सेत्सुवा : अभिजात जपानी साहित्यातील एक लोककथानात्मक साहित्यप्रकार. या साहित्यप्रकाराच्या अस्तित्वाबाबत मते मतांतरे आढळतात. या प्रकारात प्रामुख्याने मौखिक परंपरेत सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींचे शब्दांकन केलेले बघायला मिळते. मुरोमाची कालखंडात या साहित्यप्रकाराची निर्मिती झाली. इ.स.८ वे ते १२ वे शतक आणि त्यानंतर १२ ते १४ व्या शतकाच्या सुरुवातीचा काळ हा या साहित्यप्रकाराचा काळ मानला जातो. सेत्सुवामध्ये कथन केले जाणारे महत्त्वाचे घटक म्हणजे पुराणकथा, दंतकथा, लोककथा आणि चुटके होत. या कथात्मक घटकांच्या अभिव्यक्तीसाठी कोणतेही नियम निश्चित केलेले नाहीत. अशा कथा मुख्यत्वे करून छोट्या, गुंतागुंत नसलेल्या आणि समजायला सोप्या आणि सहज उलगडत जाणार्‍या भाषेत असतात. कथेतील व्यक्तिरेखा संवादातून समजून येतात. खूप मोठी वर्णने आणि मानसिक विश्लेषणे यांचा यात अभाव असतो. सेत्सुवाचा कल हा मनोरंजन करण्याकडे असून, वाचकाला धक्का बसेल, आश्चर्य वाटेल अश्या नाट्यपूर्ण पद्धतीने कथा सांगितली जाते. मुळातील मौखिक परंपरेतील असल्याने गोष्टी सांगताना अशा तंत्रांचा वापर केला जातो की, जेणे करून ऐकणारा शेवटपर्यंत ती कथा ऐकेल.

सर्वसामान्य व्यक्ती आणि बौद्ध धर्मसाधक अशा दोन घटकांसाठी सेत्सुवाचे दोन भागात विभाजन झालेले आहे. बौद्ध धर्मातील सेत्सुवामध्ये चांगले कर्म केले तर चांगल्या गोष्टी मिळतात आणि वाईट कर्माचे फळ वाईट मिळते अशी शिकवण आणि उपदेश आढळतात. बौद्ध धर्म ६ व्या शतकात जपानमध्ये आला. कामाकुरा कालखंडामध्ये बौद्ध धर्म सामान्य लोकांमध्ये पसरायला सुरुवात झाली. या प्रचारासाठी जाणारे बौद्ध भिक्षू अशा कथा लोकांना सांगत असत. नंतरच्या काळात भिक्षूंनी अशा कथा ठिकठिकाणी फिरून एकत्र केल्या आणि मग त्यांचे शब्दांकन केले. सर्वात प्राचीन आणि बौद्धकथांचे संकलन केलेला सेत्सुवा ग्रंथ म्हणून निहोन र्‍योइकि (Nihon Ryoiki) चा उल्लेख केला जातो. यातील सर्व कथा बौद्ध धर्माच्या कथा आहेत. यातील कथांमध्ये वेळोवेळी भर पडत गेली त्यामुळे ह्या ग्रंथाचे एक पूर्ण हस्तलिखित बघायला मिळत नाही. निहोन र्‍योइकिचे संकलन हेइआन कालखंडात क्योकाइ ह्या भिक्षूने केले.

सर्वसामान्यांच्या सेत्सुवामध्ये धर्माबद्दलचा उपदेश नसतो. जपानच्या शिंतो धर्मातील कथा यात आढळतात. पिढ्यानपिढ्या ऐकत आलेल्या ह्या गोष्टीत वाचकाला माहीत असलेले शब्द, घटना असल्यामुळे वाचकांशी लगेच त्याद्वारा जवळीक साधली जाते. बारावे शतक हा या कथांचा कालखंड आहे. त्यांमध्ये संगीत या विषयाबद्दल असणारी कोकिनश्यो, चीन देशाबद्दल माहिती देणारी कारा मोनोगातारी, जिक्कूनश्यो, कोकोन चोमोम्न्जू अशा काही सेत्सुवांचा समावेश होतो. सेत्सुवामधील कथासाहित्य हे लोकसाहित्य नाही. अभिजन वर्गाच्या भावभावना त्यात प्रकर्षाने व्यक्त झाल्या आहेत. १४ व्या शतकाच्या मध्यावर सेत्सुवाची जागा ओतोगिझोशी या साहित्यप्रकाराने घेतलेली आढळते.

संदर्भ :

  • Kodansha, Kodansha Encyclopedia Of Japan, Vol.7, New York, 1983.

समीक्षक : निस्सीम बेडेकर