मानवाची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे बुरशी माणसाच्या जीवाला धोका निर्माण करते. कर्करोग, पेशी कलम, निकृष्ट आहार, एचआयव्हीसारखे रोग, जैविक संयुगांचा (स्टेरॉइड्स) अति-वापर, मधुमेह ही रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याची प्रमुख कारणे आहेत. जीवाला धोका सार्वदेहिक (Systemic; फुप्फुसावाटे प्रवेश करणाऱ्या) बुरशीमुळे जास्त असतो. कारण त्या रक्तप्रवाहातून शरीरभर पसरतात. कँडिडा, म्यूकर, ॲस्पर्जिलस या संधीसाधू द्विरूपी किंवा बहुरूपी (गोल कोशिका, कवकजाल आणि फसवे कवकजाल) बुरशी त्यामुळे जास्त धोकादायक आहेत, कारण रक्तप्रवाहातून त्या गोल कोशिकेच्या रूपात सहज मार्गक्रमण करू शकतात.

म्यूकरमायकोसीस किंवा झायगोमायकोसीस हा रोग बुरशीचा एक समूह प्रामुख्याने माणसात निर्माण करतो. जवळजवळ ७०-८० टक्के म्यूकरमायकोसीसची प्रकरणे ह्या अब्सिडिया, म्यूकर, ऱ्हायझोपस (Rhizopus) या बुरशींमुळे होतात, तर ऱ्हायझोम्यूकर (Rhizomucor), अपोफायसोमायसेस (Apophysomyces), कनिंगहामेला (Cunninghamella), ॲक्टिनोम्यूकर (Actinomucor), कोकेरोमायसेस (Cokeromyces), कोनिडीओबोलस (Conidiobolus) यांमुळे २०-३० टक्के प्रकरणे आढळतात. या बुरशी हवेपेक्षा मातीमध्ये, पालापाचोळा, प्राण्यांच्या विष्ठेमध्ये असतात. त्यामुळे या बुरशींचे बीजाणू बहुतेक लोक टाळू शकत नाहीत; पण तसा निरोगी माणसांना धोका कमी असतो. रोगप्रतिकारशक्ती कमी झालेल्या माणसांमध्ये मात्र गंभीर आजार होण्याची शक्यता असते. म्यूकरमायकोसीसचे पाच वेगवेगळे प्रकार आहेत. १) ऱ्हायनोसेरेब्रल (Rhinocerebral) – प्रामुख्याने मधुमेह असणाऱ्यांना हा होतो. २) पल्मनरी – लुकेमिया (Pulmonary-leukaemia) असलेल्यांना धोका जास्त असतो. ३) जठरांत्रीय (गॅस्ट्रो इंटेस्टिनल; Gastrointestinal) – निकृष्ट आहार किंवा कोलायटीस असलेल्या रुग्णांना हा होऊ शकतो. ४) त्वचीय (क्युटेनियस; cutaneous) – त्वचेचे रोग असणाऱ्यांमध्ये म्यूकरसमूहाचा प्रादुर्भाव जास्त होतो. आणि शेवटचा प्रकार म्हणजे ५) फैलाव होणारा (डिसिमिनेटेड; disseminated) – पहिल्यांदा फुप्फुस आणि नंतर हृदय, मेंदू , डोळे, हाडे, किडनी असा पसरत जातो.

सन २०२०-२०२१ मध्ये जगभर पसरलेल्या कोव्हिड-१९ या विषाणूच्या महामारीमुळे संसर्ग झालेल्या रोग्यांमध्ये सूक्ष्मजीवाणू किंवा बुरशीचा संसर्ग लगेचच होऊ शकतो. भारतात म्यूकरमायकोसीस, तसा कमी प्रमाणात आढळणारा रोग आहे. म्यूकर या बुरशी समूहाची मूळ प्रकृती ही पाणथळ, दमट जागा अशी असते. सर्व बुरशींचे कवकजाल हे पांढरेच असतात. कदाचित मेलॅनिन नावाच्या संयुगामुळे थोडेसे तपकिरी असू शकते आणि बीजाणू मात्र वेगवेगळ्या रंगाचे असतात आणि तीच त्यांची ओळख असते. ऱ्हायझोपस ही बुरशी, ‘ब्लॅक ब्रेड मोल्ड’ (Black Bread Mold) या नावानेही ओळखली जाते. ही बुरशी हवेतील दमटपणा जास्त झाला की वाढते. त्यामुळे रुग्णालयात जर प्राणवायूच्या नलिकेबरोबर असणारा आर्द्रकारी (ह्युमिडीफायर; Humidifier) स्वच्छ नसेल किंवा त्यातील पाणी बदललेले नसेल तर ती परिस्थिती म्यूकर समूहातील बुरशींना पोषक असते. ह्युमिडीफाय्ररमध्ये मेथिलीन ब्लू हे रंगद्रव्य टाकल्यास त्याचा बुरशी कमी करण्याकरिता उपयोग होतो.

सुमारे पन्नास वर्षांहून जास्त काळ ॲम्फोटेरिसिन बी (amphotericin B)’ चा वापर घातक बुरशींची वाढ रोखण्यासाठी होत आहे. अर्गोस्टेरॉलचे (Ergosterol) संश्लेषण थांबविणे आणि त्यायोगे भित्तीकेच्या आतील पापुद्रयाला छिद्रे पाडणे हे प्रामुख्याने ॲम्फोटेरिसिन बी चे काम आहे. परंतु म्यूकरच्या समूहातील बुरशींवर त्याचा विशेष परिणाम होत नाही आणि त्यातून मानवी पेशींना ॲम्फोटेरिसिन बी जास्त विषारी (८ मायक्रोग्रॅम/मिली. इतक्या कमी प्रमाणात ९० टक्के हिमोलीसिस; Heamolysis; रक्तविलयन) असते. अशा घातक बुरशींचा नाश करण्याकरिता वेगवेगळी प्रतिजैविके शोधली जात आहेत. सध्या वापरात असणारी प्रतिजैविके, त्यांचे लक्ष्य आणि रुग्णांवर होणारे घातक परिणाम यांचा विचार करून नवीन लक्ष्य आणि कमी घातक प्रतिजैविकांवर सध्या जगात संशोधन सुरू आहे. बुरशीच्या भित्तिकेमध्ये असणारे कायटिन आणि त्याच्या संश्लेषणासाठी उपयोगी असणारे कायटिन सिंथेझ, ग्लुटामेट डिहायड्रोजनेझ ही विकरे अशी महत्त्वाची लक्ष्ये विचारात घेऊन प्रतिजैविके शोधण्याचे काम चालू आहे. याचा महत्त्वाचा फायदा असा की, कायटिन मानवी शरीरात नसते, त्यामुळे या लक्ष्याची प्रतिजैविके (उदा., निकोमायसीन) मानवाला विषारी असणार नाहीत. या करिता नमुना (मॉडेल) म्हणून म्यूकर समूहाच्या जवळची, पण माणसाला घातक नसणाऱ्या बेन्जामिनीएलासारख्या द्विरूपी बुरशींचा उपयोग केला जात आहे.

समीक्षक : शरद चाफेकर