हिकमन, जेम्स सि. : (२७ ऑगस्ट १९२७ -१० सप्टेंबर २००६) अमेरिकेच्या आयोवा राज्यातील इंडियानोला या गावात हिकमन जन्मले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १६ महिने ते वायुदलात इतिहास लेखक म्हणून काम करीत होते. सिम्पसन महाविद्यालयातून, विमागणितावर भर असलेल्या गणितात त्यांनी पदवी मिळवली. आयोवा विद्यापीठातून गणितीय संख्याशास्त्रातील एम.एस. मिळविल्यावर पाच वर्षे त्यांनी आयोवास्थित बॅंकर्स लाईफ कंपनीत नोकरी केली.
ॲलन टी. क्रेग आणि रॉबर्ट व्ही. हॉग यांच्या मार्गदर्शनाखाली १९६१ मध्ये हिकमन यांनी उत्कृष्ट प्रबंध सादर करत आयोवा विद्यापीठाची गणितातील पीएच्.डी. मिळवली. त्यांच्या प्रबंधात वर्गरूपे (quadratic forms) अंतर्भूत असलेले संख्याशास्त्र वापरून अंतराळांचे (intervals) भाकीत केले होते. पुढे त्यांना आयोवा विद्यापीठाच्या गणित विभागात सहाय्यक प्राध्यापकपद मिळाले. तिथेच सांख्यिकी आणि विमागणितशास्त्र विभाग स्थापण्यात त्यांनी मदत केली आणि तेथे ते पुढे पूर्णवेळ प्राध्यापक झाले. नंतर बॉल स्टेट विद्यापीठातून हिकमन आणि हॉग यांच्या अनुभवसिद्ध मार्गदर्शनातून विमागणितशास्त्राचे अभ्यासक्रम सुरू झाले. हिकमन यांनी विद्यापीठाच्या गणित विभागातर्फे दर आठवड्याला अनौपचारिक चर्चासत्र सुरू केले. यात सदस्य, आपले कार्य, संशोधन याविषयी चर्चा करत, ज्यातून विमागणित आणि विमागणिती समृद्ध झाले. उदाहरणार्थ, जॉन बीकमन यांच्या टू स्टोकॅस्टिक प्रोसेसेस पुस्तकातील प्रारंभीची प्रकरणे त्यांनी येथेच वाचली होती.
हिकमन मॅडिसनस्थित विस्कॉन्सिन विद्यापीठात रूजू झाले. तेथील स्कूल ऑफ बिझनेसचे ते पाच वर्षे अधिष्ठाता तर निवृत्तीनंतरही ३ वर्षे प्राध्यापक होते. तेथील एमबीएच्या अभ्यासक्रमात हिकमन यांनी केलेले कालसुसंगत तर्कसमर्थ बदल हे त्यांचे अविस्मरणीय कार्य ठरले. आधुनिक विमाव्यवसायाच्या गरजा लक्षात घेत अभ्यासक्रमात त्यांनी तंत्रज्ञान व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय व्यवसाय यांसह व्यावसायिक नितीमत्त, हे उपविषय अंतर्भूत केले. विपणन संशोधन (marketing research) आणि वितरण व्यवस्थापन (distribution management) हे नवे अभ्यासक्रमही त्यांनी तयार केले. हिकमन यांनी बनवलेल्या आराखड्यानुसार आणि उद्योजक डेव्हिड ग्रेंजर यांच्या देणगीसह त्यांनी स्वतः उभारलेल्या ४ कोटी डॉलर्स निधीतून, स्कूल ऑफ बिझनेसची नवीन इमारत तेथे तयार झाली.
हिकमन यांचे सहलिखित पहिले महत्त्वाचे पुस्तक फायनाइट मॅथेमॅटिक्स अँड मॅथेमॅटिक्स वुइथ कॅल्क्युलस, प्रकाशित झाले. बॉल स्टेट विद्यापीठाने आयोजित केलेल्या विमागणिती परिषदेत विमागणितावरील ज्या नव्या क्रमिक पाठ्यपुस्तकाची योजना जाहीर करण्यात आली होती, ते मॅथमॅटिक्स सोसायटी ऑफ ॲक्च्युरिजतर्फे (सोसायटी) प्रकाशित झाले. सहलेखक असलेल्या या पुस्तकाची मांडणीही हिकमन यांचीच होती. हे पुस्तक सोसायटीच्या शैक्षणिक उपक्रमाचा गाभा राहिले आहे.
आपल्या कारकिर्दीत हिकमन यांनी विमागणितावर अनेक महत्त्वाचे लेख, शोधनिबंध आणि पुस्तके लिहिली. द ओल्ड-एज क्रायसिस: ॲक्च्युरिअल अपॉर्च्युनिटीज – द १९९६ बोल्स सिम्पोजियम हे त्यांचे पुस्तक सोसायटीने प्रकाशित केले.
बीटा गामा सिग्मा ही व्यावसायिक स्कूलसाठी व्यवसाय-सन्मान देणारी आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्था आहे. या आणि सोसायटीच्या कार्यकारी मंडळावर हिकमन होते. सोसायटीचे ते उपाध्यक्ष आणि अधिछात्रही होते. कॅज्युअल्टी ॲक्च्युरिअल सोसायटीचे ते सहयोगी (associate) होते. केवळ मालमत्ता आणि दुर्घटनांच्या जोखीमांवर संशोधन केंद्रित करणारी आणि जगभरातील ९, ००० पेक्षा जास्त सदस्यांची, ही जगातील एकमेव विमागणिती संस्था आहे. याखेरीज अनेक स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील संस्थांचे आणि समित्यांचे हिकमन सल्लागार होते. आरोग्यसेवा, कामगारांना भरपाई, सामाजिक सुरक्षा इत्यादींवरील आपले ज्ञान आणि अनुभव ते सर्वाना सांगत.
आयुर्विमा आणि निवृत्तीवेतन यातील प्रसंभाव्य (stochastic) पद्धतींचे महत्त्व जाणणारे ते पहिले होते. यामुळेच बहुदा, उत्तर अमेरिकेतील विमागणितशास्त्राची शास्त्रीय संदर्भचौकट विकसित करण्यात हिकमन यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.
विमागणितशास्त्राशी संबंधित साहित्याच्या निर्मितीतील उत्तम योगदानासाठी त्यांना विमागणित शिक्षणाचा संशोधन-निधी स्वरूपाचा, हाल्मस्टाड पुरस्कार दोनदा मिळाला. अद्वितीय अध्यापन, संशोधन आणि जनसेवा यांसाठी त्यांना अमेरिकन विद्यापीठ प्रशासक आणि रॉयल इकॉनॉमिक्स सोसायटीचे अधिछात्र, एर्विन गौमनित्झ यांच्या नावाचे, बिझनेस स्कूलचे डिस्टिंग्विश्ड फॅकल्टी पारितोषिक मिळाले.
व्यवसायाच्या संकल्पनेतच जनतेची सेवा सामावलेली आहे, या हिकमन यांच्या ब्रीदवाक्याला अनुसरून, ते विश्वस्त असलेली ॲक्च्युरिअल फाउंडेशन, सामान्यांचे गणित आणि वित्तीय ज्ञान सुधारण्यासाठी दैनंदिन तत्वावर अनेक कार्यक्रम राबवते किंवा त्यासाठी साधनसामग्री पुरविते.
विमाव्यवसायावर अमिट छाप उमटविणारे हिकमन कर्करोगाने निवर्तले. सोसायटीने त्यांच्या कार्याच्या स्मरणार्थ जेम्स सि. हिकमन शिष्यवृत्ती जाहीर केली.
क्रिटिकल रिव्ह्यू ऑफ द युनायटेड स्टेट्स ॲक्च्युरिअल प्रोफेशन यांनी फायनल रिपोर्ट ऑफ द युएस ॲक्च्युरिअल प्रोफेशन अँड अदर इंटरेस्टेड पार्टीज अहवाल बनविण्यासाठी निर्माण केलेल्या कृतीदलात ते सल्लागार-सदस्य होते. हा अहवाल हिकमन यांच्या मृत्युपश्चात, त्यांचे अमूल्य योगदान अधोरेखित करून, प्रकाशित झाला.
संदर्भ :
- https://www.wikiwand.com/en/James_C._Hickman .
- https://ar.casact.org/the-actuarial-foundation-gives-back/
- https://www.foriowa.org/daa/daa-profile.php?namer=true&profileid=89
समीक्षक : विवेक पाटकर