बर्नाल, जॉन डेस्मंड : (१० मे १९०१ – १५ सप्टेंबर १९७१) जॉन डेस्मंड बर्नाल दक्षिण-मध्य आयर्लंडच्या टिप्पेरारी प्रांतात, नेनाघ भागात जन्मले. बालपणापासूनच बर्नाल इंग्रजी आणि फ्रेंच भाषा उत्तम बोलू शकत. बर्नाल यांचे शालेय शिक्षण इंग्लंडमध्ये, बेडफोर्ड विद्यालयात झाले. त्यांना शाळा फारशी आवडत नसे पण विज्ञान विषय आणि वाचनाची प्रचंड आवड होती. शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी ग्रेट ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठाशी संलग्न, इम्मॅन्युअल महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे बर्नाल यांनी आधी गणित आणि नंतर विज्ञान विषयांचा अभ्यास केला. केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी पहिली पदवी मिळविली.

केंब्रिज विद्यापीठातील खनिजशास्त्राचे प्राध्यापक आर्थर हचिन्सन यांनी, विल्यम हेन्री ब्रॅग (१९१५ चे भौतिकीचे नोबेल पारितोषिक विजेते) यांच्याकडे बर्नाल यांची पीएच्.डी.साठी शिफारस केली होती. रॉयल इन्स्टिट्यूशनच्या संचालकपदी असलेल्या ब्रॅग यांनी, बर्नाल यांना पीएच्.डी.साठी विद्यार्थी म्हणून प्रवेश दिला.

बर्नाल यांनी ब्रॅग यांच्या देखरेखीखाली क्ष-किरण पंक्तिदर्शी क्षेत्रातील संशोधन लंडनमधील डेव्ही फॅरेडे प्रयोगशाळेत केले. त्याच ज्ञानशाखेचे पदव्युत्तर शिक्षण घेऊन बर्नाल केंब्रिज विद्यापीठाच्या अध्यापक चमूत सामील झाले. नंतर ते कॅव्हेन्डिश प्रयोगशाळेचे सहायक संचालक झाले.

लंडन विद्यापीठाच्या बर्कबेक महाविद्यालयात तीस वर्षे बर्नाल कार्यरत राहिले. विविध विषयांत रस असल्याने त्यांचे अभ्यासक्षेत्र विस्तारत गेले. रेण्वीय जीवशास्त्र, आदिजीवांची उत्पत्ती, पृथ्वीच्या बाह्यथराची रचना आणि संघटना (composition) अशा विषयांचाही त्यांच्या संशोधक समूहाने अभ्यास केला.

बर्नाल यांना भौतिकीचे सखोल ज्ञान होते. त्यांच्याकडे क्ष-किरण पंक्तिदर्शी (X-Ray spectroscopy) तंत्र वापरण्याचे कौशल्यही होते. यांचा एकत्रित उपयोग करून त्यांनी घन पदार्थांच्या आण्विक रचनेबद्दल अनेक शोध लावले.

बर्नाल, त्यांचे सहकारी आणि विद्यार्थी यांनी क्ष किरण वापरून, सजीवांच्या शरीरातील मोठ्या रेणूंच्या त्रिमित रचनेचा अभ्यास करण्याचा चंग बांधला. हिमोग्लोबीन आणि मायोग्लोबीन प्रथिनरेणूंची त्रिमित रचना बावीस वर्षांच्या अथक संशोधनानंतर मॅक्स पेरूत्झ यांनी  शोधली.  हिमोग्लोबीन रेणूंची रचना उलगडल्याबद्दल पेरूत्झ यांना १९६२ चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.

बर्नाल आणि त्यांची विद्यार्थिनी, डोरोथी हॉजकिन यांनी पाण्याच्या रेणूंची आणि जठरात स्रवणाऱ्या, पेप्सीन या विकराच्या स्फटिकरेणूंची रचना अभ्यासली. कालांतराने हॉजकिन यांना पेनिसिलीन प्रतिजैविकाची रचना ठरवल्याबद्दल रसायनशास्त्राचे १९६४ चे नोबेल पारितोषिक मिळाले.

बर्नाल यांना नोबेल पारितोषिक मिळाले नाही पण त्यांच्या जॉन केंड्र्यु, या बर्नाल यांच्या विद्यार्थ्यांस रसायनशास्त्राचे १९६२ मधील नोबेल पारितोषिक मिळाले. ज्या वैद्यकीय संशोधन गटाचे प्रमुख मॅक्स पेरूत्झ होते अशा केंब्रिज विद्यापीठाच्या कॅव्हेन्डिश प्रयोगशाळेतच, फ्रान्सिस क्रिक यांनी डीएनए रेणूरचनेच्या अभ्यासाची सुरुवात केली होती. त्यांनाही १९६२ याच वर्षी वॉटसन यांच्याबरोबर नोबेल पारितोषिक मिळाले.

बर्नाल यांच्या कार्यकाळात संगणक नव्हते. स्फटिकरचनेचे अंदाज गणिती कौशल्याने केले जात. बर्नाल यांनी त्यांची तल्लख गणिती बुद्धी वापरून स्फटिकतज्ज्ञांना स्फटिकांची रचना नक्की करण्यास उपयुक्त असे तक्ते बनवले. बर्नाल यांच्या स्फटिकशास्त्रातील दृष्टिमुळे आणि बर्नाल-तक्त्यांमुळे त्यांना या पदार्थांची दृकरचना समजे.

स्पेक्ट्रोगोनिओमीटर नावाचे उपकरणही बर्नाल यांनी बनवले. ग्राफाइटची रचना शोधून काढली.  तसेच हिम, बर्फ अशा पाण्याच्या विविध घनरचना अभ्यासल्या.  याखेरीज ईस्ट्रॅडायोलसारखी लैंगिक संप्रेरके, कोलेस्टेरॉल, थायमीन – बी-१ आणि डी-२ ही जीवनसत्वे, प्रथिने, टोबॅको मोझाईक विषाणू यांचा अभ्यास केला.

क्ष-किरण पंक्तिदर्शी (X-Ray spectroscopy) जीवभौतिकी तंत्राचा रेण्वीय जीवशास्त्रात वापर करणारे बर्नाल हे पहिले शास्त्रज्ञ होत.

बर्नाल यांनी आपल्या क्षेत्रातील विद्वानांसाठी प्रख्यात वैज्ञानिक नियतकालिकांतून अनेक शोधनिबंध लिहिले.  विज्ञानाचा इतिहास, तसेच विज्ञान आणि समाज या विषयावर जनसामान्यांसाठीही भरपूर लिखाण केले.

दुसऱ्या महायुद्ध काळात अनिवार्य लष्करी काम म्हणून बर्नाल यांनी इंग्लंडच्या नौसेनेसाठी फ्रांसमध्ये मलबेरी नावाच्या कृत्रिम बंदराच्या रचनेचा आराखडा तयार केला. शांतता प्रस्थापित झाल्यावर बर्नाल विज्ञान समाजाला जागृत, विवेकी, तर्कनिष्ठ बनवण्यास कसे उपयोगी पडेल या दृष्टीने प्रयत्न करीत राहिले. युद्धात दोन्ही बाजूंची प्रचंड हानी होते. सबब युद्ध होऊच नये यासाठी विविध देशांच्या धुरीणांनी शस्त्रनिर्मिती पूर्ण थांबवावी. ते न जमल्यास त्याचे प्रमाण अगदी नगण्य ठेवावे यासाठी ते सतत प्रयत्नशील असत.

समाज परिवर्तनासाठी उपयुक्त असे लिखाण त्यांनी सातत्याने केले. त्यात प्रकाशित झालेल्या, द सोशल फंक्शन ऑफ सायन्स आणि सायन्स इन हिस्टरी अशा दोन मौलिक ग्रंथांचा समावेश होतो.

सायन्स इन हिस्टरी हा चार खंडांचा ग्रंथराज आहे. त्यात अश्मयुगीन हत्यारे बनवून ते वापरणाऱ्या मानवापासून हायड्रोजन बॉम्ब निर्मिणाऱ्या मानवापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतला आहे. विविध देशांत, संस्कृतींमध्ये आणि काळात विज्ञानविचार, वैज्ञानिक पद्धती कशी प्रगत होत गेली किंवा विज्ञानविचारांचे कसे दमन केले गेले याचे वर्णन आहे.

डाव्या विचारसरणीच्या प्राणीशास्त्रज्ञ, सॉली झकरमन यांनी स्थापन केलेल्या, एका संघाचे ते सदस्य झाले. झकरमन नंतर ब्रिटनचे पहिले विज्ञान सल्लागार झाले.

बर्नाल यांना विज्ञान उपयोजनासाठीचे रॉयल पदक, ग्रोशिअस सुवर्ण पदक आणि स्टालिन शांतता पुरस्कार असे सन्मान मिळाले. प्रतिष्ठेचे मानले जाणारे फ्रेडरिक गथ्री स्मृती भाषण आणि बेकरियन स्मृती भाषण देण्यास त्यांना आमंत्रित केले गेले. तसेच रॉयल सोसायटीचे सदस्यत्वही बर्नाल यांना दिले गेले. बर्नाल जागतिक शांतता समितीचे सहा वर्षे अध्यक्ष होते. विज्ञानाचे विज्ञान आणि विज्ञानाचा शांततेसाठी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोग हे बर्नाल यांनी संपूर्ण मानवजातीसाठी दिलेले लक्षणीय योगदान आहे.

लंडन येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा