जैविक किंवा भौगोलिक परिस्थितिविज्ञानाबाबतचा एक नियम. हा नियम इ. स. १८७७ मध्ये जोएल आसफ ॲलन यांनी सर्वप्रथम मांडला. त्यांच्या मते, थंड प्रदेशांतील उष्माग्राही (डोथर्मिक) प्राण्यांच्या प्रजातींचे हात, पाय इत्यादी अवयव कमी लांबीचे आणि आखूड असतात. याउलट, उष्ण प्रदेशांतील त्याच प्रजातींचे हे अवयव लांब दिसून येतात. थंड हवामानात राहताना शरीरातील उष्णतेचे जतन होण्यासाठी शरीराचे आकारमान लहान, आखूड असणे हे एक अनुकूलन आहे. या नियमास ॲलनचा नियम म्हणून ओळखण्यात येते.
मानवी उत्क्रांती आणि विविधता यांचे एक कारण म्हणजे, सभोवतालचे पर्यावरण आणि नैसर्गिक निवडपद्धत यांच्याशी संबंधित असून आजुबाजूच्या वातावरणानुसार प्राणीमात्रांच्या शरीररचनेत फरक होतो. थंड हवामानाच्या आणि कमी आर्द्रतेच्या प्रदेशांतील लोकांचे नाक लांब व पातळ असल्यामुळे थंड हवा लांब नाकातून गरम होऊन शरीरात जाते; तर उष्ण हवामानाच्या प्रदेशांतील लोकांचे नाक रुंद व लहान असते. ध्रुवीय प्रदेशातील एस्किमो लोकांमधील शरीराचा जाड बांधा आणि छोटे अथवा आखुड हातपाय शरीरातील उष्णता जास्त काळ साठवून ठेवण्यास मदत करतात.
संदर्भ :
- Kottak, Conrad Phillip, Anthropology : The Exploration of Human Diversity, New York, 2000.
समीक्षक : शौनक कुलकर्णी