती बायबल घेऊन परिस्थितीचे विश्लेषण करू लागले. हळूहळू मुक्तिवादी तत्त्वमीमांसेचा झंझावात आफ्रिका आणि आशिया या खंडांप्रमाणेच यूरोप-अमेरिकेतही पोहोचला आणि प्रस्थापितांविरुद्ध एक फळी उभी राहिली. भारतातील ख्रिस्ती दलित, जपानमधील पुराकुमीन, अमेरिकेतील रेड इंडियन्स, न्यूझीलंडमधील माओरी या आदिवासी जमाती, वर्णवर्चस्वाला बळी पडलेल्या आफ्रिकेतील जमाती, फिलिपीन्समधील लष्करशहा फर्निनंड मार्कोस यांचे विरोधक, पोलंडमधील सॉलिडॅरिटीचे समर्थक आदींना लढण्यासाठी वैचारिक हत्यार मिळाले.
बर्मिंगहॅम विद्यापीठातील बायबलचे गाढे अभ्यासक आर. एस. सुगिर्थराजा या लेखकांनी द बायबल अँड थर्ड वर्ल्ड (२००१) या ग्रंथात मुक्तिवादी तत्त्वमीमांसेची मांडणी पुढीलप्रमाणे केली आहे : दारिद्र्यनिर्मूलन हा मुक्तिवादी तत्त्वमीमांसा चळवळीचा प्रमुख कार्यक्रम आहे. त्या दृष्टिकोणातून बायबलचे वाचन केले जाते. वास्तव हे अविभाज्य असून वर्तमानकाळातील घटितांमधून देव कार्यरत आहे. त्याने गोरगरिबांच्या बाजूने पसंतीचा कौल दिला आहे (Preferential option for the poor). म्हणून समाजातील दुर्बल घटकाला केंद्रस्थानी ठेवून बायबलच्या वचनांचा अन्वयार्थ लावला पाहिजे. या चळवळीतील कार्यकर्त्यांना कोरड्या तात्त्विक चर्चेपेक्षा लोकांच्या ज्वलंत समस्यांमध्ये अधिक रस असतो. मुक्तिवादी तत्त्वमीमांसेमध्ये तटस्थ भूमिकेला स्थान नसते. शोषितांची बाजू घेऊनच उभे राहावे लागते आणि त्याच भूमिकेतून बायबलचे वाचन करावे लागते.
प्रथम प्राप्त परिस्थितीचे सर्वांगीण विश्लेषण केले जाते. त्यानंतर शुभवर्तमानातील पाठ वाचला जातो. पाठाचा अर्थ आजच्या परिस्थितीच्या संदर्भात शोधला जातो आणि त्यानुसार भूमिका घेऊन कृती केली जाते. उदा., संत लूक यांच्या शुभवर्तमानात संवेदनाशून्य धनवान मनुष्य आणि दरिद्री लाझरस याची दृष्टांतकथा येशू ख्रिस्त यांनी सांगितली आहे. त्या कथेतील ऐषारामी धनवान मनुष्य नरकात जातो आणि गरीब लाझरस स्वर्गात जातो, असे त्यांनी सांगितले आहे. येशू ख्रिस्त यांनी श्रीमंत आणि गरीब यांच्या संदर्भात घेतलेली ही स्पष्ट भूमिका होती.
सामाजिक जाणिवा बधिर झालेल्या श्रीमंतांना येशू ख्रिस्त यांनी धारेवर धरले, ही गोष्ट खरी आहे. धनसंचयामुळे फसवी सुरक्षितता वाटू लागते, मनुष्य आत्मकेंद्रित होऊ शकतो आणि परिणामत: तो आपल्या अंतिम भल्याला मुकू शकतो, असा इशारा त्यांनी दिला. मात्र त्यांनी कधीही श्रीमंतांचा द्वेष केला नाही. उदा., भ्रष्टाचारी झाकेयसला त्यांनी पश्चात्तापाची संधी दिली आणि झाकेयसने अन्यायाने मिळविलेल्या संपत्तीबद्दल चौपट भरपाई करण्याची तयारी दाखविली, तेव्हा त्यांनी त्याला देवराज्याचे नागरिकत्व बहाल केले, ही गोष्ट नजरेआड करता येत नाही.
बायबलचे परिस्थितीसापेक्ष वाचन : मुक्तिवादी तत्त्वमीमांसा तत्त्वचर्चेच्या पायरीवर होती. सुशिक्षित मध्यमवर्ग या विचाराने भारावून गेला होता. ‘शोषक आणि शोषित’ या नजरेतून ते बायबलचे वाचन करीत होते. धर्मग्रंथातील वचनांचे निव्वळ वाचन पुरेसे नाही, तर आजच्या वास्तव जीवनाशी त्या वचनांचे नाते जोडले पाहिजे. त्यासाठी आपण बायबलचे परिस्थितीसापेक्ष वाचन केले पाहिजे, असे उच्चशिक्षितांना आणि मध्यमवर्गीयांना वाटू लागले. उदा., येशू ख्रिस्त यांनी आंधळ्यांना दृष्टिदान दिले, अशी कथा बायबलमध्ये आहे. हा पाठ वाचल्यावर आज समाजात कुठे आंधळेपणा म्हणजे असंवेदना, अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचार आढळतो, त्याचा शोध घेतला जाऊ लागला आणि तो घालविण्यासाठी उपाय सूचविले जाऊ लागले. ‘संहितेतून संदर्भाकडे’ असा हा प्रकार आहे.
‘संदर्भातून संहितेकडे’ हा यापुढचा प्रकार आहे. या प्रकारात आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे प्रथम अवलोकन आणि विश्लेषण केले जाते. त्यानंतर बायबलमधील एखाद्या समर्पक पाठाचे वाचन केले जाते. प्राप्त परिस्थितीचे प्रतिबिंब त्या पाठात कसे पडले आहे, याचा अभ्यास केला जातो आणि सुयोग्य निर्णय घेऊन कृती केली जाते. ‘जीवनातून बायबलकडे जाणे’ अशी ही पद्धत आहे.
लॅटिन अमेरिकेतील निकाराग्वा देशातील सॉलेन्टिनामे या गावात या प्रयोगाची सुरुवात झाली, तेव्हा त्या देशात जनरल आनास्तास्यो सोमोसा याचा लष्करी अंमल सुरू होता. त्याच्या जाचाला लोक कंटाळले होते. समाजात प्रचंड असंतोष होता. सॉलेन्टिनामे गावात ९० शेतकरी दर आठवड्याला भेटत असत. ते प्रथम देशात घडणाऱ्या घटनांचा आढावा घेत. तो संदर्भ लक्षात ठेवून ते बायबलचे सामुदायिक वाचन करीत आणि प्राप्त परिस्थितीत त्या वाचनातून उत्तर शोधीत असत. विचारमंथन करणाऱ्या या गटाने सामाजिक संदर्भाची नाळ बायबलच्या संहितेबरोबर जोडली. त्यामुळे येशू ख्रिस्त यांच्या काळी पॅलेस्टाइनवर राज्य करणारा जुलमी राजा हेरोद याच्या जागी त्यांना हुकूमशहा सोमोसा दिसू लागला. चे गव्हेरा, ॲलेंदे आणि कामिल्लो टोरेस हे त्यांना आधुनिक मोझेस वाटू लागले. त्यांच्यासाठी बायबल हा केवळ धार्मिकता जपणारा ग्रंथ न राहता आधुनिक प्रतिकूल परिस्थितीत बदल करण्याची क्षमता असलेली ती संहिता ठरली.
वरवरची मलमपट्टी न करता दुखण्याचे मूळ शोधून त्यावर जालीम उपाय कसा करावा, या दृष्टिकोणातून बायबलच्या संहितेचा अभ्यास होऊ लागला. उदा., ‘तुमच्याकडे दोन सदरे असतील, तर एक गरिबाला द्या’ असे वचन ‘नव्या करारा’त संत मॅथ्यू यांच्या शुभवर्तमानात आहे. त्यानुसार लोक दानधर्म करीत होते. सॉलेन्टिनामे गटाने मुद्दा उपस्थित केला की, गरिबाला एक सदरा देऊन प्रश्न सुटणार नाही, तर जी व्यवस्था काहींना भरपूर सदरे देते आणि इतरांना एकही मिळू देत नाही, ती व्यवस्था बदलणे जरुरीचे आहे.
समस्येच्या मुळाशी जाणे आवश्यक असते, हा विचार स्तुत्य आहे; परंतु काही व्यक्तींची बायबलमधील खलनायकांबरोबर आणि आपली स्वत:ची सज्जनांबरोबर तुलना करण्याचा हा प्रकार दांभिकता जोपासणारा होता. बायबलकालीन परिस्थिती आणि घटना यांची सांप्रत काळाशी तुलना होऊ शकत नाही, असा इशारा टीकाकारांनी दिला. तसेच परिस्थिती व्यामिश्र असून ती सातत्याने बदलत जाते. देश, प्रांतनिहाय ती गुंतागुंतीची असते. काहीजण नायक आणि दुसरे खलनायक ही विभागणी अन्यायकारक असू शकते. त्यासाठी व्यवस्थेमधील दोष दूर करण्यावर भर दिला पाहिजे.
मुक्तिवादी तत्त्वज्ञानाचे मर्म लॅटिन अमेरिकेतील धर्मपंडित जॉन सोब्रिनो यांनी द इंटरनॅशनल बायबल कॉमेंटरी या ग्रंथातील एका लेखात तर्कसंगतपणे स्पष्ट केले आहे. त्यांनी मांडलेली भूमिका अशी : सर्व प्रकारच्या जुलमी व्यवस्था आणि व्यक्ती यांच्यापासून मानवाची मुक्ती करणे, हे बायबलचे उद्दिष्ट आहे. दारिद्र्य आणि सर्वंकष सत्ता हे मानवाचे मोठे शत्रू आहेत. मानवाला छळणाऱ्या या व्यवस्थेविरुद्ध ‘जुन्या करारा’त मोझेस व संदेष्टे आणि ‘नव्या करारा’त येशू ख्रिस्त यांनी संघर्ष करून लोकांना मुक्ती मिळवून दिली होती. ही मुक्ती आत्मिक तसेच सामाजिक आणि राजकीय स्वरूपाची होती. या संघर्षात लढणाऱ्या मानवांबरोबर देव होता.
‘‘मोझेस यांनी देवाच्या मदतीने आपल्या लोकांना गुलामगिरीतून स्वातंत्र्याकडे नेले, तर ‘नव्या करारा’त येशू ख्रिस्त यांनी गोरगरिबांच्या बाजूने पसंतीचा कौल दिला आणि सर्व मानवतेला मुक्तीचा मार्ग दाखविला. आज अनेक देशांत दारिद्र्याने थैमान घातले आहे. माणसाला मूलभूत गरजा, प्रतिष्ठा आणि हक्क नाकारण्यात येत आहेत. दोन तृतीयांश मानवता दारिद्र्याच्या आणि शोषणाच्या क्रूसावर तळमळत आहे. तिला क्रूसावरून उतरविणे हेच मुक्तीच्या लढ्याचे उद्दिष्ट आहे’’.
कोलंबियातील मेडलीन येथे कॅथलिक धर्माचार्यांची १९६८ साली परिषद झाली. तिच्यात सांगण्यात आले की, ‘‘कुठूनही मुक्तीची शक्यता नसल्यामुळे ती मिळविण्यासाठी लाखो लोकांचा मूक आक्रोश आपल्या धर्मगुरूंना साकडे घालीत आहे’’. ही मुक्ती समग्र आणि अविभाज्य आहे. ज्या ज्या गोष्टी माणसाचे शोषण करतात आणि त्याचे आत्मिक व भौतिक स्वातंत्र्य हिरावून घेऊन त्याला गुलाम करतात, त्यांच्याविरुद्ध लढा द्यावा लागतो. आत्ममुक्ती आणि समाजमुक्ती असे मुक्तीच्या लढ्याचे दुहेरी स्वरूप आहे. षड्रिपूंशी झगडून माणूस आत्मिक स्वातंत्र्य मिळवू शकतो; परंतु हे स्वातंत्र्य स्वान्तसुखाय नाही, तर समाजाला अन्यायी व्यवस्थेपासून मुक्त करण्यासाठी घेतलेली ही दीक्षा आहे. मुक्तीचे हे सामाजिक अंग आहे आणि ते मुक्तीच्या तत्त्वज्ञानाचे वैशिष्ट्य आहे. गुस्ताव्हो गूत्येर्रेज, जॉन सोब्रिनो, एल्सा तामेझ, जे. बी. मेट्ज आदी ख्रिस्ती विचारवंत आणि शोषणाचे बळी ठरलेले सामान्य लोक बायबलमध्ये असलेल्या समग्र मुक्तीच्या बीजांचा शोध घेत आहेत. मुक्तिवादी तत्त्वमीमांसा हे अन्याय, अत्याचार, जुलूम आणि दारिद्र्य यांच्या विरुद्ध लढण्यास प्रेरणा देत शोषितांना मुक्तीची वाट दाखवून त्यांच्या विकासाची प्रक्रिया सुकर करीत आहे.
सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक मुक्ती मिळवून देणे हे मुक्तिवादी तत्त्वमीमांसेचे एक उद्दिष्ट आहे, ही स्तुत्य बाब आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत, ऐहिक गरजा आहेत. त्या भागविल्या गेल्या पाहिजेत. त्याचबरोबर माणूस केवळ भाकरीवर जगत नाही, तर त्याला आत्माही आहे. माणसाच्या आध्यात्मिक आणि पारमार्थिक गरजांकडेही लक्ष पुरविणे महत्त्वाचे आहे, याचे भान ‘मुक्तिवादी तत्त्वमीमांसे’ने ठेवले पाहिजे.
संदर्भ :
- Sobrino, Jon, Spirituality of Liberation : Toward Political Holiness, New York, 1986.
- Sugirtharajah, R. S., The Bible and The Third world, London, 2001.
- नवा करार, बायबल सोसायटी ऑफ इंडिया, बेंगळुरू, २०१२.
समीक्षक : फ्रान्सिस कोरिया