एकट्या शिवाची मूर्ती असल्यास तिला केवल शिव म्हणतात. केवलमूर्तींचे स्थानक व आसन असे दोन प्रकार पडतात. शिवासह नंदी असतोच असे नाही. साधारणत: अशी मूर्ती चतुर्भुज असून हातात त्रिशूळ, सर्प व घट हे प्रामुख्याने दिसतात. नाणी व मुद्रा यांवर केवल शिवाचे अंकन मोठ्या प्रमाणात आढळते. मात्र पाषाणमूर्तींची संख्या तुलनेने कमी आहे. इसवी सनाच्या सुरुवातीच्या शतकात उत्तर भारतावर राज्य करणाऱ्या कुषाण वंशातील काही राजे शैव होते; साहजिकच त्यांच्या अधिपत्याखालील मथुरा व आसपासच्या प्रदेशांतून अनेक शिवमूर्ती प्राप्त झाल्या आहेत. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून मिळालेली एक द्विभुज शिवप्रतिमा उल्लेखनीय आहे. तिचा उजवा हात वरदमुद्रेत असून डाव्या हातात त्रिशूळ आहे. डोक्यामागे प्रभावळ आहे.  ही प्रतिमा प्रारंभिक गुप्तकाळाची वाटते. उत्तर भारतात खजुराहो, राजस्थानात ओसिया इ. ठिकाणी अशा अनेक प्रतिमा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रातील भांदक येथे काही उल्लेखनीय केवल शिवमूर्ती मिळाल्या आहेत. एका शिल्पात त्याच्याजवळ तीन फण्यांचा नाग, त्रिशूळ, पाश व कमळपुष्प आढळतात. आणखी एका प्रतिमेत शिवासह बैल आणि एक चवरीधारी सेविका आहे. केवल शिवाची एक आसनमूर्ती इंदूरच्या संग्रहालयात आहे.

केवल शिव प्रकारातील काही मूर्ती सिंहासह आहेत. माट येथून मिळालेली एक मूर्ती सध्या मथुरा संग्रहालयात आहे. हिचे डोके व उजवा हात भग्नावस्थेत असून शेजारी आखूड पायाचा व मोठ्या पोटाचा शिवगण आहे. प्रा. वासुदेवशरण अग्रवाल यांच्या मते, ही शिवप्रतिमा आहे. माट येथे शिवोपासक कुषाण राजांचे देवकुल होते, ही गोष्ट या संदर्भात लक्षात ठेवण्यासारखी आहे. तेथूनच एक सिंहवाहिनी पार्वतीची मूर्तीही मिळाली आहे. डॉ. नी. पु. जोशी यांनी मूसानगर (जि. कानपूर, उत्तर प्रदेश) येथील एका वेदिकास्तंभावर कोरलेल्या दोन शिवप्रतिमांचा उल्लेख केला आहे. त्या मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. या स्तंभाच्या दोन बाजूंस असलेल्या कोरीव चौकटींपैकी प्रत्येकी पहिल्या चौकटीत शंकराच्या मूर्ती आहेत. एका बाजूच्या मूर्तीत शिव ऊर्ध्वलिंग असून अभयमुद्रेत आहे. त्याचे केस मानेपर्यंत लांब असून डाव्या हातात घट आहे. उजवीकडे, वर मान करून पाहणारा सिंह व डावीकडे आखूड पायांचा ढेरपोट्या गण आहे. ही प्रतिमा मथुरा संग्रहालयातील प्रतिमेशी मिळतीजुळती आहे. याच स्तंभाच्या दुसऱ्या बाजूस शिवाची आसनमूर्ती आहे. येथे द्विभुज शिवाचा उजवा हात अभयमुद्रेत असून डाव्या हातात घट आहे. येथेही शिव ऊर्ध्वलिंगी आहे; त्याने पागोटे व दागिने घातले आहेत. आसनाखाली सिंह बसलेला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शिवाच्या दोन्ही खांद्यांतून दोन व मानेकडून एक असे एकूण तीन द्विभुज पुरुष प्रकट झालेले दिसतात. साधारणत: मुख्य देवतेची काही रूपे किंवा शक्ती सूचित करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रतिमा दर्शविण्याची ही पद्धत मथुरा व समकालीन गांधार प्रतिमांमध्येही आढळते. या खांद्यातून उद्भूत होणाऱ्या देवता वा शक्तींना ‘व्यूह’ असे म्हटले जाते. डॉ. नी. पु. जोशी यांच्या मते, या मूसानगरच्या प्रतिमेत कुषाणकालीन वासुदेवाच्या ‘चतुर्व्यूह’ प्रतिमेचे शैव रूपांतर असावे किंवा याच काळात प्रचलित होऊ पाहणाऱ्या ‘चतुर्मुखलिंग’ संकल्पनेचे हे पुरुषरूप अंकन असावे.

दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयातील पाश्चात्त्य छाप असलेले एक उत्तर कुषाणकालीन शिवशीर्ष विशेष उल्लेखनीय आहे. या शिवाच्या डोक्यावर जटाजूट वा जटामुकुटाऐवजी कुरळे केस दर्शविलेले आहेत; तसेच डावीकडे चंद्रकोर आहे. कपाळावर ग्रीक शासकांप्रमाणे ‘डायडेम’ बांधलेला दिसतो. त्याला शिल्परत्नात ‘ललाटपट्ट’ असे नाव आहे. कपाळावर तिसरा नेत्र उभा अंकित केला आहे; वास्तविक हे वैशिष्ट्य गुप्तकालीन मूर्तींचे आहे; पण त्याचा प्रारंभ कुषाणकाळाच्या शेवटी झाला असावा.

संदर्भ :

  • खरे, ग. ह., मूर्तिविज्ञान, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, २०१२.
  • जोशी, नी. पु., भारतीय मूर्तिशास्त्र, प्रसाद प्रकाशन, पुणे, २०१३.
  • देगलूरकर, गो. बं., शिवमूर्तये नम.., स्नेहल प्रकाशन, पुणे, २०१४.

                                                                                                                                                                              समीक्षक : मंजिरी भालेराव