अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त असलेली भारतातील एक प्रसिद्ध शैक्षणिक संस्था. संस्थेची स्थापना ‘द हिंदू कॉलेजʼ या नावाने मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन (१७७९–१८५९) यांच्या पुढाकाराने ६ ऑक्टोबर १८२१ रोजी झाली. या संस्थेचे ७ जून १८५१ रोजी ‘पूना कॉलेजʼ असे नामकरण झाले. त्यानंतर सन १८६४ मध्ये ‘डेक्कन कॉलेजʼ हे नाव देण्यात आले. मार्च १८६८ मध्ये संस्था येरवडा भागातील जागेत आली. यासाठी सर जमशेटजी जीजीभॉय यांनी भरघोस देणगी दिली होती.

डेक्कन कॉलेज, पुणे.

डेक्कन कॉलेज हे ब्रिटिश कालखंडात पश्चिम भारतातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र होते. या कॉलेजच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील माजी विद्यार्थ्यांमध्ये सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, गुरुदेव रानडे, विश्वनाथ काशिनाथ राजवाडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, डॉ. द्वारकानाथ कोटणीस, सेनापती बापट, तात्यासाहेब केळकर, कॉर्नेलिया सोराबजी आणि विष्णू नारायण भातखंडे अशा विविध क्षेत्रांमध्ये योगदान देणाऱ्या दिग्गजांचा समावेश आहे.

सन १९३४ मध्ये ब्रिटिश सरकारने डेक्कन कॉलेज बंद केले; तथापि कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी या विरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यांच्या व पुण्यातील शिक्षणप्रेमी नागरिकांच्या प्रयत्नांमुळे उच्च न्यायालयाने कॉलेज पुन्हा सुरू करण्याचा आदेश दिला. त्यानुसार १७ ऑगस्ट १९३९ रोजी ‘डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्थाʼ या नावाने कॉलेज पुन्हा सुरू झाले. १९३९ ते १९९४ या काळात डेक्कन कॉलेजमध्ये प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व, भाषाविज्ञान, मध्ययुगीन व मराठा कालखंडाचा इतिहास, समाजविज्ञान, मानवशास्त्र आणि संस्कृत भाषा या विविध विषयांवर संशोधन केले जात आहे.

सन १९९४-१९९५ मध्ये संस्थेने अभिमत विद्यापीठ म्हणून कामकाज सुरू केले. अभिमत विद्यापीठ झाल्यापासून संस्थेत प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व, भाषाशास्त्र आणि संस्कृत व कोशशास्त्र असे तीन विभाग कार्यरत आहेत. तसेच मराठा कालखंडाच्या इतिहासाची मूळ साधने असणारे स्वतंत्र संग्रहालय येथे आहे.

डेक्कन कॉलेजच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व या विभागाची स्थापना भारतीय पुरातत्त्वाचे जनक प्रा. ह. धी. सांकलिया यांनी केली (१९३९). प्रारंभापासूनच विभागाने देशाच्या सर्व प्रदेशांमध्ये प्रागितिहास ते मध्ययुगीन काळातील स्थळांवर क्षेत्रीय संशोधनाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यांत नेवासा, नाशिक, जोर्वे, अहाड, नावडातोली, कायथा, भीमबेटका, सिंगी तलाव, डिडवाना, टिकोदा, बागोर, चिरकी, सोमनाथ, प्रभास पाटण, हुन्सगी, इसामपूर, बुधिहाळ, माहुरझरी, नैकुंड, इनामगाव, कवठे, कुंतासी, बालाथल, गिलुंड, फर्माना, राखीगढी, गिरावड, शिशुपालगड, ताळपाडा, चौल, वाकाव आणि दौलताबाद इत्यादी महत्त्वाच्या स्थळांचा समावेश आहे. या विभागात पुरातत्त्वीय रसायनशास्त्र, पुरातत्त्वीय प्राणिशास्त्र, पुरातत्त्वीय वनस्पतिशास्त्र, भूपुरातत्त्व, पुरातत्त्वीय संगणनविज्ञान आणि जैविक मानवशास्त्र अशा पुरातत्त्व विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये संशोधनासाठी प्रयोगशाळा आहेत. अशा प्रयोगशाळा एकाच ठिकाणी असणारा हा देशातील एकमेव विभाग आहे. विभागाने संपूर्ण भारतात पुरातत्त्वविद्येच्या वाटचालीत मोलाची भूमिका बजावली आहे.

भाषाशास्त्र विभागाची स्थापना प्रा. सुमित्र मंगेश कत्रे यांनी १९३९ मध्ये केली. आधुनिक भाषाशास्त्राचा हा देशातील सर्वांत जुना विभाग असून भारतात या विषयाचा पाया घालणे आणि त्याची वाढ करणे यात या विभागाचे योगदान अनन्यसाधारण आहे. तसेच मराठी भाषेच्या बोलींचे संकलन करून त्यांचा अभ्यास करण्याचा प्रकल्प या विभागात सुरू आहे.

संस्कृत व कोशशास्त्र विभागामध्ये ऐतिहासिक तत्त्वावर आधारलेला संस्कृतच्या शब्दकोशाचा महाकाय प्रकल्प सुरू आहे.

मराठा इतिहास संग्रहालयात अठराव्या व एकोणिसाव्या शतकातील कागदपत्रे, चित्रे, विविध ऐतिहासिक वस्तू, शस्त्रे, नाणी, ताम्रपट व इतिहासाची इतर अनेक मूळ साधने आहेत. साताऱ्याचे रावबहादूर पारसनीस यांचा संग्रह व जमखंडी संस्थानाची कागदपत्रे यांचा त्यात समावेश आहे.

संस्थेमधील ख्यातकीर्त शिक्षक, संशोधक व विद्यार्थी यांच्यात ह. धी. सांकलिया, रा. ना. दांडेकर, अशोक केळकर, भालचंद्र नेमाडे, वा. वि. मिराशी, विष्णू श्रीधर वाकणकर, यशोधर मठपाल, मधुकर केशव ढवळीकर व के. पदय्या यांचा समावेश होतो.

संदर्भ :

                                                                                                                                                                                समीक्षक : शंतनू वैद्य