फिन्बेर्ग, स्टीफन इ. :  (२७ नोव्हेंबर १९४२ – १४ डिसेंबर २०१६) जगातील अग्रेसर सामाजिक संख्याशास्त्रज्ञांपैकी एक म्हणून स्टीफन फिन्बेर्ग मान्यताप्राप्त होते. फिन्बेर्ग यांचा जन्म कॅनडातील टोरोन्टो येथे झाला. टोरोन्टो विद्यापीठातून त्यांनी गणित व संख्याशास्त्र या विषयात बीएस्सी पदवी मिळवली. पुढे फिन्बेर्ग यांनी हार्वर्ड विद्यापीठातून संख्याशास्त्र विषयात एम.ए. व पीएच्.डी. या पदव्या फ्रेडरिक मोस्तेलर यांच्या मार्गदर्शनाखाली मिळवल्या. फिन्बेर्ग, हे कार्नेजी मेलन विद्यापीठात १९८० पासून कार्यरत होते. मानवविज्ञान व समाजविज्ञानाचे अधिष्ठाता म्हणून त्यांनी डाएट्रिच महाविद्यालयातही काम केले.

फिन्बेर्ग यांनी सुरवातीला प्रवर्गीय आधारसामग्रीसाठी लॉग-रेषीय प्रारुपासंबंधी सामान्य संख्याशास्त्रीय सिद्धांत वापरून काम केले. त्यांनी पुढे हे सिद्धांत बहुमिती आसंग तक्त्यात प्रतिरूपीत होणाऱ्या अनेक प्रश्नांसाठी वापरले. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नमुना चाचणीसाठी संख्याशास्त्रीय पद्धतीचा विकास करण्याचे काम देखील त्यांनी केले, ज्यामध्ये नमुना निरपेक्ष दोषांचा अभ्यासही अंतर्भूत होता. कायदे विषयक प्रश्नांसाठी फिन्बेर्ग यांनी संख्याशास्त्रीय नव्या पद्धती विकसित करून वापरल्या. ‘बेशियन निर्णय’ हा त्यांच्या आवडीचा विषय त्यांनी कायदे विषयक निर्णय घेण्यासाठी उपयोगात आणला. कार्नेजी मेलन्स स्वयंचलित शिक्षण व संशोधन केंद्र येथे बहु-माध्यम आधारसामग्रीवर चालू असलेल्या महाकाय संशोधन प्रकल्पात फिन्बेर्ग यांनी पृथक बहुचल विश्लेषण (Discrete Multivariate Analysis) आणि इतर संख्याशास्त्रीय पद्धती उपयोगात आणल्या. फिन्बेर्ग यांनी ४०० हून अधिक शोधलेख प्रसिद्ध केले. ते Journal of Privacy and Confidentiality याचे संस्थापक संपादक होते.

फिन्बेर्ग यांना मिळालेले निवडक सन्मान व पुरस्कार असे आहेत – कॉप्स्स राष्ट्रपती पुरस्कार, अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे निवडून आलेले सदस्य, कॅनडाच्या रॉयल सोसायटीचे निवडून आलेले अधिछात्र, अमेरिकेच्या कला आणि विज्ञान अकादमीचे निवडून आलेले सदस्य, विज्ञान विकासाच्या अमेरिकन संस्थेचे अधिछात्र, अमेरिकन संख्याशास्त्र संस्थेचे अधिछात्र, विल्क्स पारितोषिक आंतर-ज्ञानशाखांतील संशोधनासाठी एनआयएसएस जेरोम सॅक्स पारितोषिक.

त्याव्यतिरिक्त त्यांना अनेक व्यावसायिक बहुमानही मिळाले, जसे की गणितीय संख्याशास्त्र संस्थेचे अध्यक्ष, सामाजिक व वर्तन विज्ञानाचा आंतरराष्ट्रीय कोशातील संख्याशास्त्र विभागाचे सह-संपादक आणि आंतरराष्ट्रीय बेझियन विश्लेषण संस्थेचे अध्यक्ष.

फिन्बेर्गलिखित महत्त्वपूर्ण पुस्तके अशी आहेत: Discrete Multivariate Analysis: Theory and Practice; The Analysis of Cross-classified Categorical Data; Statistics and the Law आणि A Survey of Statistical Network Models.

 संदर्भ :

 समीक्षक : विवेक पाटकर