जागतिकीकरण ही संकल्पना खूप व्यामिश्र, बहुआयामी आणि विवादित आहे. जागतिकीकरण ही एक संकल्पना किंवा प्रक्रिया असून तीमध्ये वस्तू, सेवा, ज्ञान, विचार इत्यादींचा प्रसार जागतिक स्तरावर केला जातो. देशादेशांमध्ये वाढीस लागलेला व्यापार, वस्तू व सेवांना सहज उपलब्ध होणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठ आणि त्यातून जास्तीत जास्त होणारा नफा हे जागतिकीकरण या संकल्पनेत दिसून येते. राज्यशास्त्राचे अभ्यासक अँड्री हेवुड यांच्या मते, जागतिकीकरण म्हणजे अशा आंतरसंबंधांच्या व्यामिश्र जाळ्याचा उदय की, ज्यामधे अतीदूरवर घेतले जाणारे निर्णय, घडणाऱ्या घटना यांनी आपले आयुष्य आकारत असते. भौगोलिक अंतराचे महत्त्व कमी होऊन राष्ट्राराष्ट्रांमधील सीमांचे महत्त्व कमी होत जाते आणि स्थानिक, राष्ट्रीय व जागतिक पातळींवर नेहमी संवाद होत असतो. आंतराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) या संस्थेनुसार जागतिकीकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे विचार, व्यक्ती, वस्तू, सेवा, तंत्रज्ञान, भांडवल यांचा मुक्त संचार होऊन विविध अर्थव्यवस्था आणि समाज यांचे एकीकरण होते.

जागतिकीकरण ही आर्थिक बाबींशी निगडित असणारी संकल्पना असल्याबाबतचा अनेकांचा चुकीचा समज आहे. जागतिकीकरण सामाजिक, सांस्कृतिक, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, भौगोलिक, ऐतिहासिक, राजकीय, आर्थिक इत्यादी आंतरसंबंध असणाऱ्या पैलूंशी निगडित आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ज्ञानशाखा या संकल्पनेच्या वेगवेगळ्या पैलूंवर भाष्य करतात. या संकल्पनेचा आवाका मोठा असल्याने त्याचा केवळ एकाच साच्यातून अभ्यास करणे कठीण आहे.

इतिहास : काही अभ्यासक जागतिकीकरणाची सुरुवात ही मानवी संस्कृती सभ्यतेच्या उदयापासूनची मानतात, तर काही अभ्यासक १९९० नंतर माहिती व तंत्रज्ञानाच्या ओघामुळे झालेल्या बदलांच्या परिणीतीला संदर्भ मानतात. आदान-प्रदान, विनिमय यांना आधारभूत मानले, तर प्राचीन काळातील रस्त्यावर होणारा रेशीम व्यापार, मध्ययुगातील मसाल्याचा व्यापार, पंधराव्या ते अठराव्या शतकातील शोधांमुळे स्पेन, पोर्तुगाल, डच, इंग्रज, फ्रेंच व इतर राष्ट्रांची व्यापारासाठी लागलेली चढाओढ हे जागतिकीकरणाचे प्राचीन व मध्ययुगीन टप्पे आहेत. तसेच एकोणिसाव्या शतकातील औद्योगिक क्रांतीनंतर दक्षिण जगाचे झालेले वसाहतीकरण, विसाव्या शतकात दोन जागतिक महायुद्धे व नंतर झालेली पुनर्रचना, १९९० नंतर झालेला सोव्हिएत रशियाचा अस्त आणि लोकशाही व भांडवलशाही या मूल्यांचा उद्घोष करणारे जग, सध्याच्या बहुध्रुवीय जगातील विनिमय इत्यादी जागतिकीकरणाचे विविध टप्पे मानता येतील. या सर्व घटनांचा परिणाम केवळ आर्थिक अगांने झाला नसून विविधांगाने सबंध निसर्ग व मानवी जीवनावर झाला आहे. १९९० नंतर साम्यवादी विचारसरणी असलेल्या सोव्हिएत रशियाचा अस्त झाला आणि अमेरिकाप्रणित एक ध्रुवीय, भांडवलवादी जगाचा उदय झाला. जागतिक व्यापार संघटनेच्या स्थापनेनंतर मुक्त व्यापाराच्या योजना आखल्या गेल्या. राष्ट्रांच्या सीमा क्षीण होऊन आंतरराष्ट्रीय संघटना ताकदीने भूमिका अदा करू लागल्या. माहिती व तंत्रज्ञान आणि आंतरजाल (इंटरनेट) यांमधील प्रगतीमुळे व्यापारविनिमयच नाही, तर विचार आणि लोकविनिमयसुद्धा प्रचंड वेगाने होऊ लागला. हा समकालीन जागतिकीकरण सर्वत्र दिसून येत आहे. १९९० च्या दशकात विकसनशील व अविकसित देशांना खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाला स्वीकृती द्यावी लागली. त्यात भारताचाही समावेश होता. १९९१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडली होती. भारताची अर्थव्यवस्था बंदिस्त असल्यामुळेच हे संकट ओढवले असल्याचे आंतराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेचे (डब्ल्यूबी) मत होते. या संकटातून बाहेर पडण्यासाठी भारताला वरील संस्थांनी दिलेला संरचनात्मक सुधारणा कार्यक्रम स्वीकारावा लागला. त्यानुसार भारताने अर्थव्यवस्थेतील बहुतेक सर्व क्षेत्रांवरील नियंत्रण शिथिल करून ती खाजगी क्षेत्रासाठी खुली केली. अर्थव्यवस्थेचे टप्प्याटप्प्याने शिथिलीकरण करून तिला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यात आले आणि भारत जागतिकीकरणाच्या प्रक्रियेशी जोडला गेला.

जागतिकीकरणाचे परिणाम : आज जागतिकीकरण हे सर्वव्यापी झाले आहे. पृथ्वीवरील सर्व प्रदेश किंवा मानवी समूह प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीत्या जागतिकीकरणामुळे प्रभावित झाले आहे. या प्रक्रियेमुळे मानवी जीवनावर अनेक परिणाम झालेत.

राजकीय परिणाम : राज्याच्या क्षमतांचे क्षरण होते म्हणजेच जगभरातील सरकारे त्यांना जे करायचे ते करू शकत नाहीत. जुन्या ‘कल्याणकारी राज्या’ची जागा आता ‘नवउदारमतवादी राज्य’ घेत आहेत. ज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे आणि नागरिकांची सुरक्षा हीच महत्त्वाची कार्ये समजली जातात. कल्याणकारी योजनांमध्ये साधल्या जाणाऱ्या आर्थिक व सामाजिक कार्यक्रमांमधून माघार घेतली जाते. त्यामुळे बाजार व्यवस्थेचे महत्त्व वाढते. जगभरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांचा शिरकाव व सहभाग यांमुळे सरकारे स्वयंनिर्णय क्षमता हरवून बसतात.

राज्य सरकारे प्रत्येक वेळी शक्ती हरवून बसतातच असे नाही. कायदा व सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा इत्यादी कार्य राज्य सरकारे ताकदीने पार पाडत आहेत. सीमांविरहित कल्पना असणाऱ्या काळात देशादेशांतील इर्षा व शत्रुभाव संपला नाही. त्यामुळे राज्य ही अजूनही महत्त्वाची संस्था आहे. नागरिकांची माहिती मिळविणारी विविध साधने आणि नवतंत्रज्ञान हाती असल्यामुळे राज्ये अधिक ताकदवान झाली आहेत.

आर्थिक परिणाम : जगभरातील भिन्न देशांमध्ये होणारा मुक्त आर्थिक ओघ महत्त्वाचा असला, तरी तो काही वेळा ऐच्छिक आणि काही वेळा आंतरराष्ट्रीय संघटनांच्या किंवा प्रभुत्वशाली देशांच्या दबावात लादलेला असतो. आयात-निर्यात बंधने शिथिल झाल्यामुळे सर्वांना गुंतवणुकीची संधी मिळते; परंतु याचा फायदा श्रीमंत देशांतील मोठ्या कंपन्यांना होतो. त्यांनाच गरीब देशांत गुंतवणुकीसाठी मोकळीक मिळते. यामुळे एकापेक्षा जास्त देशांत उत्पादन करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा उदय झाला. यातून देशांमधील व देशांतर्गत असमानता वाढीस लागल्या.

संगणक, आंतरजाल, संप्रेषण तंत्रज्ञान यांमुळे माहितीचा ओघ वाढला असला, तरी माहितीचे केंद्रीकरण सुखवस्तू वर्गाकडे झाले. त्यातून अंकीय (डिजिटल) विषमतेने जन्म घेतला. स्थलांतर जागतिकीकरणाचे प्रमुख लक्षण असूनही विकसित देशांनी त्यांच्या नागरिकांच्या नोकऱ्या जाऊ नयेत म्हणून व्हिसा धोरणात हवे तसे बदल केले. जगभरात विद्युत (इलेक्ट्रॉनिक) अर्थव्यवस्था आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्था निर्माण झाल्या आहेत.

सांस्कृतिक परिणाम : जागतिकीकरणामुळे जगभरातील समाज-संस्कृतींना धोका निर्माण झाला. सगळीकडे एकसाची किंवा एकसारखी संस्कृती निर्माण होऊ लागल्यामुळे आज जगाची सांस्कृतिक सपाटीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. जागतिक संस्कृतीच्या नावाखाली पाश्चिमात्य संस्कृती जगावर लादली जात आहे. कला, खाद्य, फॅशन, संगीत, मनोरंजन, पर्यटन यांसारख्या उपभोगवादी संस्कृतींची झपाट्याने वाढ झाली. जगभरात मोठमोठ्या शहरांची निर्मिती या उपभोगवादी घटकांवर झाल्याने ठिकठिकाणची शहरे एकसारखी भासू लागली. श्रेणी (कॉर्पोरेट) संस्कृतीचा उदय होऊन तिने उत्पादन आणि स्पर्धा वाढविणाऱ्या मूल्यांना जन्म दिला. जागतिकीकरणात धर्मसंस्था दुबळी होईल असे बोलले जात होते; परंतु धर्मांध संघटना मजबूत होऊन टोकाचा मूलतत्त्ववाद पसरवू लागला. या काळात जाती या विरून जातील अशी भाकिते केली गेली; पण जाती फक्त टिकूनच राहिल्या नाहीत, तर त्या धारदार बनल्या. महिला सबलीकरणाचे चर्चाविश्व पुढे आले असले, तरी स्त्रीत्वाचा साचा घट्टच होत गेला. मोजक्याच भाषा प्रभावशाली बनल्यामुळे जगभरातील बहुसंख्य इतर भाषा परिघाबाहेर फेकल्या गेल्या. त्यातूनच भाषिक संघर्ष तीव्र झाले. प्रत्येक गोष्ट विक्रीयोग्य ठरविल्यामुळे सबंध मानवी जीवनाचे वस्तूकरण झाले. त्याच बरोबर आधुनिक तंत्रज्ञान आणि संवादाच्या जाळ्यामुळे ‘मी टू’, ‘ब्लॅक लाईव्ह्झ मॅटर’ यांसारख्या लोकशाहीवादी चळवळी जगभर पोहोचल्या. अनेक विचार आणि संकल्पनांची जागतिक पातळीवर देवाणघेवाण होऊ लागली. स्वातंत्र्य, समता, बंधुता यांसारख्या लोकशाही मूल्यांचा प्रसार होऊ लागला; परंतु त्याच बरोबर वाढलेल्या जागतिक गरिबी आणि असमानतेने जागतिक दहशतवादाला जन्म दिला. याच जाळ्याचा वापर करून जगभर दहशतवाद फोफावत आहे.

टीका : जागतिकीकरण ही एक विवादित संकल्पना आहे. जागतिकीकरणाच्या संदर्भात विचार करणारे समर्थनवादी, सुधारणावादी आणि चिकित्सावादी असे तीन गट आहेत. चिकित्सावादी अभ्यासकांनुसार समकालीन जागतिकीकरण म्हणजे दुसरे तिसरे काही नसून जागतिक भांडवलशाहीची सुधारित अवस्था आहे, जीमध्ये संख्येने कमी असणारे श्रीमंत लोक आणखी श्रीमंत बनतात आणि बहुसंख्य गरीब लोक आणखी गरिबीत ढकलले जातात. राज्यांच्या स्वयंनिर्धारण क्षमतांवर मर्यादा आल्यामुळे वंचित समूहांचे अधिकार व हित जोपासणे कठीण होते. अनेक जागतिकीकरणविरोधी चळवळींचा जागतिकीकरण या संकल्पनेला विरोध नसून विशिष्ट प्रक्रियेद्वारे होणाऱ्या जागतिकीकरणाला आहे. उदा., साम्राज्यवाद. १९९९ मध्ये जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रीपरिषदे वेळी मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. आर्थिक दृष्ट्या प्रबळ देश अन्यायी व्यापार पद्धतीचा वापर करतात. अविकसित आणि विकसनशील देशांच्या आर्थिक हितांना आकार घेत असलेल्या जागतिक आर्थिक व्यवस्थेमध्ये प्राधान्य नसल्याचा सूर आंदोलकांमध्ये होता.

जगभरातील शेती संकट, पर्यावरणीय संकट, तीव्र होणाऱ्या असमानतेच्या समस्या, असंघटित कामगारांच्या समस्या, वंचित समूहांचे विस्थापन आणि संपत्तीहीनता, तिसऱ्या जगाची पराधीनता, टोकाची परात्मता, जागतिक दहशतवाद इत्यादींची मुळे थेट जागतिकीकरणात दडली असल्यामुळे काही अभ्यासक जागतिकीकरणास ‘नववसाहतीकरण’ अथवा ‘नवी गुलामगिरी’ संबोधतात. समूहांची ओळख पुसली जाणे, तसेच लहान भाषा संकटात येणे हेसुद्धा जागतिकीकरणाचेच दुष्परिणाम आहेत. त्याविरोधात देशीवादाचे चर्चाविश्व पुढे येत असून जागतिकीकरणाला स्पष्ट नकार देत आहेत.

उलरिख  बेक या विचारवंतांच्या मते, जागतिकीकरणाने अनेक जोखिमांना जन्म दिला असून ही आधुनिक काळातील जोखीम मानवनिर्मित आहे. अणुबॉम्ब, संसर्गाचे रोग यांसारख्या मानवनिर्मित गोष्टींमुळे निर्माण झालेल्या आजच्या आधुनिक समाजाला ते ‘रिस्क सोसायटी’ म्हणतात. प्रगत तंत्रज्ञानाबरोबर एक मोठी जोखीम आजच्या समाजात अस्तित्वात आहे आणि जागतिकीकरणाने ती अधिक ठळक केली आहे. राज्याचे सार्वभौमत्व काही बाबतींत क्षीण, तर काही बाबतींत ताकदवान बनत आहेत. अर्थव्यवस्थेतील काही समूह सधन बनत आहेत, तर काही गरीब होत आहेत. काही ठिकाणी बहुसांस्कृतिकता रुजत आहे, तर कुठे सपाटीकरण चालू आहे. काही समूह ‘आंतरजालीय आभासी जगात’ वावरतात, तर बहुसंख्य त्यापासून वंचित राहतात.

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत विरोधाभासी जगाची निर्मिती झालेली दिसत आहे. यामुळेच सर्वसमावेशक जागतिकीकरणाची, जागतिकीकरणाच्या लोकशाहीकरणाची मागणी जोर धरत आहे. जागतिकीकरणामुळे आज जग अशाप्रकारे जोडले गेले आहे की, जगाच्या एका भागात घडणाऱ्या घटनांचे परिणाम सर्व जगावर होत आहे. देशांमधील परस्पर अवलंबित्व वाढले आहे. कोरोनासारख्या महामारीचा जागतिक पातळीवरील प्रसार हे जागतिकीकरणाचे एक मोठे उदाहरण आहे. ब्रिटन, अमेरिका यांसारखी विकसित राष्ट्रे आणि लोकानुनय करणारी इतर राष्ट्रांतील सरकारे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेपासून पराङ्मुख होत पुन्हा संरक्षणवादाची कास धरू लागली. सध्या कोरोना महामारीमुळे जागतिकीकरणाला काही प्रमाणात खीळ बसल्याचे दिसून येते.

संदर्भ :

  • जैन, नीरज, जागतिकीकरण की नवी गुलामगिरी, पुणे, २००२.
  • भागवत, विष्णू, जागतिकीकरण नवीन गुलामगिरी, नागपूर, २००४.
  • कांबळे, उत्तम (संपा.), जागतिकीकरणातील सांस्कृतिक संघर्ष, पुणे, २०१३.
  • Heywood, Andrew, Global Politics, London, 2011.
  • Vanham, Peter, A Brief History of Globalization, 2019.
  • Varshney, Ashutosh, Globalisation in Retreat, Mumbai, 2017.

समीक्षक : जोशी, मधुरा