नावाप्रमाणेच या प्रकारच्या शिवप्रतिमेत चंद्रकलेला महत्त्व आहे. या मूर्तीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे शिवाच्या जटेत खोचलेली चंद्रकोर. ही चंद्रकोर कधी डाव्या, तर कधी उजव्या बाजूस असते. चंद्रशेखर शिवाची प्रतिमा सर्वप्रथम कुषाण राजांच्या नाण्यांवर दिसून येते. देगलूरकर यांच्या मतानुसार, ज्या शिवप्रतिमांच्या जटांमध्ये चंद्रकोर आहे, अशा केवल शिव किंवा उमासहित शिव अशा उभ्या स्थितीतील चतुर्भुज प्रतिमांनाच चंद्रशेखर शिव म्हणून संबोधले जाते. इतर कोणत्याही आसन किंवा स्थानक मूर्तीत शिवाच्या जटेत चंद्रकोर असेल तर ती चंद्रशेखर म्हणून गणली जात नाही.

केवल चंद्रशेखर, थिरुप्पराईथुराई (जि. तिरुचिरापल्ली), तमिळनाडू.

सुप्रभेदागम, अंशुमदभेदागम, उत्तरकामिकागम, शिल्परत्न या ग्रंथांत शिवाची मुद्रा व आयुधे यांचे वर्णन येते; प्रदक्षिणाक्रमाने त्याचे चार हात अभयमुद्रा, टंक (कुदळ किंवा फावड्यासारखे आयुध-बहुधा कालौघात त्याची जागा परशुने घेतली असावी), काळवीट/मृग व वरदमुद्रा धारण करतात. त्याला तीन नेत्र असून डोक्यावरील जटेत डाव्या बाजूला चंद्रकोर असते. अलंकारांमध्ये मात्र प्रदेश, कालपरत्वे वैविध्य आढळते. तो बरेच वेळा समभंग स्थितीत सरळ उभा असतो. सोबत उमा असल्यास तिच्या हातात कमळ असते. गोपीनाथ राव असे प्रतिपादन करतात की, दक्षिण भारतातील बऱ्याच पाषाण व धातू प्रतिमा आगमांतील वर्णनाबरहुकूम आहेत, तर बॅनर्जी याबाबत पूर्व आणि उत्तर भारतातील शिवप्रतिमांचे उदाहरण देतात. मात्र देगलूरकर यांच्या मते, एकूणच दक्षिणेत चंद्रशेखर मूर्ती कमी आढळतात. शिवाय दक्षिणेतील शिवप्रतिमांच्या मागच्या हातात परशू आणि मृग असतात, तर इतरत्र त्यांची जागा डमरू व त्रिशूळ घेतात, हा महत्त्वाचा फरक होय. उमासहीत मूर्तींचे पुनः दोन प्रकार पडतात; त्यांपैकी एक उमा व शिवाचे साहचर्य दाखवते, तर दुसरी आलिंगन चंद्रशेखर मूर्ती होय. यातील पहिल्या प्रकारात शिव हा उमेसह असतो, मात्र कधीकधी दोघेही स्वतंत्र पीठांवर असतात. आलिंगन मूर्तीत तीन प्रकारचे वैविध्य आढळते; शिवाने त्याच्या डाव्या हाताने उमेला आलिंगन देणे, उजव्या हाताने आलिंगन देणे आणि तिसरा प्रकार म्हणजे दोघांनीही एकमेकांना आलिंगन देणे. श्रीतत्त्वनिधीतील वर्णनानुसार पार्वती ही त्रिभंगावस्थेतच असायला हवी आणि तिच्या उजव्या किंवा डाव्या हातात एखादे फूल (विशेषत: निलोत्पल कमळ) हवे.

बँकॉकच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात एक द्विभुज चंद्रशेखर मूर्ती आहे. तिच्या दोन्ही हातांत काक व हरीण आहेत. तिच्या अंगावर पायघोळ वस्त्र, जानवे व मोजके दागिने आहेत. ओडिशा राज्यात खिचींग (जि. मयूरभंज) येथील शिवप्रतिमा रूढ संकेतांनुसार नसली तरी अतिशय सुंदर आहे. उभ्या शिवाच्या मागील दोन हातांत अक्षमाळा आणि त्रिशूळ आहेत. खालचा उजवा हात भंगलेला असून डाव्या हातात कवटी आहे. लाखामंडळ (डेहराडून) येथील आलिंगन चंद्रशेखराची गुप्तकालीन मूर्ती त्रिभंगी असून त्यांच्या मागे नंदी आहे; तो आपले तोंड पुढे आणून त्यांच्याकडे पाहत आहे. या शिवाने आपल्या खालच्या उजव्या व वरच्या डाव्या हातात मिळून वीणा धारण केली आहे. वरच्या उजव्या हातात बहुधा त्रिशूळ असावा. खालचा डावा हात पार्वतीच्या पाठीवरून खाली स्तनापर्यंत आला आहे. पार्वतीच्या दोन्ही हातांत मिळून माला आहे. शिवाच्या अंगावर कुंडले, कंठा, केयूर, मेखला इ. दागिने आहेत. पार्वतीच्याही अंगावर अनेक दागिने आहेत. कर्नाटकातील अंगूर (जि. बळ्ळारी) येथे एक सुरेख आलिंगन चंद्रशेखर प्रतिमा आहे. शिवपार्वती त्रिभंगावस्थेत आहेत. शिवाने जपमाळ, त्रिशूळ, डमरू धारण केलेले असून एक हात उमेच्या खांद्यावर आहे. तिनेही आपला उजवा हात शिवाच्या खांद्यावर ठेवला आहे आणि डाव्या हातात कमळ धारण केले आहे. आजूबाजूला स्कंद व गणेश आहेत. ही प्रतिमा अकराव्या-बाराव्या शतकातील आहे. महाराष्ट्रात आटपाडी (जि. सातारा) येथे एक आलिंगन चंद्रशेखराची मूर्ती आहे. ती तेथील कल्लेश्वराच्या देवळात एका बाजूस ठेवलेली आहे. सुमारे तीन फूट उंचीच्या या शिल्पात दोन्ही देवता उभ्या आहेत. शंकर चतुर्भुज आहे; प्रदक्षिणाकर: क्रमाने पहिल्या तीन हातांत अक्षमाला, त्रिशूळ आणि नाग असून खालचा डावा हात पार्वतीस आलिंगन देत आहे. त्यांच्या उजवीकडे नंदी आहे.

संदर्भ :

  • Rao, T. A. G., Elements of Hindu Iconography, Vol., II, Part I, Motilal Banarasidas Publishers Pvt. Ltd., Delhi, 1997.
  • खरे, ग. ह., मूर्तिविज्ञान, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, २०१२.
  • देगलूरकर, गो. बं., शिवमूर्तये नम.., स्नेहल प्रकाशन, पुणे, २०१४.

                                                                                                                                                                               समीक्षक : मंजिरी भालेराव