वृषवाहन आणि वृषभारूढ अर्थात आपले वाहन नंदीसह असलेला शिव हा शिवप्रतिमांपैकी एक लोकप्रिय प्रकार. याच स्वरूपात तो आपल्या भक्तांना दर्शन देतो, अशी कल्पना आहे. कुषाण सम्राट विम कदफायसिस याच्या नाण्यांवरही असाच शिव आहे. दक्षिण भारतातील देवळात होणाऱ्या उत्सवांत शिवाच्या वृषवाहन स्वरूपाला फार महत्त्व आहे. या स्वरूपात शिव हा नंदीशेजारी, डावा पाय जमिनीवर घट्ट रोवून व उजवा पाय थोडा वाकवून किंवा डाव्या पोटरीवर तिरपा ठेवलेला अशा स्थितीत उभा असतो. त्याचा डावा हात नंदीच्या पाठीवर, डोक्यावर ठेवलेला असून उजवा हात कमरेवर किंवा खाली सैल सोडलेला असतो. कधीकधी उजव्या हातात काहीशी वक्र काठी असते. शिवप्रतिमा चतुर्भुज असल्यास मागच्या दोन हातांत टंक वा परशू आणि मृग असतात. वाहन वृषभ त्याच्यामागे उभे असून त्याची उंची ही शिवाच्या कमरेइतकी किंवा छातीइतकी असते. अनेकदा वृषवाहन प्रतिमेत शिवासह पार्वतीही असते. तिच्या किंचित वाकवलेल्या उजव्या हातात कमळ असून डावा हात सैल सोडलेला असतो. अशी प्रतिमा दक्षिण भारतात अतिशय लोकप्रिय असून सर्वच महत्त्वाच्या आगमांमध्ये तिचा उल्लेख आढळतो.
ऐहोळे (जि. विजापूर, कर्नाटक) येथील सातव्या शतकातील भव्य वृषवाहन मूर्ती सर्वांत प्राचीन समजली जाते. येथे शिव आठ हातांचा असून त्रिभंगावस्थेत नंदीवर रेलून उभा आहे. आपल्या दोन हातांनी त्याने नंदीची दोन्ही शिंगे धरली आहेत. दोन हात भग्न झालेले असून इतर हातांत त्रिशूळ, सर्प, जपमाळ ह्या वस्तू आहेत; आठव्या हातातील वस्तू अस्पष्ट आहे. त्याने जटामुकुट व इतर अलंकार धारण केले आहेत. मस्तकाभोवती प्रभावळ आहे. वेदारण्यम् (जि. नागपट्टीनाम, तमिळनाडू) येथील वृषवाहन शिव-पार्वतीची चोलकालीन कांस्यमूर्ती विशेष उल्लेखनीय आहे. शिवाचा उजवा हात नंदीच्या मस्तकावर असून डावा हात कटकमुद्रेत आहे. पार्वती स्वतंत्र पीठावर उभी असून तिच्या उजव्या हातात उत्पल (कमळ) आहे. डावा हात सरळ खाली सोडलेला आहे. दोन्ही प्रतिमा अलंकाराभूषित आहेत. उत्तर भारतातही काही गुप्तकालीन वृषवाहन मूर्ती मिळाल्या आहेत.
वृषभारूढ शिवमूर्ती ही वृषवाहन प्रतिमेहून थोडी वेगळ्या स्वरूपाची आहे. यात शिव एकटाच किंवा सपत्नीक नंदीवर बसलेला असतो. अशा प्रकारच्या प्रतिमांचे मुख्यत्वे तीन प्रकार पडतात : १) शिव आणि पार्वती स्वतंत्रपणे नंदीवर बसलेले असतात. २) नंदी उभा असून शिव आणि पार्वती हे त्याच्यावर आलिंगनमुद्रेत बसलेले असतात. ३) नंदीवर शिव-पार्वती हे आलिंगनमुद्रेत बसलेले असतात आणि पार्वती शिवाच्या मांडीवर बसलेली असते. या मूर्तीप्रकाराचा उल्लेख आगमग्रंथांत नाही; मात्र गोपीनाथ राव यांनी त्याचा समावेश ‘वृषभारूढ’ या शीर्षकांतर्गत केला आहे. मध्ययुगीन कालखंडातील वृषभारूढ शिव-पार्वतीच्या अनेक प्रतिमा सबंध भारतभर मोठ्या संख्येने आढळतात. आवरा (जि. टोंक, राजस्थान) येथून मिळालेली एक मूर्ती मध्य प्रदेशातील इंदौर (इंदूर) संग्रहालयात आहे. यात शिव चतुर्भुज असून उजव्या हातांत त्रिशूळ व माळ आहे. मागचा डावा हात पार्वतीला आलिंगन देत असून खालचा डावा हात स्तनस्पर्श करीत आहे. पार्वतीचा उजवा हात भंगलेला असून डाव्या हातात फूल आहे. उभयता नंदीवर बसलेले आहेत.
नंदीवर आरूढ झालेल्या एकट्या शिवाच्या प्रतिमा मात्र काहीशा दुर्मीळ आहेत. कोलकाता (प. बंगाल) येथील इंडियन म्युझियममध्ये अशी एक शिवप्रतिमा आहे. येथील शिव त्रिमुखी व चतुर्भुज असून त्याच्या मागील दोन हातांत त्रिशूळ आणि पाश आहेत, तर पुढच्या उजव्या हातात दंड धारण केला आहे. पुढचा डावा हात उभ्या नंदीच्या मानेवर ठेवलेला दिसतो. उत्तर भारतीय शिल्पांत नंदी उभा व बसलेला अशा दोन्ही प्रकारे दाखवतात.
संदर्भ :
- Rao, T. A. G., Elements of Hindu Iconography, Vol. II, Part I, Motilal Banarasidas Publishers Pvt. Ltd., Delhi, 1914; 1997.
- जोशी, नी. पु., भारतीय मूर्तिशास्त्र, प्रसाद प्रकाशन, पुणे, १९७९; २०१३.
- देगलूरकर, गो. बं., शिवमूर्तये नम:, स्नेहल प्रकाशन, पुणे, २०१४.
समीक्षक : मंजिरी भालेराव