भारतातील मध्य प्रदेश राज्याच्या दक्षिणमध्य भागातील डोंगररांगा. वालुकाश्मयुक्त खडकरचना या डोंगररांगांत आढळते. महादेव डोंगररांगा हा सातपुडा पर्वताचाच एक भाग असून यांमध्ये छोटीछोटी पठारे व तीव्र उताराचे कडे आढळतात. पश्चिम-पूर्व दिशेत पसरलेल्या सातपुडा पर्वताचा मध्यभाग बैतूल या लाव्हाजन्य पठाराने व्यापलेला असून तो उत्तरेस महादेव टेकड्यांनी, तर दक्षिणेस गाविलगड टेकड्यांनी सीमित केलेला आहे. महादेव डोंगररांगांची निर्मिती कार्बॉनिफेरस कालखंडात (सुमारे ३६० ते ३०० द. ल. वर्षांपूर्वी) झालेली असावी. या डोंगररांगांचे उत्तरेकडील उतार मंद व दक्षिणेकडील उतार तीव्र आहेत. दक्षिण उताराची उंची १,१०० मीटरवरून एकदम २७५ मीटरपर्यंत कमी झालेली दिसते. मध्य प्रदेश राज्यातील बैतूल, छिंदवाडा व सिवनी या जिल्ह्यांतून नैर्ऋत्य-ईशान्य दिशेत या टेकड्या पसरलेल्या आहेत. सातपुड्यातील सर्वोच्च शिखर धूपगढ (१,३५८ मी.) हे महादेव डोंगररांगात असून ते पंचमढी (१,०६७ मी.) या गिरिस्थानापासून ८ किमी. वर आहे. पंचमढी हे गिरिस्थान याच डोंगररांगांत आहे. चौरागढ (१,३१६ मी.) हे महादेव डोंगररांगांमधील दुसरे शिखर पंचमढीच्या दक्षिणेस १५ किमी.वर आहे. हे आदिवासी लोकांचे धार्मिक ठिकाण असून येथे दरवर्षी
महाशिवरात्रीला यात्रा भरते. महादेव डोंगररांगा आणि त्यांच्या उत्तरेस असलेली विंध्य पर्वतश्रेणी यांदरम्यानच्या ३२ ते ६४ किमी. रुंदीच्या खोऱ्यातून नर्मदा नदी वाहते. या डोंगररांगांमुळे उत्तरेकडील नर्मदा नदीचे खोरे दक्षिणेकडील वैनगंगा व वर्धा (गोदावरीच्या उपनद्या) या नद्यांच्या खोऱ्यांपासून अलग केले आहे. येथील तलशिला तांबट मृदेने आच्छादलेल्या असून त्यांवर पानझडी वृक्षांची अरण्ये आढळतात. या डोंगररांगांत काही प्रमाणात मँगॅनीज व दगडी कोळसा मिळतो. लाकूडतोड, लोणारी कोळसा तयार करणे, खाणकाम, शेती, पशुपालन हे या भागातील लोकांचे व्यवसाय आहेत. शेतीतून गहू, ज्वारी, कापूस इत्यादी पिके घेतली जातात. या भागात प्रामुख्याने गोंड या आदिवासी जमातीच्या लोकांची वस्ती आहे.
समीक्षक : माधव चौंडे