जॉन पोप, तेविसावे : (२५ नोव्हेंबर १८८१ — ३ जून १९६३). सर्वांत लोकप्रिय पोपपैकी एक. त्यांचा जन्म इटलीतील सोतो एल मॉण्टे येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव अँजेलो जूझेप्पे रॉन्कॉली. पायस पोप बारावे यांच्या मृत्यूनंतर (९ ऑक्टो. १९५८) त्यांची पोपपदी निवड झाली. त्यांनी ‘जॉन पोप तेविसावे’ हे नाव धारण केले. व्हॅटिकन सिटी या जगातील सगळ्यात चिमुकल्या देशाचे व जागतिक पातळीवर रोमन कॅथलिक ख्रिस्ती चर्चचे सार्वभौम नेते म्हणून त्यांनी २८ ऑक्टोबर १९५८ रोजी अधिकाराची सूत्रे हाती घेतली व ३ जून १९६३ पर्यंत चर्चचा कारभार समर्थपणे हाताळला. ते जेव्हा पोप झाले, तेव्हा अमेरिका व सोव्हिएट रशिया या दोन महासत्तांमध्ये संघर्ष होऊन युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. कॅथलिक चर्चमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारी पावले त्यांनी उचलल्यामुळे कॅथलिक जगतात नवचैतन्य निर्माण झाले. त्यांच्या नेतृत्वामुळे जगभरात सकारात्मक परिवर्तन घडून आले. पोप फ्रान्सिस यांनी त्यांना २०१४ साली ‘संत’पद बहाल केले.

अधिकाराची सूत्रे हाती घेताच पोप जॉन तेविसावे यांनी नेटाने आपल्या कार्यास सुरुवात केली. सुरुवातीला रोम धर्मप्रांताचा त्यांनी झंझावाती दौरा केला. रुग्णालये, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, तुरुंग, चर्चेस यांना भेटी देऊन तेथील लोकांना त्यांनी प्रोत्साहित केले. राष्ट्रप्रमुखांशी, कॅथलिक चर्चपासून वेगळ्या झालेल्या ईस्टर्न ऑर्थोडॉक्स धर्माधिकाऱ्यांशी व प्रॉटेस्टंट पंथियांशी त्याचप्रमाणे ज्यू लोकांशी, यूरोप खंडातील साम्यवादी पुढाऱ्यांशी सुसंवाद साधण्यासाठी त्यांनी पावले उचलली. सोळाव्या शतकात कॅथलिक चर्चपासून विभक्त झालेल्या अँग्लिकन पंथाचे प्रमुख, कॅन्टनबरीचे आर्चबिशप यांचे व्हॅटिकनमध्ये त्यांनी स्वागत केले. इटलीच्या प्रमुखांना भेटीसाठी आमंत्रित केले. ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च धर्माधिकाऱ्यांना संवादासाठी बोलावले. यहुदी (ज्यू) धर्मीयांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्या भावना दुखविणारे शब्द त्यांनी उपासनेतून वगळले. रशियाचे राष्ट्रप्रमुख न्यिक्यित ख्रुश्चॉव्ह यांचे त्यांनी जल्लोषात स्वागत केले.

चर्चमध्ये आधुनिकतेचे वारे वाहावेत आणि नवे चैतन्य संचारावे म्हणून त्यांनी १९५९ साली दुसरी व्हॅटिकन परिषद आयोजित करण्याची घोषणा केली. ‘पाचेम इन तेरीस’ (पृथ्वीवर शांती) या विश्व परिपत्रकात न जन्मलेल्या भ्रूणालाही जगण्याचा हक्क आहे, हे त्यांनी जगाला ठणकावून सांगितले. प्रत्येक माणसाला प्रतिष्ठेचे जीवन जगता यावे म्हणून अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय मदत, योग्य विश्रांतीची गरज यांविषयी बोलताना ज्येष्ठ नागरीक व अपंग व्यक्ती यांची काळजी घेण्याविषयी त्यांनी सल्ला दिला. मानवी जीवन कुटुंबाद्वारे संक्रमित होत असते. लग्नसंस्कार हा कुटुंबाचा पाया असल्याने त्याचे पावित्र्य टिकविण्यासाठी घटस्फोटापासून परावृत्त होण्याचा संदेश त्यांनी जगाला दिला.

दुसरी व्हॅटिकन विश्वपरिषद आणि पुनरुज्जीवनाचे वारे : चर्च कारभाराचे सर्वांगीण नूतनीकरण व्हावे म्हणून पोप जॉन तेविसावे यांनी दुसरी जागतिक विश्वपरिषद भरविण्याची घोषणा २५ जानेवारी १९५९ रोजी केली. ही परिषद १९६२ ते १९६५ या कालावधीत संपन्न झाली. या धर्मपरिषदेसाठी सुरुवातीला फक्त कॅथलिक धर्मपंडित व धर्माधिकारी उपस्थित असत. दुसऱ्या धर्मपरिषदेसाठी मात्र जगभरातून कॅथलिक बिशप्स, ईशज्ञानी, विविध ख्रिस्ती धर्मपंथी यांचे प्रतिनिधी (ईस्टर्न ऑर्थोडॉक्स, प्रॉटेस्टंट), यहुदी आणि निवडक तज्ज्ञ प्रापंचिक यांचा सहभाग होता.

जॉन पोप तेविसावे यांनी ११ ऑक्टोबर १९६२ रोजी दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी ‘गाऊदेते मातेर एक्लेसिया’ (ख्रिस्तसभा उल्हास कर) असा आनंदाचा संदेश जगाला देऊन व्हॅटिकन परिषेदला आशीर्वाद दिला. दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेचे पहिले सत्र १९ ऑक्टोबर १९६२ ते ८ डिसेंबर १९६२ या कालावधीत संपन्न झाले; पण दुसरे सत्र सुरू असतानाच त्यांचे देहावसान झाले. त्यानंतर पोपपदी निवडून आलेले पोप पॉल सहावे यांच्या नेतृत्वाखाली दुसरी व्हॅटिकन परिषद योजनेनुसार पार पडली.

संदर्भ :

  • Joseph, Teresa; Tixeria, Banzelao, Two Popes who knew How To Pope, Mumbai, 2014.
  • Tornielli, Andrea, Francis : Pope of a New World, Colifornia, 2013.

समीक्षक : फ्रान्सिस कोरिया