पितृसत्ता ही एक सामाजिक रचना असून ती पुरुषांचे वर्चस्व आणि श्रेष्ठत्व या कल्पनेवर आधारित आहे. ‘पित्याची सत्ता’ असा पितृसत्तेचा अर्थ होतो. पितृसत्ता ही अशी सामाजिक संरचना आहे की, ज्यामध्ये वडील किंवा सर्वांत वयस्कर पुरुष कुटुंबाचा प्रमुख म्हणून मानला जातो. पितृसत्ता वंश, परंपरा व खाजगी मालमत्ता हे पुरुषांच्या माध्यमातून निश्चित केली जाते. पितृसत्ताक समाजात ‘पुरुष’ हाच प्रभुत्वशाली ठरतो आणि त्याला प्रतिष्ठा मिळते. त्यामुळे त्याची आवड, निवड, स्वातंत्र्य आणि मत हे नेहमीच विचारात घेतले जाते. दुसऱ्या बाजूला स्त्रिया कितीही संयमी, तार्किक विचार करणाऱ्या असल्या, तरी त्यांना समाजामध्ये दुय्यमच स्थान मिळते. त्यांना त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक स्थानानुसार कमीअधिक प्रमाणात लिंगाधारित शोषणाला व विषमतेला सामोरे जावे लागते. स्त्रियांवर पुरुषांचे व जात-धर्मांचे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी बालविवाह, विधवा सक्ती, सती, शरीराचे पावित्र्य आणि लैंगिकतेवर नियंत्रण इत्यादी बाबी मुख्यतः पितृसत्ताक समाजामध्ये स्त्रियांवर लादलेल्या दिसून येतात.

कुटुंब हे सामाजिकीकरणाचे केंद्र मानले जाते. कुटुंबामध्ये मुलगा जेव्हा मोठा होतो, तेव्हा कुटुंबातील स्त्रियांच्या रक्षणाची, उदरनिर्वाहाची आणि त्यांच्या मूलभूत गरजा पार पाडण्याची जबाबदारी ही त्याच्यावर असते. या जाणिवेतूनच त्याची घडण होते; तर मुलींची घडण होताना नेहमी ‘परक्याचे धन’ असे शब्द तिच्या मनावर बिंबविण्यात येतात. स्त्रियांना कुटुंबात मिळणारी भिन्न वागणूक आणि सत्तासंबंध हे तिच्या दुय्यमत्वाला कारणीभूत असल्याचे दिसून येतात. त्यामुळे कर्ता म्हणून साहजिकच पुरुषाला समाजात मान्यता मिळते आणि स्त्रियांच्या श्रमाचे (घरातील आणि घराबाहेरील) अवमूल्यन केले जाते.

स्त्रियांच्या दुय्यमत्वाचे विविध पैलू आणि त्याची व्यापकता समजून घेण्यासाठी पितृसत्ता ही महत्त्वाची संकल्पना आहे. पुरुष हे पितृसत्ताक संरचनेचे प्राथमिक लाभार्थी आहेत आणि स्त्रियांच्या दुय्यमत्वातून पुरुषाचे वर्चस्व टिकून राहते. त्यामुळे या संरचनेला शह देण्याची गरज असल्याबाबतचे मत जहाल स्त्रीवादी मांडतात. पुरुषांद्वारे स्त्रियांवर पद्धशीरपणे करण्यात येणाऱ्या वर्चस्वाला त्यांनी पितृसत्ता म्हटले आहे. मार्क्सवादी अभ्यासकांनी स्त्रियांच्या दुय्यमत्वाचा संबंध उत्पादन आणि भांडवलशाही पद्धतींशी जोडला; तर स्त्रीवादी अभ्यासकांनी उत्पादन आणि पुनर्उत्पादन यांची पुनर्व्याख्या करून पितृसत्ताविषयी अधिक विश्लेषणात्मक लिखाण केले आहे. पितृसत्ता म्हणजे वडील किंवा कुटुंबातील सर्वांत मोठ्या पुरुष सदस्याची सत्ता होय. या सत्तेच्या माध्यमातून पुरुष केवळ स्त्रियांवर नियंत्रण ठेवत नाही, तर कुटुंबातील इतर तरुण आणि सामाजिक किंवा आर्थिक दृष्ट्या गौण पुरुषांवरही नियंत्रण ठेवतात. पितृसत्ता ही एकसंध आणि स्थिर अशी संरचना नाही, तर पितृसत्तेच्या सरावामध्ये विविधता दिसून येते.

पूर्वी सती प्रथा, सक्तीचे वैधव्य अथवा स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण या गोष्टी सर्व जातींमध्ये अस्तित्वात नव्हत्या; तर त्या प्रथांचे अथवा चालींचे अनुकरण काही विशिष्ट जातींतून एका विशिष्ट टप्प्यानंतर आले. विवाह, पुनर्विवाह अथवा विधवाविवाह या पद्धतींमध्ये भिन्नता दिसून येते. दलित जातींमध्ये पितृसत्ता ही कठोर असल्याचे दिसून येत नाही. तेथे वाटाघाटीसाठी जागा आहे; परंतु अंतिमतः सत्ता ही पुरुषांच्याच ताब्यात असलेली दिसून येते. शाहा बानो, तोंडी (ट्रिपल) तलाक, हदिया किंवा स्त्रियांच्या मंदिर प्रवेशाचा मुद्दा अशा अनेक प्रकरणांतून समुदाय आणि पितृसत्ता यांतील आंतरछेदितता जास्त स्पष्ट होत जाते.

समाजामध्ये वेतनिक श्रम, घरगुती उत्पादन, संस्कृती, लैंगिकता, हिंसा आणि राज्य या सहा पितृसत्ताक संरचना असून त्यांद्वारे स्त्रियांवर नियंत्रण मिळवून पुरुषी सत्ता स्थापन करता येते. या सहा संरचना स्त्रियांच्या भिन्न सामाजिक स्थानानुसार वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावर परिणाम करतात. तसेच पितृसत्तात्मक संरचना बदलू शकतात आणि पुरुष व स्त्रिया या दोघांच्या कृतींचा या संरचनेवर परिणाम होऊ शकतो. या संरचना स्त्रियांना दुय्यम मानून त्यांचे शोषण करतात आणि स्त्रियांच्या दुय्यम स्थानाचे सामान्यीकरण करून त्यांच्या दुय्यमत्वाचे समर्थन करतात. अजूनही बहुतांशी स्त्रिया विनावेतन श्रमाचा अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे घरगुती श्रमामध्ये वैयक्तिक पातळीवर पुरुषांना स्त्रियांच्या विनावेतन श्रमाचा फायदा होतो. २०१९ मध्ये राष्ट्रीय आकडेवारी कार्यालयाने (नॅशनल स्टॅटिस्टिक ऑफिस) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात सुमारे ८०% महिला विनावेतन कामामध्ये सहभागी आहेत.

पितृसत्ताक व्यवस्था ही श्रमाबरोबरच लैंगिकतेचेही दुहेरी मानक स्त्रियांवर लादून पुरुषांना लैंगिक स्वातंत्र्य देते. स्त्रियांवर लैंगिक बंधने लादली जाऊन ज्या स्त्रिया ही बंधने नाकारतात, त्यांना व्यभिचारी ठरवून हिंसेच्या माध्यमातून त्यांच्यावर नियंत्रण मिळविले जाते. भांडवली बाजारामध्ये स्त्रियांचे वस्तूकरण करून त्यांच्यावर सौंदर्याचे विविध निकष लादले जातात. काही अंशी शासनाची भूमिकाही पितृसत्तेला साजेशी असलेली दिसून येते. त्यामुळे पितृसत्तेची विविध सामाजिक संस्थांसोबत असलेली युती (उदा., जात, धर्म, वर्ग, कायदा, राज्य इत्यादी.) आणि त्यांचे एकमेकांवर असलेले अवलंबित्व व गुंतागुंत समजून घेतली, तर स्त्रियांचे दुय्यमस्थान, त्यांचे महत्त्व, त्यांची शुद्धता आणि पावित्र्य या बाबी स्पष्ट होतील. पितृसत्ता ही सामाजिक संस्था निश्चितच विशेषाधिकार, शोषण आणि उतरंडीवर आधारलेली आहे. पितृसत्ता ही जशी स्त्रियांना घातक आहे, तशीच ती पुरुषांनादेखील घातक आहे. ज्या व्यक्ती पितृसत्तेचे नियम व अटी पाळतात, त्यांना सदरच्या संरचनेमध्ये मान्यता आणि व्यक्तीच्या सामाजिक स्थानानुसार काही विशेषाधिकार मिळतात. याउलट, ज्या व्यक्ती या नियम व अटींना जुमानत नाही, त्यांच्या वाट्याला अवहेलना, मानखंडना आणि विषमताधारित वागणूक येते. पितृसत्ता ही स्त्रियांना जशी एका साच्यात बंधिस्त करते, तशीच ती विशिष्ट पुरुषांनाच समाजामध्ये मान्यता देते. त्यामुळे बायकी पुरुष, तृतीयपंथी, समलिंगी अथवा पुरुषी बायका या पितृसत्तेच्या संरचनेस नेहमीच समस्या बनतात. त्यांना बहुतकरून परिघावर ढकलले जाते किंवा त्यांना अवहेलना सहन करावी लागते.

पितृसत्ता ही वेगवेगळ्या माध्यमातून पुनरुत्पादित होते. उदा., हिंसा, माध्यमांमधील रूढीवादी प्रतिनिधित्व, कायदे इत्यादी. त्याच प्रमाणे काही अभ्यासकांच्या मते, दैनंदिन भाषा ही पितृसत्ताक आहे. त्यामध्ये लिंगाधारित विनोद, शिव्या, म्हणी या पितृसत्ता आणि लिंगाधारित भेदभाव पुनरुत्पादित करत असतात. त्यामुळे दैनंदिन भाषेत दडलेले पितृसत्ताक सराव चिकित्सक रीत्या पाहणे आवश्यक आहे.

पितृसत्ता ही स्वतंत्र रीत्या काम न करता समाजातील विविध सामाजिक, धार्मिक संरचनेसोबत काम करत असते. त्यामुळे यातील आंतरच्छेदिता अभ्यासने आवश्यक आहे. त्याच प्रमाणे पितृसत्तेविषयी मांडणी करताना बरेचदा पुरुष स्त्रियांवर कसे वर्चस्व स्थापन करतात, यावर लक्ष केंद्रित केले जाते; मात्र पुरुष एकमेकांवर कसे वर्चस्व गाजवितात आणि पुरुषांच्या एकमेकांवरील वर्चस्वामध्ये जात, धर्म, वर्ग, लिंगभाव हे कशाप्रकारे भूमिका बजावितात यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. पितृसत्ताविषयी मांडणी करताना बहुविध आणि एकमेकांमध्ये गुंतलेल्या पितृसत्ताक व्यवस्था इत्यादींचा अभ्यास करणेही महत्त्वाचे आहे.

संदर्भ :

  • Bhasin, K., What is Patriarchy? , Delhi, 1993.
  • Geetha, V., Patriarchy, Kolkata, 2009.
  • Ilaiah, K., Why I am not a Hindu, Delhi, 2005.
  • Walby, S., Theorizing Patriarchy, Hoboken-New Jersey, 1990.

समीक्षक : स्वाती देहाडराय