एखाद्या सजीवामधील एखादा अवयव असंख्य वर्षांपूर्वी सक्रीय असून कालांतराने त्याचा वापर कमीकमी होऊन तो बंद झाल्याने सद्यस्थितीत तो अवयव शरीरामध्ये असूनसुद्धा निष्क्रीय असेल, तर त्याला ‘उपर्जित गुणवैशिष्ट्ये आणि आनुवंशिकता’ म्हटले जाते. ही उपर्जित गुणवैशिष्ट्ये आणि आनुवंशिकता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. याला ‘उपर्जित गुणधर्माची आनुवंशिकता’ किंवा ‘बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत’ असेही म्हणतात. फ्रेंच जीवशास्त्रज्ञ झां बातीस्त प्येर लामार्क यांनी इ. स. १८०१ मध्ये आपला ‘लामार्किझम’ हा उत्क्रांतीचा पहिला सिद्धांत मांडून याला ‘इंद्रियांचा वापर आणि न वापराचा सिद्धांत’ (यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन्स) असे म्हटले आहे. हा गुणधर्म पर्यावरणाच्या परिणामाला अनुसरून असून सजीवांची उत्क्रांती होत असताना त्यांच्या शरीररचनेत बदल होतात आणि या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो, असा सिद्धांत त्यांनी मांडला. त्यांनी इ. स. १८०९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या फिलॉसॉफिक झुलॉजी या प्रसिद्ध पुस्तकामध्ये त्यांच्या सिद्धांताविषयी सविस्तर मांडणी केली आहे.
लामार्क यांच्या मते, जिराफ या प्राण्याचे पूर्वज हे दिसायला घोड्याप्रमाणे होते. उत्क्रांतीच्या काळामध्ये झाडांची पाने खाण्यासाठी किंवा अन्न मिळविण्यासाठी त्यांनी मान आणि पुढील पायांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला. त्यामुळे त्यांच्या पायाची व मानेची उंची वाढली आणि ते अवयव, स्नायू विकसित होत जाऊन जिराफ हा प्राणी लांब मानेचा झाला. त्यानंतर हा गुणधर्म पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित झालेला आढळून आला. याच सिद्धांतानुसार लोहारकाम करणाऱ्या लोकांचे खांदे घणाचे घाव घालून बळकट होतात. याउलट, एखाद्या अवयवाचा वापर कमी केल्यास तो अवयव कमकुवत होऊ लागतो. काही दिवसांनी तो अकार्यक्षम होऊन निष्क्रीय होतो आणि शेवटी तो अवयव नामशेष होतो.
सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरूपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना ‘अवशेशांगे’ किंवा ‘शोधांगे’ (वेस्टिजिअल ऑर्गन) असे म्हणतात. मानवामधील अवशेशांगे म्हणजेच या नाहीशा होत जाणाऱ्या इंद्रियांच्या वेगवेगळ्या अवस्था निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीरात दिसतात. एखाद्या सजीवातील एखादा अवयव कार्य करत नसला, तरी दुसऱ्या सजीवात तो अवयव कार्य करत असतो; म्हणजेच दुसऱ्या सजीवासाठी तो अवशेशांग नसतो. मानवाला निरूपयोगी असणारे आंत्रपुच्छ (अपेंडिक्स) हे रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे. याच प्रमाणे मानवाला निरूपयोगी असणारे कानांचे बाह्य स्नायू माकडांसाठी किंवा इतर प्राण्यांसाठी कान हलविण्याकरिता उपयुक्त आहेत. माकडहाड, अक्कलदाढ, अंगावरील केस इत्यादी अवशेशांगे मानवाच्या शरीरात दिसून येतात. प्राणी एखाद्या अवयवाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर करतात किंवा हळूहळू वापर करणे थांबवितात. त्यामुळे वापर केलेला अवयव विकसित होतो किंवा नामशेष होतो. एक कल्पना म्हणून हा विचार योग्य असला, तसेच काही प्रमाणात काही प्राण्यांत असे सिद्ध करता येत असले, तरी सदासर्वकाळ तेच उत्क्रांतीचे कारण असते असे अजिबात नाही. त्यामुळे आधुनिक उत्क्रांती अभ्यासात ही एक कल्पना म्हणूनच पाहिले जाते.
लामार्क यांच्या या सिद्धांतावर वैसमान या शास्त्रज्ञांनी आपले मत मांडले आहे. त्यांनी उंदराच्या शेपट्या कापून टाकल्या आणि त्यांच्यात संकर घडविला. असे बऱ्याच पिढ्या करूनही एकही शेपटी नसलेला उंदीर कधीही जन्माला आलेला नाही. म्हणजे हा गुणधर्म कधीच संक्रमित झाला नाही. याच बरोबर भारतीय व विदेशी महिलांमध्ये कान आणि नाकपुड्यांना टोचणे हा प्रकार आढळून येतो; परंतु त्यामुळे पुढच्या पिढ्यांमध्ये कान किंवा नाकपुड्या जन्मत: छिद्र असलेले किंवा टोचलेले आढळून येत नाही. प्रत्येक वेळी त्या त्या पिढ्यांना ते टोचूनच घ्यावे लागते. म्हणजेच हा गुणधर्म पुढे संक्रमित झाल्याचे दिसून येत नाही. म्हणून लामार्क यांचा सिद्धांत ही उत्क्रांती अभ्यासातील एक कल्पना आहे, असे वैसमान यांनी म्हटले आहे.
संदर्भ :
- जोशी, बी. आर.; कुलकर्णी, पी. के.; कुलकर्णी, शौनक, समाजशास्त्र मानवशास्त्र, पुणे, २००८.
- Bire, H. J., Encyclopedia of Anthropology, London, 2006.
समीक्षक : शौनक कुलकर्णी