ओडिशा राज्यातील सर्वांत जुन्या जमातींपैकी एक आदिवासी जमात. ही जमात गोंड जमातीच्या जवळची मानली जाते. ही जमात ओडिशा राज्यातील कटक, कोरापूट, नोवरंगपूर, मलकांगिरी, बोलनगिरी, सुंदरगढ, मयूरभंज, संबळपूर या जिल्ह्यांत; तसेच बिहार राज्याच्या काही जिल्ह्यांत यांचे वास्तव्य आहे. या जमातीची लोकसंख्या २०११ च्या जनगणेनुसार १८,१५१ इतकी होती.

धारुआ जमातीच्या उत्पत्तीबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. धारुआ भाषेनुसार धारुआ म्हणजे ‘धरा’ (धरणे-पकडणे) होय. साप व पक्षी पकडणे हा त्यांच्या पारंपरिक व्यवसायापासून धरा हा शब्द आला असावा आणि यावरून जमातीस धारुआ हे नाव पडले असावे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे; तर काहींच्या मते, धूळ (डस्ट) यापासून धारुआ हे नाव पडले असावे. धारुआ जमातीचे बडा धारुआ आणि छोटा धारुआ असे दोन सामाजिक भाग आहेत. बाग, नाग, कदम, बांगसेओ, हाती ही त्यांची कुळे असून झिंगीरा, भट, बडी, माठा आणि बिहारी या त्यांच्या उपशाखा आहेत. धारुआ ही त्यांची मूळ भाषा असून या भाषेला ‘पारजी’ भाषा असेही म्हणतात. ही द्रविडियन प्रकारची भाषा आहे. हे लोक घरामध्ये बंगाली आणि ओरिया या भाषा वापरतात; तर परस्परांत व बाहेर हिंदी, बंगाली, कुडामली या भाषांचा वापर करतात.

धारुआ जमातीची वस्ती मुख्यत: जंगलात आढळून येते. त्यांची घरे माती आणि झाडांच्या झावळ्यांपासून बांधलेली असतात. धारुआ पुरुष धोतर आणि अंगात बंडी घालतात, तर स्त्रिया सुती कापडाची साडी आणि चोळी घालतात. ही जमात भूमिहीन आहे. त्यामुळे दुसऱ्यांच्या शेतावर मजुरी करणे, शिकार करणे, सापळा रचून पक्षी, प्राणी पकडणे, साप पकडणे, गवताच्या काड्यांपासून दोरे बनविणे, हातमाग इत्यादी व्यवसाय ते करतात. भात आणि गहू हे त्यांचे प्रमुख अन्न असून ते मांसाहारी आहे.

धारुआ जमातीमध्ये मुलींची बोली लावून (‘सगून बिहा’ किंवा ‘गोना पऱ्हा’) अथवा मुलींच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने (धुकू बिहा) लग्न लावले जातात; मात्र आता ही प्रथा हळूहळू कमी होताना दिसून येते. लग्न त्यांच्या उपशाखेतच केले जातात. भांगात सिंदूर आणि लोखंडी बांगड्या हे स्त्रियांच्या सौभाग्याचे प्रतिक मानतात. जमातीत घटस्फोटास मान्यता असून पुनर्विवाह चालतात.

धारुआ लोक बंडना, तुसु, कारम, शिवगजन, राजसंक्रांत, गम्बा, लेंडीपंडा, घियापंडा इत्यादी सण साजरे करतात. सण-समारंभाच्या वेळी ते ‘झूमर’, ‘दरी’ किंवा ‘उरा’ ही गाणी गाऊन सण साजरे करतात. हे लोक बहुदेवतावादी असून ते ग्रामसीरी, भगत बुरी, भैरब बुरी, डाकीन, इस्तिपाल, रामकीन, बुरादेव, गरमथान, इस्तीपात, आसमंगला, बिर्बु (पृथ्वी माता) इत्यादी देवांची उपासना करतात. ते लेंडिपंडा हा सण जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यांत साजरा करतात. या वेळी ते कोंबडे, बकरे आणि डुक्कर यांचा बळी देता. हा सण नवीन धान्य, नवीन फळे येण्यापूर्वीचा असतो. त्यानंतरच ते आंबा, मोहफूल इत्यादी नवीन फळे-फुले खातात. एप्रिल ते मे या महिन्यांत ते घियापंडा हा सण ‘वार्षिक शिकार संमारंभ’ म्हणून साजरा करतात.

धारुआ जमातीमध्ये मृत्युनंतर दहन करण्याची पद्धत आहे. मृत्युनंतर ते दहा दिवस दुखवटा पाळतात. भूत, आत्मा, जादुटोणा यांवर त्यांचा विश्वास आहे. आत्म्यास शांती लाभावी यासाठी ते जनावरांचा बळी देतात, तसेच जमातीला जेवण देतात.

धारुआ जमातीची उच्च पारंपरिक संघटित परिषद असून ‘सरदार’मार्फत जमातीतील तंटे सोडवून अंतिम निकाल दिला जातो. आज धारुआ जमातीतील लोक गाव-शहरांशी आणि इतर समाजांशी संपर्कात येत आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनशैलीत हळूहळू बदल होताना दिसून येत असून त्यांची मुले शिक्षण घेत आहेत.

संदर्भ :

  • Singh, K. S., People of India, Oxford, 1998.

समीक्षक : लता छत्रे