रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई : (स्थापना: १ ऑक्टोबर, १९३३) रसायन तंत्रज्ञान संस्था ही मुंबई शहरात असलेली एक अग्रगण्य अशी शैक्षणिक आणि संशोधन संस्था आहे. या संस्थेची सुरुवात १ ऑक्टोबर १९३३ रोजी मुंबई विद्यापीठाचा रसायन तंत्रज्ञान विभाग (University Department of Chemical Technology – UDCT ) म्हणून झाली. या विभागाचे कार्य वाढत गेल्याने १९८५ मध्ये या विभागाला विद्यापीठा-अंतर्गत स्वतंत्र संस्थेचा दर्जा देण्यात आला. २००८ मध्ये या संस्थेचे रसायन तंत्रज्ञान संस्था असे नामकरण करण्यात आले आणि तिला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. विद्यापीठाचा एक विभाग ते अभिमत विद्यापीठ अशी या संस्थेची यशस्वी वाटचाल आहे. मुंबई शहराच्या मध्यभागी सोळा एकराच्या प्रशस्त अशा परिसरात ही संस्था दिमाखात उभी आहे.
उद्योग आणि घरगुती वापरासाठी रोज अनेक रसायनांची गरज असते. देशाच्या प्रगतीसाठी या रसायनांचा दर्जा सुधारणे आणि त्यांच्या निर्मितीसाठी नवनवीन पद्धती शोधून काढणे आवश्यक असते. देशहिताचे हे महत्त्वाचे कार्य रसायन तंत्रज्ञान संस्था मागील अनेक वर्षांपासून करीत आहे. या संस्थेचे देशातील रसायन उद्योगाशी खूप जवळचे संबध आहेत. त्यातून या संस्थेत केलेले संशोधन उद्योगाला लगेच उपलब्ध होते. अनेक रासायनिक उद्योग आपले तंत्रज्ञ या संस्थेत प्रशिक्षणासाठी पाठवित असतात. संस्थेचे कार्य जसे वाढत गेले तसे भुवनेश्वर (ओडिशा) आणि जालना (महाराष्ट्र) येथे या संस्थेच्या विभागीय शाखा काढण्यात आलेल्या आहेत.
या संस्थेत रसायनशास्त्र, रासायनिक तंत्रज्ञान, औषधशास्त्र, रंगशास्त्र, अन्नशास्त्र अशा अनेक विषयांत स्नातक तसेच स्नातकोत्तर पदवीसाठी अभ्यासक्रम शिकविले जातात. येथून प्राप्त केलेली तंत्रज्ञान विषयातील स्नातक पदवी ही इतर विद्यापीठातील पदव्युत्तर पदवीला तसेच येथील त्याच क्षेत्रातले पदव्युत्तर पदवी इतर विद्यापीठातील पीएच्.डी.ला समांतर मानली जाते. रंगद्रव्ये, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योगातील धागे, खाद्य तेले, औषधी आणि बहुवारिके अशा विविध प्रक्रियांच्या तंत्रज्ञानाच्या अभ्यासाद्वारे खालील पदव्या प्राप्त करण्यासाठी येथे शिक्षण व्यवस्था आहे.
१. बॅचलर ऑफ केमिकल इंजिनियरिंग
२. बॅचलर ऑफ फुड टेक्नॉलॉजी, फायबर अँड टेक्स्टाईल, पॉलिमर इंजिनिअरिंग इत्यादी
३. बॅचलर ऑफ फार्मसी
४. मास्टर ऑफ केमिकल इंजिनियरिंग
५. मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी
६. मास्टर ऑफ फार्मसी
७. मास्टर इन प्लॅस्टिक इंजिनिअरिंग
८. एम. एस्सी. केमिस्ट्री, टेक्टाइल केमिस्ट्री, इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स इत्यादी
९. डिप्लोमा इन केमिकल टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट
१०. एम. टेक. इन ग्रीन टेक्नॉलॉजी
या संस्थेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना उद्योग जगतात मोठी मागणी असते. त्यामुळे अनेक हुशार विद्यार्थी या संस्थेत प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असतात.
रसायन अभियांत्रिकी तसेच रसायनशास्त्रात मूलभूत संशोधन हा या संस्थेचा गाभा आहे. संशोधन करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा संस्थेत निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर, संशोधन करण्यासाठी मार्गदर्शन करू शकतील असे अनेक तंत्रज्ञ आणि वैज्ञानिक इथे कार्यरत आहेत. त्यांच्या देखरेखीखाली काम करण्यासाठी तरूण संशोधक मोठ्या संख्येने या संस्थेकडे आकर्षित होत असतात. दरवर्षी पीएच्.डी. पदवी घेऊन अनेक विद्यार्थी या संस्थेतून बाहेर पडतात. त्यांच्या तसेच त्यांच्या मार्गदर्शकांच्या संशोधनातून निर्माण झालेले लेख राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकात प्रसिद्ध केले जातात. त्यामुळे या संस्थेला रसायन अभियांत्रिकी क्षेत्रात जगात मानाचे स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर त्यांच्या संशोधनातून अनेक पेटेंट मिळविण्यात आली आहेत.
जवळपास नऊ दशके ही संस्था अध्यापनाचे आणि संशोधनाचे कार्य करीत आहेत. यातून अनेक कर्तबगार विद्यार्थी बाहेर पडले. त्यातील काही जणांनी उद्योग धंद्यात तर काही जणांनी संशोधन क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी, गुजरात अंबुजा सिमेंट या उद्योगाचे प्रमुख नरोतम सेक्सारिया, घारडा केमिकल्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. के. एच. घारडा हे याच संस्थेचे विद्यार्थी आहेत. तसेच राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे माजी संचालक प्राध्यापक बी. डी. टिळक, त्याच संस्थेचे आणि सी.एस.आय.आर.चे माजी संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर, असे अनेक दिग्गज याच संस्थेचे विद्यार्थी आहेत. ह्या संस्थेत आयुष्यभर प्राध्यापक राहिलेले व शेवटी संचालक असलेले आणखी एक व्यक्तिमत्व म्हणजे रासायनिक तंत्रज्ञानातील सर्वांचे गुरू मानले गेलेले प्रा. एम. एम. शर्मा.
या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी वळावे यासाठी संस्थेत विशेष प्रयत्न केले जातात. भारतातील काही अग्रगण्य उद्योगांची मदत घेऊन २०१३ साली संस्थेत एक नवनिर्मिती विभाग (Entrepreneurship Cell) सुरू करण्यात आला आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर ज्यांना आपला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, अशा विद्यार्थ्यांना येथे मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपले संशोधनाचे कार्य पुढे न्यायला मदत व्हावी यासाठी प्रगत देशातील अनेक संशोधन प्रयोगशाळेशी या संस्थेने करार केले आहेत.
संदर्भ:
समीक्षक : श्रीनिवास केळकर