त्सुरेझुरेगुसा : जपानच्या मध्ययुगीन साहित्यातील महत्त्वाची लेखसंग्रहात्मक साहित्यकृती. योशिदा केनको (कानेयोशी उराबे ) हा या कलाकृतीचा लेखक. केनकोचे वडील आणि भाऊ तत्कालीन गो उदा (१२७४-८७) या राजाच्या राजदरबारात कार्यरत होते. तो सुद्धा गो निजो (१३०१- ०८) या राजाचे नातलग असणाऱ्या होरीकावा तोमोमोरी या सरदाराकडे दिवाण म्हणून कार्यरत होता. कालांतराने त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता. जपानच्या निजो संप्रदायातील प्रमुख कवी आणि लेखक अशी केनकोची ओळख आहे. इ.स.१३३० – ३२ या दरम्यान त्याने या साहित्यकृतीचे लेखन केले आहे. लेखसंग्रहात्मक असणाऱ्या या कलाकृतीमध्ये प्रस्तावनेसह २४३ उतारे आहेत. यातील काही नोंदी या केवळ एका ओळीच्या असून, काही विस्तृत आहेत. बौद्ध धर्माची शिकवण, जीवनाची क्षणभंगुरता, बदलत जाणारे निसर्गाचे रूप आणि काही विनोदी आणि मर्मग्राही लेख या संग्रहात शब्दबद्ध झाले आहेत. केनको बौद्ध भिक्षू झाला तरी तो समाजापासून दूर गेला नाही. त्याची सामाजिक दृष्टी या लेखांमधून प्रतीत होते.
रिकाम्या वेळात मेजावर असलेल्या शाईने चांगल्या वाईटाचा विचार न करता मनात येतील तसे विचार कागदावर उतरवीत गेलो, अशी सहज भूमिका केनकोने या संग्रहाच्या प्रस्तावनेत मांडली आहे. केनको सौंदर्यशास्त्राचा वेगळा दृष्टिकोण यातून समोर ठेवतो. निसर्गाची अनिश्चितता सांगते, की कोणतीच गोष्ट दीर्घकाळ टिकत नाही. हीच गोष्ट स्वत:कडे असलेल्या गोष्टींचे महत्त्व पटवून देते. केनको लिहितो की, आदाशिनो देवळातले दव आणि तोरिबे पर्वतावरचा धूर नाहीसा होतो. तसे माणूस जर कधीच या जगातून नाहीसा झाला नाही तर त्याचे कधीच अप्रूप वाटणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही जीवनाची अनियमितता आहे. क्षणभंगुरतेच्या संदर्भात तो अनियमितता आणि अपूर्णता तसेच सुरुवात आणि शेवट यांच्याबद्दल मतप्रदर्शन करतो. सुरुवात आणि शेवट महत्त्वाचे असतात. सुरुवात आणि शेवट आयुष्याचा तोल सांभाळायला मदत करतात. अशी तत्त्वे या लेखांत मांडली आहेत. हा लेखसंग्रह वाचताना तत्त्वज्ञानात फारसा रस नसलेल्या माणसाला देखील त्यातल्या विनोदी गोष्टी आवडतील. आता ज्या स्वरूपात हा लेख-संग्रह आहे त्या स्वरूपात तो सुरुवातीला नव्हता. केनकोने त्याच्या झोपडीमध्ये विचार कागदावर कुंचल्याने लिहून कागद चिकटवले होते. ते १४ व्या शतकात एकत्र केले गेले आणि १७ व्या शतकात सध्याच्या स्वरूपात आणले गेले असे म्हटले जाते. या लेखसंग्रहाची इंग्रजी मध्ये Essays in Idleness आणि The Harvest of Leisure ह्या नावाने भाषांतरे झाली आहेत.
संदर्भ :
- Kodansha, Kodansha Encyclopedia of Japan,Vol. 8, New York, 1983.
समीक्षक : निस्सीम बेडेकर