कृती संशोधन हे आपण करीत असलेली दैनंदीन व्यवहार किंवा कार्यपद्धती होय. या कार्यपद्धतीचे आकलन होण्यासाठी ज्या परिस्थितीत ही कार्यपद्धती अवलंबिली जाते, त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी केलेली कृती होय. अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ स्टिफन कोवे यांच्या मते, ‘आपले निर्णय व उपक्रम यांबाबत मार्गदर्शन मिळावे, त्यात सुधारणा व मूल्यमापन व्हावे यासाठी आपणच आपल्या समस्यांचा अभ्यास वैज्ञानिक पद्धतीने करणे म्हणजे कृती संशोधन होय’. कृती संशोधन विशिष्ट परिस्थितीत आणि कार्यपद्धतीत सहभागी होणाऱ्या व्यक्तीनेच करावे, असे अपेक्षित आहे. कृती संशोधन ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असून त्यात आपण आपल्या समस्या सोडविण्यात यशस्वी झालो की नाही, झालो असल्यास का यशस्वी झालो, तीमध्ये अधिक सुधारणा होण्यासाठी आणखी काय करता येईल, अशा स्वरूपाचे विमर्षी चिंतन असते. कृती संशोधनाची सुरुवात कुर्ट लेविन यांनी सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्यक्ष कृतीचा आग्रह म्हणून केली असली, तरी नंतरच्या काळात कृती संशोधनावरील वैज्ञानिक पद्धतीचा प्रभाव वाढत गेला आणि मूळ कल्पनेला छेद दिला गेला. अलीकडे कृती संशोधनाचा नव्याने पुनर्विचार होवू लागला. त्यामुळे प्रचलित कृती संशोधन पद्धतीत मूलभूत बदल झालेत.

कृती संशोधन हे वैज्ञानिक पद्धतीवर आधारलेले नसून ते विमर्षशील विचार आणि चिकित्सक दृष्टिकोणावर आधारलेले असते. त्यात सहभागी होणाऱ्या व्यक्तीने प्रचलित कार्यपद्धतींची चिकित्सा आणि परिवर्तन घडवून आणणे अपेक्षित आहे. कृती संशोधनात कृतीला मध्यवर्ती स्थान असते. कृती संशोधनात सहभागी होणारी व्यक्ती हीच संशोधक असते. त्यामुळे कृती संशोधनाचा ‘मी’ किंवा ‘स्वत:’ हा केंद्रबिंदू असतो. यामध्ये ‘मी’ हाच संशोधनाच्या प्रारंभापासून अंतिम टप्यापर्यंत, म्हणजे आराखड्यापासून ते अहवाल लेखनापर्यंत मध्यवर्ती भूमिका बजावित असतो. त्यामुळे ‘मी’चा उल्लेख आराखड्यापासून ते अहवालापर्यंत सातत्याने होणे अपेक्षित असते.

कृती संशोधन एकाच व्यक्तीने करावे असे नसून ते गटात व सहकार्यानेही करता येते. शालेय स्तरावर मी व माझे विद्यार्थी, मी व माझे सहकारी, मी व माझ्या विद्यार्थ्यांचे पालक, मी व माझी शाळा किंवा अन्य शाळा असे क्रमाक्रमाने व्यापक होत जाणारे सहकार्याचे वर्तुळ गृहित धरलेले आहे. कृती संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, असे मानल्यामुळे कृती संशोधनात पडताळून पाहिलेली नवीन उपाययोजना अयशस्वी ठरल्यास अन्य पर्याय कोणते आणि ते नवे पर्याय पडताळून पाहण्याची योजना स्वीकारण्याची संशोधकाची तयारी सुस्पष्टपणे वेळोवेळी प्रतित व्हावी लागते. जर आपली उपाययोजना यशस्वी झाली, तर ती अन्य परिस्थितीत किंवा व्यापक वर्तुळात तशीच यशस्वी होते का, हेसुद्धा कृती संशोधनातून तपासता येते. कृती संशोधनाचा आराखडा लवचिक असतो. प्रत्यक्ष कृती झाल्यानंतर गरज वाटल्यास आराखड्यात बदल करता येऊ शकतात. त्यामुळे आराखड्यात काही मर्यादित गोष्टींचाच विचार पुरेसा होतो.

शिक्षकाला शाळेमध्ये एखाद्या विषयात समस्या निर्माण झाली आणि त्यांनी स्वत: त्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने निराकरण करण्याचे ठरविले, तर त्यांना कृती संशोधनातील स्थूल समस्या कोणती, त्यातील निश्चित समस्या कोणती, समस्या निर्माण होण्याची संभाव्य कारणे कोणती, गृहित कृत्ये काय, समस्या सोडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखाव्यात, मूल्यमापन इत्यादी पायऱ्यांची मदत घ्यावी लागते. तसेच कृती संशोधनाचा आरखडा लिहिताना अनेक प्रश्नांचा वापर केला जातो. त्यामध्ये संशोधनाविषयक प्रश्न कोणता; तोच प्रश्न/तीच समस्या का निवडली; सध्या काय परिस्थिती आहे; त्या परिस्थितीविषयक पुरेसे पुरावे किंवा आधार कोणते; ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण काय करणार; आपण जी कृती केली त्याचा प्रभाव पडला का, हे कसे ठरविणार; त्याला आधार काय; त्याचे मूल्यमापन कसे करणार; त्याची सप्रमाणता कशी आजमावणार आणि जर आपली नवी कार्यपद्धती प्रभावी असेल, तर आपल्या प्रचलित दैनंदिन व्यवहारात कोणत्या सुधारणा करणार अशा अनेक प्रश्नांना धरून आराखडा लिहिला जातो. समस्या स्वत:च्या दैनंदीन कार्यासंदर्भात व स्वत:पुरती मर्यादित असल्याने यात गृहीतके, व्याप्ती मर्यादा इत्यादींचा समावेश नसला, तरी चालतो. आराखडा करण्यापूर्वी संदर्भसाहित्य वाचले, तर ते पूरक पोषक ठरते; परंतु तसा आग्रह नसतो. संशोधकाचा विमर्षी विचार हा अधिक महत्त्वाचा मानला जातो.

कृती संशोधनातील कार्यवाहित सद्य:स्थितीचा शोध आणि त्याविषयक पुरावे गोळा केले जातात. त्यानंतर नवीन कृती योजना, तिचे परिणाम यांचा शोध घेतला जातो. झालेला बदल हा आपल्या कृतीमुळेच झाला का, याविषयीचे काही आधार सादर करावे लागतात. यासाठी जी माहिती प्रात्प करावी लागते, ती एकाच साधनाने आणि मर्यादित स्रोतांकडून प्राप्त न करता अनेक साधने व स्रोतांकडून प्राप्त करणे आवश्यक मानले जाते. यालाच त्रिमितीकरण असे म्हणतात. ही माहिती संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही प्रकारची असते. कृती संशोधन हे विशिष्ट परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी केलेले असल्याने त्याच्या निष्कर्षाचे सामान्यीकरण अभिप्रेत नसते. त्यामुळे अनुमान करण्यास उपयुक्त ठरणारी ‘टी टेस्ट’, ‘ॲनोव्हा’ इत्यादी सांख्यिकीय तंत्र वापरण्याची गरज नसते. वर्णनात्मक सांख्यिकी उदा., ‘मध्यमान’, ‘प्रमाणविचलन’, ‘टक्केवारी’, ‘आलेख’, इत्यादींच्या मदतीनेही माहिती सादर करता येते.

कृती संशोधनाचा अहवाल लेखन तृतीय पुरुषी एकवचनी भाषेत (संशोधकाने असे केले वगैरे) न करता प्रथम पुरुषी एकवचनी भाषेत (उदा., मला असे वाटते, मी असे केले, असे दिसून आले इत्यादी) करावे. म्हणजेच हा अहवाल ‘मी’ किंवा ‘स्वत:’ वर केंद्रीभूत असतो. कृती संशोधन हे ज्या विशिष्ट संदर्भात केलेले असते, ती परिस्थिती सुस्पष्टपणे  मांडणे महत्त्वाचे असते. उदा., संशोधकाची शाळा ज्या गावात आहे तेथील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक परिस्थिती, शाळेचे स्वरूप, आपल्या विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी या सर्वांना अहवालात महत्त्व असते. यामुळे ज्या परिस्थितीत संशोधन झाले, त्या परिस्थितीची कल्पना येते. तशीच परिस्थिती अन्यत्र असेल, तर याच प्रकारचे कृती संशोधन अन्य व्यक्ती करू शकतात. अहवाल सादरीकरणात छायाचित्रे, विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष निर्मितीचे नमुने, अभिप्राय, कथने, भावभावनांची अभिव्यक्ती, अनौपचारिक संवाद इत्यादींचा समावेश आवर्जून केला जातो. भाषेत तटस्थतेपेक्षा वाचनीयतेला प्राधान्य दिले जाते. कविता, अलंकार, अवतरणे, सुविचार, चित्रे इत्यादींचा समावेश अहवालात केला तरी चालतो; मात्र संबंधित साहित्याचा आढावा अशा स्वतंत्र प्रकरणाची गरज नसते. वाचन करू नये, असेही येथे अभिप्रेत नसते; पण आपली समस्या, त्यावरील इतरांचे संशोधन आणि संदर्भसाहित्य यावरील विमर्षी चिंतनाला अधिक महत्त्व असते. आपल्याला  प्राप्त झालेल्या निष्कर्षांवर तज्ज्ञांशी चर्चा करून त्यांचे अभिप्राय सादर करावे लागतात. कृती संशोधन करताना यश-अपयश यावर आधारित विश्लेषण आणि पुढील कार्याची सुस्पष्ट दिशा मांडणे, याला महत्त्व असते.

समीक्षक : बाबा नंदनपवार