पाणी हा सर्व सजीवांसाठी अत्यावश्यक घटक आहे. वनस्पती आजूबाजूच्या परिसरातून पाणी घेतात. ज्यांची रचना साधी आहे, त्या सभोवताली उपलब्ध असलेल्या पाण्याचा वापर सूक्ष्म पाणवनस्पती करतात. पाणवनस्पतींसाठी पाण्याची उपलब्धता जास्त असते, त्यामुळे त्यांच्या मुळांची आंतररचना जमिनीवरील वनस्पतींपेक्षा थोडी निराळी असते.

द्विदलिकित मूल (आडवा छेद)

साधारणतः ४०० दशलक्ष वर्षांपूर्वी वनस्पतींनी जमीनीवर आपला अधिवास कायम केला. तेव्हापासूनच पाणी व्यवस्थापनाची आंतररचना विकसित होत गेली. या पाण्याचे परिवहन करण्याची एक विशिष्ट पद्धत वनस्पतींमध्ये विकसित झालेली आहे. लहान झाडे, झुडुपे आणि मोठमोठाले वृक्ष या सर्वांमध्ये पाण्याचे परिवहन अत्यंत सूत्रबद्धपद्धतीने होते. झाडांची मुळे, खोड, पाने यांची आंतर्रचना ही पाणी आणि अन्नरसाचा प्रवास सुलभ व्हावा अशीच असते. जमिनीवरील वनस्पती; छोटी झाडे, झुडूपे आणि मोठे वृक्ष या सर्वांमध्ये पाण्याचे शोषण व परिवहन करण्याची क्रिया अगदी एकसारखीच असते. जमिनीवरील वनस्पती मातीत असलेल्या मुळांद्वारे जमिनीतील पाणी ओढून घेतात. झाडांची मुळे जमिनीखाली आपला विस्तार वाढवितात आणि मुळांवर असलेले केशतंतू पाणी व त्यात विरघळलेले क्षार शोषून घेतात. मुळांमध्ये पृष्ठभागावर शोषलेले पाणी त्याच्या मध्यावर असलेल्या वाहक (Vascular) ऊतीपर्यंत पेशी भित्तिकाद्वारे आणि पेशीद्रव्याद्वारे पोहोचते. मानवी शरीरात ज्याप्रमाणे रक्ताभिसरणासाठी रक्तवाहिन्यांचे जाळे असते, अगदी तसेच झाडांमध्ये वाहक ऊतींचे जाळे असते. त्यात प्रकाष्ठ (Xylem) आणि परिकाष्ठ (Phloem) असे दोन प्रकारच्या ऊती असतात. एकदा का पाणी प्रकाष्ठमध्ये पोचले की, त्याचा प्रवास झाडाच्या शेंड्याकडे सुरू होतो.

प्रकाष्ठ ऊतक (उभा छेद)

प्रकाष्ठ मुळातील पाणी झाडाच्या सर्व भागांना पुरवितात. परिकाष्ठ तयार होणाऱ्या अन्नाचे परिवहन करतो. प्रकाष्ठच्या पेशींच्या भित्तिका काष्ठीर (Lignin) या पदार्थाने लिंपलेल्या असतात. त्या जाड असल्यामुळे पाण्याचा दाब सहन करण्याची क्षमता त्यांच्यात असते. तसेच प्रकाष्ठचा व्यास लहान असल्याने केशाकर्षणसुद्धा पाण्याच्या प्रवाहाला मदत करते.

मोठ्या वृक्षांमध्ये मुळे खोलवर गेलेली असतात व झाडांची उंची अगदी ५० ते १०० मीटरपर्यंत असू शकते. उदा., निलगिरीचे झाड ९० मी. पर्यंत वाढते. झाडे पानांवरील छिद्रांद्वारे पाण्याचे बाष्प वातावरणात सोडतात. या क्रियेला वनस्पतींचा बाष्पोच्छवास असे म्हणतात. प्रकाष्ठमधील पाण्याला यामुळे ताण बसतो आणि पाण्याचा प्रवाह मुळांकडून पानांकडे अखंड सुरू राहतो. एखाद्या चोषक (Suction) पंपाप्रमाणे हे काम करते. सतत मुळांद्वारे पाणी शोषले जाते व पाणी अखंडपणे झाडात प्रवाहित राहते.

निसर्गानेच झाडांची रचना अशा प्रकारे केली आहे की, झाडांना लागणारे पाणी मुळांपासून उंच शेंड्यापर्यंत पोहोचते. केशाकर्षण व बाष्पोच्छवासामुळे निर्माण होणारा ताण या दोन्हीच्या माध्यमातून झाडे आपले पाण्याचे व्यवस्थापन उत्तम प्रकारे करतात.

उंच झाडांमध्ये जसे पाण्याचे परिवहन होते, तसेच झुडूपांमध्ये व छोटया झाडांमध्ये होते. निसर्गामध्ये मोठया झाडांच्या आधारे वाढणाऱ्या वेलीसुद्धा खूप उंच जातात. अशा वेलींचे खोड झाडाभोवती वेटोळं घालून वर उंच चढते. अशा खोडांमध्ये प्रकाष्ठच्या नलिकांवर दाब येऊन पाण्याचा प्रवाह खंडित होऊ नये यासाठी विशेष संरचना आढळते. प्रकाष्ठ नलिकांच्या आजूबाजूला अभिस्तीर्ण मृदूतक (dilated Parenchyma) नावाच्या पेशी असतात. त्या लवचिक असून त्या स्वतः दाब सोसून प्रकाष्ठमधील पाण्याचा प्रवाह अखंड ठेवण्यास मदत करतात. जंगलामध्ये असणाऱ्या काष्ठ वेलींमध्ये अशा प्रकारे पाणी शेंड्यापर्यंत पोचते. उदा., गुळवेल, कणगर (डायोस्कोरिया; Dioscorea) इत्यादि.

अशा रितीने दिवसाला शेकडो लिटर पाण्याचा प्रवास वृक्षांच्या मुळांपासून शेंडयापर्यंत गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने होतो.

संदर्भ :

  • Dutta, A.C. Textbook of Botany, 1964.
  • Ganguli and Kar, College Botany, 1968.

समीक्षक : शरद चाफेकर