सिद्दिकी, ओबेद : ( ७ जानेवारी १९३२ – २६ जुलै २०१३) ओबेद सिद्दिकी यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण वाराणसी नगरपालिकेच्या शाळेत तर माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण, डी.ए.व्ही. हायस्कूल कानपूरमध्ये झाले. तरुण वयात सिद्दिकी यांचा छायाचित्रणाकडे कल होता. व्यावसायिक छायाचित्रकार होण्याचा सिद्दीकींचा मानस होता, पण कुटुंबीयांच्या सांगण्यावरून त्यानी तो बदलला.
वनस्पतीशास्त्र विषयातील पदवी आणि पदव्युत्तर हे त्यांचे शिक्षण अलिगढ मुस्लीम विद्यापीठात झाले. वनस्पतींच्या शास्त्रीय नावांची यादी लक्षात ठेवणे आणि वनस्पतींचे वर्गीकरण करणे यावर त्याकाळी भर असे. वर्गीकरणाऐवजी वनस्पतीविज्ञानातील अनुवंशिकताविज्ञानाचे त्यांना आकर्षण वाटू लागले.
अलिगढ मुस्लीम विद्यापीठात १९५४-५७ च्या दरम्यान त्यांनी व्याख्याता पदावर काम केले. त्यांच्या कारकीर्दीचा प्रारंभ कृषितज्ज्ञ म्हणून झाला. वनस्पतींच्या भ्रूणांवर (embryos( आणि गव्हाच्या अनुवंशिकतेवर त्यांच्या संशोधनाची सुरुवात झाली. दिल्लीतील इंडियन ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये त्यांच्या संशोधनासाठी अठरा महिने त्यांनी वाढवलेले गव्हाचे प्रायोगिक वाफे, अचानक आलेल्या हिमवादळ आणि गारपिटीमुळे नष्ट झाले. पुढील मोसमात अनुकूल वातावरणासाठी थांबण्याऐवजी त्यांनी ते संशोधन अर्धवट सोडले.
१९५८-६१ च्या दरम्यान पीएच्.डी.च्या प्रवेशासाठी स्कॉटलंडमधील ग्लास्गो विद्यापीठातील, ग्विडो पॉन्टीकोर्वो यांच्याशी त्यांनी पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या निमंत्रणानुसार सिद्दिकी ग्लास्गो विद्यापीठात गेले आणि पॉन्टीकोर्वो यांनी त्यांना प्रयोगशाळेत फिरवून आणले. निवड होण्याची खात्री नसताना, अनुवंशिकताशास्त्र शिकायला मिळण्याचा ध्यास घेऊन, स्वतःचे पैसे खर्चून, भारतासारख्या विकसनशील देशातला युवक, यूरोपला येतो म्हणून असा खरा ‘विद्यार्थी’, तेथे पोहचताच प्रवेशपात्र ठरला होता. पॉन्टीकोर्वो हे त्यांचे पीएच्. डी.चे मार्गदर्शक, आणि इटालियन संशोधक, जनुकशास्त्र आणि कृषिक्षेत्रातील कामासाठी प्रसिद्ध होते. ‘ॲस्पर्जीलस निद्युलांस’ (Aspergiluus nidulans) या तंतुमय कवकातील बुरशी ‘जनुक पुनःसंयोजन’ (genetic recombination) त्यांनी शोधून काढले होते. ॲस्पर्जीलस कवकाच्या गुणसूत्रांतील पीएबीए १ (paba 1, ParaAmino Benzoic Acid) जनुकाचे स्थान आणि रचना ठरवण्यात सिद्दिकींनी कामगिरी बजावली आणि त्यांना पीएच्. डी. मिळाली.
पुढील अभ्यासासाठी ते पेनसिल्वेनिया विद्यापीठातील ॲलन गॅरन यांच्या चमूत सहभागी झाले. न्यूयॉर्कमधील कोल्ड स्प्रिंग हार्बर प्रयोगशाळेत, एका उन्हाळी सुटीत त्यांनी गॅरनबरोबर जीवाणूंमधील, मुख्यत: इ. कोलाय (E.coli) मधील, उत्परिवर्तनासंबंधी संशोधन केले. ते काम त्यांनी पुढे चालू ठेवले नाही. पण त्यातून पुढे जनुकीय संकेतातील समाप्ती संकेत त्रयी (stop codons- triplet) समूह सापडले. या संशोधनाचा पुढे हॉली, निरेनबर्ग आणि खोराना यांना त्यांचे नोबेल पारितोषिक मिळविण्यास उपयोग झाला. या तिघांनी सिद्दिकींचे श्रेय मान्य केले आहे.
प्रथिन संश्लेषण घडताना अमिनो आम्लांची लांबलचक साखळी योग्य ठिकाणी कशी तोडली जाते, हे समजण्यासही सिद्दिकींचे संशोधन पायाभूत ठरले. वरील दोन्ही संकल्पना रेण्वीय जीवशास्त्रात अत्यंत मूलभूत समजल्या जातात.
सन १९६२ मध्ये भारतातील अणुविज्ञान क्षेत्राची मुहूर्तमेढ रचणारे शास्त्रज्ञ होमी भाभा यांनी टाटा मूलभूत विज्ञान संस्थेचा औपचारिक उद्घाटन समारंभ आयोजित केला होता. त्याप्रसंगी एम.आय.टी.मधील जीवभौतिक शास्त्रज्ञ, वॉल्टर रोझेनब्लीथ यांनी डॉ. भाभा यांना टी.आय.एफ.आर.मध्ये रेण्वीय जीवशास्त्र ज्ञानशाखेचा अंतर्भाव असावा असे सुचवले. भाभा (insert space) यांनी लिओत्झिआर्ड यांच्या शिफारशीवरून सिद्दिकींच्या नावाची निवड केली. नव्याने स्थापन झालेल्या रेण्वीय जीवशास्त्रविभाग अनेक तरुण तसेच काही ज्येष्ठ वैज्ञानिकांना एकत्र आणून जागतिक पातळीवरील संशोधन करून सार्थ ठरविला.
यातूनच पुढे १९९२ साली नॅशनल सेंटर फॉर बायॉलॉजिकल सायन्सिस (NCBS) ची स्थापना करण्यात आली. सिद्दिकींचे बरेचसे संशोधन गोड, पिकलेल्या फळांभोवती आकर्षित होणाऱ्या फळमाशीवर आहे. या फळमाशीचे शास्त्रीय नाव ड्रॉसॉफिला मेलॅनोगॅस्टर (Drosophila melanogaster), १९७०मध्ये सीमोर बेन्झर या अमेरिकन ख्यातनाम रेण्वीय जीवशास्त्रज्ञाबरोबर त्यांनी कॅल्टेक (कॅलिफोर्निया इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), पॅसाडीना येथे काम केले. त्यात उत्परिवर्तन झाले आहे अशा ड्रॉसॉफिला फळमाशा निवडल्या. त्यांच्या जनुकातील एका उत्परिवर्तनामुळे या फळमाशा परिसरातील तापमान बदलाला अतिसंवेदनशील (temperature-sensitive paralytic Drosophila mutants) झाल्या होत्या. त्यांना तापमान बदलामुळे पक्षाघात होत असे. उत्परिवर्तित फळमाशांच्या चेतापेशी आणि स्नायूपेशींच्या पेशीपटलाच्या विद्युत् विभवात आणि आवेग वहनात बदल घडत. त्यांच्या अभ्यासातून स्नायूपेशींचे काम नियंत्रित करणारी काही जनुके लक्षात आली. यातून चेताअनुवंशिकी (neuro genetics) ही चेतासंस्था आणि प्राण्यांची वर्तणूक यावर प्रकाश टाकणारी नवी ज्ञानशाखा उदयाला आली.
सिद्दिकी आणि त्यांची विद्यार्थिनी व्हेरॉनिका रॉडरीग्ज यांनी काही उत्परिवर्तित ड्रॉसॉफिलांचा सखोल अभ्यास केला. त्यामुळे गंध आणि चव यांचे ज्ञान कसे होते यावर प्रकाश पडला. गंध व चव याचे संवेद कोणत्या मार्गाने मेंदूच्या कोणत्या भागाकडे वाहून नेले जातात. या संवेदांचे विश्लेषण, गंध व चव यांचे ज्ञान कसे होते हे समजले. गंध आणि चव यांची स्मृती चेतासंस्थेत कोठे व कशा पद्धतीने साठवली जाते याचे संशोधन पायाभूत ठरले.
सिद्दिकी यांनी अनेक भारतीय व परदेशी ख्यातनाम वैज्ञानिकांसोबत काम केले. अनेक प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिकांत जीवाणूंतील संयुग्मन, दात्याकडून आलेले डीएनए, ग्राहक जीवाणूंच्या डीएनएमध्ये समन्वित कसे होते अशा विषयांवर सिद्दिकी यांचे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.
सिद्दिकी रॉयल सोसायटी, लंडन यांचे सदस्य (FRS) होते आणि प्रोसीडिंग्ज रॉयल सोसायटी, लंडन यांचे संपर्क संपादक सदस्य होते. जर्नल ऑफ बायोसायन्सिस, मॉलेक्युलर अँड जनरल बायॉलॉजी, इंडियन जर्नल ऑफ एक्सपेरीमेंटल बायॉलॉजी, जर्नल ऑफ जेनेटिक्स आणि जर्नल ऑफ केमिकल सायन्सेस अशा प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिकांचे ते सदस्य संपादक होते.
सिद्दिकी महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्सेस, इंडियन अकादमी ऑफ सायन्सेस, इंडियन नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेस, रॉयल सोसायटी, लंडनचे सदस्य होते. थर्ड वर्ल्ड अकादमी ऑफ सायन्सेस त्रिस्ते, इटाली यांनी त्यांना फेलोशिप बहाल केली होती. टी.आय.एफ.आर.मधील प्रदीर्घ कार्यकालातच ते एम.आय.टी. (Massachusetts Institute of Technology ) या प्रतिष्ठित विद्यापीठात अतिथी प्राध्यापक व्याख्याता म्हणून संलग्न होते. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च, ‘शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार’, पद्मभूषण पुरस्कार, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचा आर्यभट पुरस्कार, अलिगढ मुस्लीम विद्यापीठाची मानद डी.एस्सी. आणि नंतर पद्मविभूषण पुरस्कार त्यांना मिळाले.
बंगळुरूमध्ये एका रस्त्यावरच्या अपघातात त्यांना मृत्यू आला.
संदर्भ :
- http://nobelprizeseries.in/tbis/obaid-siddiqi
- https://en.wikipedia.org/wiki/Obaid_Siddiqi
- http://news.ncbs.res.in/archivednews/story/inheritance-culture-celebrating-obaid-siddiqi-80-and-his-founding-tifrs-national-centre-biolog
- https://www.cambridge.org/core/journals/genetics-research/article/fine-genetic-structure-of-the-pabal-region-of-aspergillus-nidulans/6F2BBEA66850E441BDDD9164A1EECA7B
- https://www.netindian.in/news/karnataka/bangalore/renowned-biologist-obaid-siddiqi-passes-away
समीक्षक : मोहन मद्वाण्णा