प्रभू येशू ख्रिस्त यांनी स्थापन केलेले चर्च २००० वर्षांपेक्षा अधिक वर्षे अस्तित्वात असून जगभरातील एक अब्जाहून अधिक लोक कॅथलिक ख्रिस्ती आहेत. हे चर्च श्रद्धानिवेदनात जाहीर केल्यानुसार एक, पवित्र, कॅथलिक आणि येशू ख्रिस्त यांच्या सुरुवातीच्या बारा प्रेषितांनी (अपॉसल्स) शिकविलेल्या/हस्तांतरित केलेल्या श्रद्धेला प्रमाण मानून आजपर्यंत परिणामकारक रीत्या उभे आहे.
कॅथलिक चर्चचे मध्यवर्ती धर्मपीठ रोम येथे सुरुवातीपासूनच आहे. येशू ख्रिस्त यांनी निवडलेल्या बारा प्रेषितांपैकी संत पीटर – ज्यांचे नाव शिमोन होते – यांना ‘पेत्रस’ म्हणजे ‘खडक’ किंवा ‘दगड’ अशी उपमा देऊन बारा जणांत प्रमुख म्हणून पुढे केले व त्या खडकावर म्हणजे संत पीटर यांनी उद्घोषित केलेल्या श्रद्धेवर चर्च स्थापिले. जगभर विखुरलेल्या शिष्यांपैकी संत पीटर यांनी रोमचा रस्ता धरला. भीतीने ग्रासलेल्या निरो या रोमन सम्राटाने संत पीटर यांचा रोममध्येच क्रूसावर डोके खाली व पाय वर असे खिळून इ. स. ६७ मध्ये वध केला; कारण रोमन साम्राज्याला आव्हान करीत असल्याचा बिनबुडाचा गुन्हा त्यांच्यावर लादला गेला होता. ‘मरणाने माणूस नष्ट होत नाही’ अशी येशू ख्रिस्त यांची शिकवण असल्याने ख्रिस्ती श्रद्धावंतांनी जेथे संत पीटर यांचे मृत शरीर निरोने फेकले होते ती जागा पहिल्यापासूनच ‘प्रार्थनास्थळ’ म्हणून मानली. आजचे संत पीटर यांचे जगातील सर्वांत मोठे देऊळ – संत पीटर बॅसिलिका – मोठ्या दिमाखाने या घटनांना साक्षी देते. उशिराने परिवर्तित होऊन ख्रिस्ती झालेले संत पॉल हेदेखील रोम येथे आले. त्यांचा शिरच्छेद करून त्यांना रोममध्ये ठार मारण्यात आले. अशा दोन महान ख्रिस्ती संतांनी त्यांच्या रक्ताने रोम येथे येशू ख्रिस्त यांना ‘साक्ष’ दिल्याने रोम हे कॅथलिक मध्यवर्ती धर्मपीठ बनले.
आज रोमचे बिशप हे संत पीटर यांचे २६६ वे वारस मानले जातात. जसे सुरुवातीला संत पीटर, तसे आजसुद्धा ‘पीटर तेथे जगतो व जगातील कॅथलिकांना अस्सल धर्मश्रद्धेत दृढ करतो’, असे ॲन्टीओकचे बिशप इग्नेशिअस यांनी म्हटले आहे. जगातील जवळजवळ ३००० धर्मप्रांतांना ऐक्यात ठेवण्याची व येशू ख्रिस्त यांनी शिकविलेली श्रद्धा विनातडजोडीने पाळायला प्रेरित करण्याची जबाबदारी संत पीटर यांचे वारस, म्हणजे ‘पोप’ यांच्यावर सुपूर्द केली आहे व तेथून चर्चचा मध्यवर्ती कारभार चालतो. ‘पोप’ या शब्दाचा अर्थ ‘पिता’ किंवा ‘वडील’ असा होतो.
चर्चचा कारभार श्रेणीबद्ध रचनेने चालतो. व्हॅटिकनमध्ये काम करणारे बरेच ख्रिस्ती संसार थाटलेले असतात. तसेच काही बिशप, धर्मसेवक (फादर्स) व्रते घेऊन संपूर्ण जीवन परमेश्वराच्या शोधात, ऐक्यात व सेवेत जगणारे ‘व्रतस्थ’ (स्त्री व पुरुष) जगभर संघटित झालेल्या चर्चमध्ये स्वत: निवडलेल्या व चर्चने मान्यता दिलेल्या शैलीनुसार जगतात. व्रतस्थांच्या देखील संपूर्ण जगात अधिकृत मान्यता पावलेल्या ‘संस्था’ असतात. हे व्रतस्थ विरक्त, अनासक्त व त्यागी जीवन जगण्याचा प्रयत्न करतात व लोकांना विशेषेकरून रंजल्या-गांजल्यांना नि:स्वार्थ सेवा देतात व त्यांचे जीवन उज्ज्वल करण्यास हातभार लावतात.
जगातील प्रत्येक धर्मप्रांत (आखून दिलेला विभाग) एका बिशपांच्या हाताखाली असतो. अनेक विभागांचे संघटन करून त्याला ‘सरधर्मप्रांता’चा दर्जा दिला जातो. त्या सरधर्मप्रांताच्या बिशपांना ‘आर्चबिशप’ असे संबोधिले जाते. पोप महोदय काही बिशपांना ‘कार्डिनल’च्या पदाने भूषवितात. त्या कार्डिनलचे मुख्य कार्य म्हणजे पोप महोदयांना वैश्विक कारभार पार पाडण्यासाठी विशेष मदत करणे व नवीन पोप निवडण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणे.
प्रत्येक बिशपांना त्यांच्या अखत्यारीत दिलेल्या विभागासाठी मदतनीस म्हणून ‘फादर्स’ म्हणजेच धर्मसेवक असतात. बिशप त्यांना अधिकृत दीक्षा देतात. तेदेखील ब्रह्मचर्य, आज्ञाधारकपणा, विरक्त, अनासक्त व त्यागी जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. संसारासाठी वाहून घेतलेले ख्रिस्तीसुद्धा आपापल्या धर्मप्रांतातील बिशपांच्या आधिपत्याखाली आध्यात्मिक जीवन जगतात. संपूर्ण धर्मप्रांत परिणामकारक कार्यपद्धतीसाठी लहान समूहांमध्ये (पॅरिश) विभागलेला असतो. कारभार तळागाळात, स्थानिक पातळीवर पार पडत असला, तरी एक श्रद्धा शाबूत राहण्यासाठी पोपच्या आधिपत्याखाली रोम येथे असलेल्या अनेक दालनांच्या मध्यवर्ती धर्मपीठाच्या आदेशाप्रमाणे तो चालतो. या धर्मपीठात अनेक बिशप्स, धर्मसेवक, स्त्री-पुरुष व्रतस्थ व प्रापंचिक कार्य करण्यासाठी त्या त्या कार्याला धरून त्यांच्या पात्रतेनुसार निवडले जातात. ही सर्व महामंडळे (कॉंग्रिगेशन, कौन्सिल्स, कमिशन्स, कमिटीज) पोपमहोदयांच्या वैश्विक कार्यसेवेसाठी तत्पर असतात. त्यांचा दर्जा, जबाबदारी, कार्य, लायकी, मर्यादा इत्यादी लक्षात घेऊन हे जागतिक कार्य पार पडत असते.
रोम येथील महामंडळाची रचनादेखील श्रेणीबद्ध आहे. वेळोवेळी निरनिराळ्या पोपमहोदयांनी या रचनेची (रोमन क्युरिया) काळाला जागून पुनर्रचना केली आहे. पोप फ्रान्सिस यांनी काही महामंडळांची पुनर्रचना करून ‘डिक्यास्टरी’ हे सर्व महामंडळांना एकच नाव ठेवण्याची प्रथा सुरू केली आहे.
राज्य आयोग (Secretariat of State) आणि पोपमहोदयांचे आंतरराष्ट्रीय संबंध सांभाळण्यासाठी लागणारे निपुण अधिकारी : व्हॅटिकन ही एक छोटीशी टेकडी. ती रोममधील टायबर नदीकाठी आहे. संत पीटर (पहिले पोप) यांची कबर तेथे बांधली व त्यावर आजची बॅसिलिका (पवित्र मंदिर) उभी आहे. ४४ हेक्टर जमिनीवर वसलेल्या या छोटेखानी सार्वभौम राज्याला ‘पवित्र अधिकार आसन’ (Holy See) म्हणून गणले जाते.
१५४२ साली कॅथलिक श्रद्धेच्या अधिकृत शिकवणुकीसंबंधी पहिला आयोग पोप तिसरे पॉल यांनी स्थापन केला. तदनंतर १५९८ पासून गरजेप्रमाणे इतर आयोग निरनिराळ्या पोपमहोदयांच्या कारकिर्दीत स्थापित झाले.
राज्य आयोगाची व्याप्ती, अधिकार व कार्याची व्याख्या करणे कठीणच. पोपमहोदयांनी सूचविलेल्या सर्व समस्या या आयोगाचे मुख्य ‘सेक्रेटरी ऑफ स्टेट’ यांच्या हाती सुपूर्द केल्या जातात. त्यांना मदत करण्यासाठी सार्वजनिक कार्याविषयी सल्लागार मंडळ असते. ‘सेक्रेटरी ऑफ स्टेट’ त्याचे अध्यक्ष असतात. त्याच्याखालोखाल उप’सेक्रेटरी ऑफ स्टेट’ नेमले जातात. ते सल्लागार मंडळाचे ‘सेक्रेटरी’ म्हणून काम पाहतात. मग शासन करण्यासाठी व जगातील बिशपांच्या संपर्कात राहण्यासाठी, निरनिराळ्या देशांतील राजदूतांबरोबर राष्ट्रीय संबंध ठेवण्यासाठी काही बिशप्स, धर्मसेवक, व्रतस्थ जीवन जगणारे व प्रापंचिकांची नेमणूक पोपमहोदय करीत असतात.
पोपमहोदयांचे रोजचे जीवन सुरळीत चालण्यासाठी ‘पॉन्टिफिकल’ कुटुंबप्रमुख म्हणून एक व्यवस्थापक नेमलेले असतात. उप’सेक्रेटरी ऑफ स्टेट’ त्या व्यवस्थापकाशी नेहमी संपर्कात राहून आपल्या हाती सुपूर्द केलेले काम बघतात. प्रत्येक देशात पोपमहोदयांचे राजदूत (१८३ देशांशी व्हॅटिकन आपले परराष्ट्रीय संबंध जोपासते) आणखी एका ‘सेक्रेटरी’च्या (सेक्रेटरी फॉर द स्टेट्स) संपर्कात राहून आपले काम करतात.
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अलीकडील अनेक वर्षांपासून ‘रोमन कुरीया’मध्ये काम करणाऱ्या व्यक्ती संपूर्ण जगातून बोलविल्या जातात. अशाप्रकारे चर्चचा खरा वैश्विक चेहरा लोकांपुढे यावा हा हेतू आहे.
इतर रोमन काँग्रिगेशन चर्चच्या विशिष्ट अंगांना चालना देण्यासाठी, समन्वय साधण्यासाठी आणि गरज असल्यास प्रेरणा देण्यासाठी किंवा योग्य मार्गावर ठेवण्यासाठी कार्यरत असतात. प्रत्येक काँग्रिगेशनचे कार्य पोपमहोदयांनी नेमलेले एक कार्डिनल, एक आर्चबिशप व एक उपसेक्रेटरी यांच्याकडून चालविले जाते. ही नेमणूक दर पाच वर्षांनी पोपमहोदयांकडे फेरविचारासाठी येते. कायद्यानुसार सर्व काँग्रिगेशन्स समान हक्कांनी चालतात. त्यासाठी गरज भासल्यास व्हॅटिकनचे उच्च न्यायालय मध्यस्थी करते व उपस्थित झालेला प्रश्न सोडविला जातो. कार्यानुसार प्रत्येक काँग्रिगेशनमध्ये बिशप्स, धर्मसेवक, सिस्टर्स आणि प्रापंचिक यांची भरती केली जाते.
आठ काँग्रिगेशन्स व्हॅटिकन आयोगाचा भाग आहेत : १) श्रद्धा व नीतीआयोग, २) बिशपांच्या जीवनकार्यासाठी आयोग, ३) पूर्वेकडील चर्चेससाठी आयोग (उदा., भारतात कॅथलिक चर्चमध्ये ‘सिरो-मलबार’ व ‘सिरो-मलंकार’ व रोमन-लॅटिन चर्च मिळून तीन चर्चेस आहेत), ४) पवित्र साक्रामेन्ते (ख्रिस्ती कृपा-संस्कार) व परमेश्वराची आराधनासंबंधी काँग्रिगेशन, ५) व्रतस्थ जीवन स्वीकारलेल्यांसाठी व देवाला समर्पित जीवन जगणाऱ्यांसंबंधी काँग्रिगेशन, ६) येशू ख्रिस्त यांच्या सुवार्तेचा प्रसार होण्यासंबंधी काँग्रेगेशन, ७) ख्रिस्ती व्यक्तीच्या संतीकरणासाठी काँग्रिगेशन आणि ८) कॅथलिक शिक्षणसंस्था यांसंबंधी काँग्रिगेशन.
१९६२–६५ साली पार पडलेल्या दुसऱ्या व्हॅटिकन एक्युमेनिकल परिषदेमध्ये ठरल्यानुसार ‘सल्लागार मंडळे’ स्थापित झाली. उदा., सर्वधर्ममैत्रीसाठी सल्लागार परिषद, ‘संस्कृती’संबंधी, प्रापंचिकांसंबंधी, मानवी विकासासंबंधी आणि चर्च-कायदा फेरविचारांसंबंधी परिषदा, त्याचप्रमाणे काही कमिशन्ससुद्धा स्थापित झाली : प्रसारमाध्यमांसंबंधी, लॅटिन अमेरिकेसंबंधी, पवित्र आक्रेऑलॉजीसंबधी त्याचप्रमाणे काही समित्या स्थापन झाल्या. विज्ञानाच्या इतिहासासंबंधी, पुरातन इतिहास जतन करणेसंबंधी, पूज्य कला-कृतींसंबंधी, जागतिक कार्डिनल्सच्या समन्वयासंबंधी इत्यादी.
इसवी सन १३ व्या शतकापासून प्रायश्चित्तासंबंधी – म्हणजे गुन्हेगाराच्या सुधारणेसाठी – एक न्यायासन व्हॅटिकनमध्ये अस्तित्वात आहे. जेव्हा पोपमहोदय देवाघरी परततात, तेव्हासुद्धा व्हॅटिकनचे उच्च न्यायासन सर्व अधिकाराने आपला कारभार चालू ठेवते. ‘साक्रा रोमाना रोटा’ म्हणून वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्यासाठी तीन न्यायाधीश-मंडळ कार्यरत असतात. चर्चमध्ये झालेला वादविवाद, चर्चसंबंधी एखाद्या विषयावर हवा असलेला स्पष्टपणा किंवा चर्चमध्ये अन्याय झालेल्या व्यक्तीला न्याय मिळण्याची तरतूद येथे असते (विशेषेकरून विवाहातील अन्यायाची बाजू तपासून न्याय दिला जातो).
संपूर्ण व्हॅटिकनचा आर्थिक व्यवहार योग्य रीतीने पार पाडण्यासाठी पोपमहोदय पाच कार्डिनल्सची पाच वर्षांसाठी नेमणूक करतात. त्याचप्रमाणे व्हॅटिकनची सर्व मालमत्ता व तिचा योग्य कारभार पाहण्यासाठी ‘ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ होली सी पॅट्रीमोनी’ संस्था आहे. जगातील कॅथलिक लोकसंख्येची गणती करून ती अद्ययावत ठेवण्यासाठी रोममधील चार मुख्य देवळांची देखभाल व वेळोवेळी डागडुजीसाठी ‘फाब्रीका डेल्ला बॅसिलिका’, पोपमहोदयांना साहाय्य करणारे कार्यालय, नवीन राजदूत घडविण्यासाठी असलेले महाविद्यालय, व्हॅटिकन वाचनालय आणि गोपनीय स्वरूपाचा दप्तरखाना ही सर्व सक्रिय, सक्षम व सतर्क कार्यालये आपला कारभार परिणामकारकपणे पार पाडीत असतात व पोपमहोदयांना त्यांच्या कारभारात मदत करीत असतात.
संदर्भ :
- Flannery, Austin, Vatican Council II, Vols. 1 & 2, Mumbai, 2014.
- Paul, Pope John II, Redemption Missio, Kochi, 1999.
- Sarah, Robert Cardinal, God or Nothing, San Francisco, 2015.
समीक्षक : फ्रान्सिस कोरिया