एक ख्रिस्ती व्रतस्थ संघ. यास ऑगस्टीनवाद असेही म्हटले जाते. मूळचा निधर्मी असलेला संत ऑगस्टीन (इ.स. ३५४–४३०) हा झाला ख्रिस्ती धर्मीयांचा उत्तुंग प्रतिभेचा एक तत्त्ववेत्ता व धर्मपंडित. ऐन तारुण्यातील त्याचे जीवन स्वच्छंदी व ख्यालीखुशालीचे होते. त्याची आई मोनिका हिच्या अविश्रांत प्रार्थनेमुळे व प्रयत्नांमुळे तिचा पुत्र ऑगस्टीन ह्याचे धर्माचरण बदलले व त्याचे मन्वन्तर होऊन तो ख्रिस्ती झाला. पुढे तो बिशपपदी पोहोचला.

संत ऑगस्टीनकडून ऑगस्टीनियन विधीसंहिता स्वीकारताना संत नॉर्बर्ट

हिप्पो गावच्या या धर्मपंडिताने जे महान धर्मग्रंथ लिहिले, ते आजवरही वापरले जात आहेत. आठ प्रकरणांत त्यांनी आपल्या संस्थेची जी नियमावली तयार केली, त्यावर जे मठ उदयाला आले, त्यांतून पुढे इ.स. १२५६ या वर्षी ‘आगस्टीनियन संघ’ निर्माण झाला. तत्त्ववेत्ता ऑगस्टीन ह्याच्या विचारांतून प्रेरणा घेतल्यामुळे ते ‘ऑर्डर ऑफ सेंट ऑगस्टीन’ (O.S.A.) या नावाने ते ओळखले जाऊ लागले.

इ.स. १५७२ मध्ये भारतात प्रवेश केलेल्या या संघाच्या सदस्यांनी कोचीन, गोवा, साष्टी, वसई, दमण-दीव येथे आपल्या शाखांची उभारणी केली. त्यांचे प्रमुख केंद्रस्थान गोव्याला होते. ते विभागीय प्रशासन केंद्र आज जमीनदोस्त झाले असून तिथल्या चर्चचा पडिक मनोरा तेवढाच शिल्लक राहिला आहे. तो मनोरा आज ‘गोव्याचे एक प्रमुख पर्यटन-चिन्ह’ म्हणून गणला जातो.

त्याला लागूनच असलेले ‘संत मोनिका’ या नावाचे एक कॉन्व्हेंट त्या काळात उभारले गेले. ते भारतातील पहिले ‘उच्च स्त्री-शिक्षण केंद्र’ म्हणून गणले जाते. तेथे आजही विद्यादानाचे कार्य चालू आहे. वसई किल्ल्यात त्यांचे प्रमुख चर्च इ.स. १५९६ मध्ये उभारण्यात आले होते. त्यांची धर्मप्रचाराची सूत्रे तेथून हाताळली जात.

संदर्भ :

  • Ennis, Arthur, Augustinian Religious Professions in Sixteenth Century Mexico, Villanova, 1986.
  • Zumkeller, Adolar; Rotelle, John E. Theology and History of the Augustinian School in the Middle Ages, Villanova, 1996.

समीक्षक : फ्रान्सिस दिब्रिटो