माशेलकर, रघुनाथ  अनंत : (१ जानेवारी १९४३ –) रघुनाथ अनंत माशेलकर यांचा जन्म गोव्यातील माशेल गावी झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेक अडचणी सोसून त्यांना आपले शिक्षण पूर्ण करावे लागले. मुंबईच्या रासायनिक तंत्रज्ञान संस्थेतून (Institute of Chemical Technology) त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले व नंतर मुंबई विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर सहा वर्षे ते अमेरिकन विद्यापीठात शिकविण्याचे काम करीत होते. नंतर भारतात परत आल्यावर ते पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (National Chemical Laboratory) वैज्ञानिक म्हणून संशोधन करू लागले. आपल्या वैज्ञानिक जीवनात माशेलकर यांनी महत्त्वाचे संशोधन केले आहे. द्रव गतिकी (Fluid mechanics), बहुवारिक रसायनशास्त्र (Polymer Chemistry), जेल विज्ञान (Gel Science) हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. यात मूलभूत काम करून त्यांनी औद्योगिक दृष्ट्या उपयुक्त रसायने तयार केली.

सन १९८९ मध्ये ते राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक झाले. १९९५ मध्ये त्यांना वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (Council of Scientific and Industrial Research) या राष्ट्रीय संघटनेचे महासंचालक म्हणून नेमण्यात आले. तेथे देखील त्यांनी देशातील संशोधनक्षेत्राला योग्य दिशा देण्याचे काम केले. संस्थेचा प्रमुख या नात्याने त्यांनी या संस्थेच्या अधीन असलेल्या चाळीस प्रयोगशाळातील वैज्ञानिकांना आपल्या संशोधनाचे स्वामित्व (पेटंट) घेण्यासाठी उद्युक्त केले. २००६ मध्ये ते महासंचालक पदावरून निवृत्त झाले.

अमेरिकेतील काही शास्त्रज्ञांनी जेव्हा हळदीच्या औषधी गुणधर्माचे आणि बासमती तांदुळाचे स्वमित्व हक्क मिळविण्यासाठी प्रयत्न केले, तेव्हा त्यांनी हे भारताचे पारंपरिक ज्ञान आहे हे जगाला पटवून दिले आणि अर्जकर्त्यांना स्वामित्व हक्क मिळणार नाहीत याची व्यवस्था केली. याच्याही पुढे जाऊन त्यांनी भारतीय पारंपरिक ज्ञानाची जंत्री बनविण्याचे महत्वाचे कार्य हाती घेतले.

राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. एस. एस. भटनागर पुरस्कार, पंडित जवाहरलाल नेहरू तंत्रज्ञान पुरस्कार, जी. डी. बिर्ला वैज्ञानिक संशोधन पुरस्कार, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार, जे. आर. डी.  टाटा औद्योगिक नेतृत्व पुरस्कार हे त्यातील काही पुरस्कार आहेत. भारत सरकारच्यावतीने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण देऊन गौरविण्यात आले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील माशेलकर यांच्या कामाची दखल घेतली गेली आहे. थर्ड वर्ल्ड ॲकॅडेमी ऑफ इंजिनिअरिंगचे सभासदत्व, लंडनच्या रॉयल सोसायटीचे सभासदत्व, वर्ल्ड ॲकॅडेमी ऑफ आर्ट अँड सायन्सचे सभासदत्व, यु. एस.नॅशनल ॲकॅडेमी ऑफ इंजिनिअरिंगचे सभासदत्व, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर ॲड अप्लाइड केमिस्ट्रीचे सभासदत्व, यूएस ॲकॅडेमी ऑफ इनोव्हेटर्सचे सभासदत्व असे अनेक बहुमान त्यांना देण्यात आले आहेत.

विविध राजकीय पक्षांच्या कारकीर्दीत त्यांनी पंतप्रधानांच्या आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही योगदान दिले.

आपल्या यशस्वी कारकीर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदावर कामे केली. त्यातील काही अशी आहेत. अध्यक्ष, सोसायटी फॉर पॉलिमर सायन्स इन इंडिया; अध्यक्ष, महाराष्ट्र ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस;  अध्यक्ष, मटेरियल रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया; अध्यक्ष, इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमी; अध्यक्ष, इन्स्टिट्यूशन ऑफ केमिकल इंजिनिअर्स, यूके इत्यादी.

भारतात संशोधन करण्यासाठी सुविधा पुरविण्याचे त्यांचे ध्येय आहे. त्यासाठी त्यांनी नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनची स्थापना केली. फाउंडेशनच्या स्थापनेपासून २०१८ पर्यंत ते स्वत: या संघटनेने अध्यक्ष होते. वैयक्तिक स्तरावर नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या मातुश्रींच्या नावाने त्यांनीच स्थापन केलेल्या न्यासाद्वारे अंजनी माशेलकर पुरस्काराची सुरूवात केली आहे. सामाजिक समता साधण्याची केलेल्या नवीन कार्याला हा पुरस्कार दिला जातो.

संदर्भ :

समीक्षक : श्रीनिवास केळकर