महाराष्ट्रातील वारली आदिवासींची वैशिष्ट्यपूर्ण चित्रकला. या जमातीचे लोक त्यांच्या घरातील भिंतींना चित्रांनी सजवतात. या चित्रांना वारली चित्र म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील कोसबाड, जव्हार, विक्रमगड, मोखाडा, डहाणू, तलासरी, नाशिक व धुळे जिल्ह्याचा काही भाग तसेच गुजरातच्या वलसाड, डांग, नवसारी, सुरतचा भाग आणि दाद्रा व नगरहवेली, दीव आणि दमणचा काही भाग येथे वारली आदिवासींची वसती आहे. भौगोलिकदृष्ट्या हा सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरील डोंगराळ आणि महाराष्ट्र व गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याच्या लगतचा भाग आहे. वारली लोकांचे जीवन या प्रदेशातील भूमी व निसर्गाशी जोडलेले आहे. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात, सण-उत्सव, नृत्य समारंभात, चित्रांत हे सर्व संदर्भ अनुभवता येतात.
वारली चित्रे धार्मिक कार्याला विशेषत: विवाहाच्या वेळी काढली जातात. वारली लोक चित्र काढणे ऐवजी ‘चित्र लिहिणे’ असा शब्दप्रयोग करतात. वारली चित्र भिंतीवर काढले जाते. चित्र काढण्यापूर्वी ज्या घरातील भिंतीवर चित्र काढायचे आहे; ती भिंत माती, काव अथवा शेणाने सारवली जाते. चित्र काढण्याच्या पारंपरिक पद्धतीत खजुराचा, बाबूंचा काटा किंवा बहारीच्या गवताची अथवा भाताच्या चुगाची काडी वापरतात. उखळात कुटलेल्या तांदळात पाणी घालून पांढरा रंग तयार केला जातो. बहुतांशवेळा सारवलेल्या भिंतीचा रंग व पांढरा रंग या दोन रंगाने वारली चित्र पूर्ण होते. आजूबाजूला निसर्गात आढळणारी फुले, पाने, झाडांच्या साली, फळे यांचा उपयोग करून मिळवलेल्या निळा, लाल, पिवळा अशा रंगांचा क्वचित वापर केलेला आढळतो. वारली चित्रांतील आकारांना स्वतंत्र ओळख आहे. या चित्रांतील रचना गोल, त्रिकोण, चौकोन इत्यादी मूलभूत भौमितिक आकारांचा वापर करून केल्या जातात. चित्रातील मानवाकृतींमध्ये दोन त्रिकोणांची उलटसुलट रचना करून त्यामधून शरीर दाखवले जाते. तर गोल व रेषांचा वापर करून डोके, हात व पाय दाखवले जातात. वारली चित्रात मानवाकृती पांढऱ्या रंगाने भरल्या जातात. त्यावर शरीररचनेचे, चेहऱ्याचे बारकावे नसतात. त्यामुळे स्त्री दाखवताना चेहऱ्याच्या भरीव गोलावर अंबाड्याचा छोटा भरीव गोल काढला जातो आणि पुरुष दाखवताना काहीवेळा शेंडीची एक बारीक रेघ दाखवली जाते. देव दाखवण्यासाठी चेहऱ्याच्या गोलाभोवती पाच, सहा उभ्या रेषा काढल्या जातात. अनेक वारली चित्रांमध्ये एकमेकांच्या कमरेभोवती हात गुंफून वर्तुळाकृती तारपा नृत्य करणारे नर्तक दाखवले जातात. वारली चित्रातील झाड काढताना जमिनीपासून आकाशात जाणारे झाड काढले जाते. प्रत्येक आकाराचा उगम व अर्थ याचे वारली लोकांचे स्वत:चे तत्त्वज्ञान आहे आणि ते त्यांच्या जीवनानुभवांशी जोडलेले आहे.
वारली चित्रकला ही मुख्यत्वे स्त्रियांची चित्रकला आहे. विवाहाच्या वेळी चित्र काढणाऱ्या चित्रकर्तीस ‘धवरेली’ असे म्हणतात. धवरेली ही सुवासिनी असते. वारली चित्र काढताना स्नान, पूजा, उपवास इत्यादी विधी करून शुद्ध भावनेने चित्रण केले जाते. चित्र काढण्यास सुरुवात करताना धवरेली जी पहिली रेघ काढते, त्याला देवरेघ असे म्हणतात. ‘देवरेघ’ने सुरू झालेल्या चित्रणातून विवाहप्रसंगी देवचौक लिहिले जातात. ‘देवचौक’ हे एक महत्त्वाचे चित्र आहे. चौक म्हणजे चौकोन. विशिष्टप्रकारे रेखाटलेल्या चौकोनात एका घोड्यावर बसलेल्या नवरानवरीच्या दोन मानवाकृती दाखवल्या जातात. त्यासोबत करवली, प्रजननाची देवता ‘फालगुट’, वादक आणि संगीताच्या तालावर नाचणारे नर्तक, सूर्यदेव, चंद्रदेव, कोंबडा, ‘निसन’ म्हणजेच शिडी, बाशिंगे यांचेदेखील चित्रण केलेले आढळते. फालगुट किंवा पालघाट यामधील घट हा शब्द गर्भाचे प्रतिक आहे. मुलांच्या जन्मानंतर देखील घरांमध्ये पाचवीचे चित्र काढले जाते. यात तान्हे बाळ, सुईण, आई, विळा, सुप, पूजेचे साहित्य, बाळाची झोळी इत्यादीचे चित्रण केलेले असते.
विवाह, जन्म यांखेरीज नागपंचमी, दसरा, दिवाळी इत्यादी सणांना सुद्धा भिंतीवर चित्र काढण्याची प्रथा आहे. चित्र नसलेल्या भिंती या नागड्या भिंती आहेत, असे वारली लोक समजतात. भिंतीवरील चित्रांमुळे भूत, प्रेत, पिशाच्च यांच्या त्रासापासून घर सुरक्षित राहते व घरात धनधान्य, आरोग्य येते, अशी वारली लोकांची धारणा आहे. या चित्रांत महादेव, पालघट देवी, महालक्ष्मीचा डोंगर, सूर्यदेव, चंद्रदेव, वाघदेव (वाघ) इत्यादींचे चित्रण दिसते. याशिवाय घोडा, वाघ, बैल यांसारखे प्राणी, मोरासारखे पक्षी चित्रित केलेले दिसतात. त्याव्यतिरिक्त छोटे प्राणी, मासे, बेडूक, विंचू, खेकडे, गांडूळ, छोटे पक्षी, मुंग्या, अनेक प्रकारचे कीटक यांचे चित्रण देखील केलेले दिसते. वारली चित्रांत भातशेतीची चित्रे प्रामुख्याने काढलेली दिसतात. या चित्रांमध्ये भातशेतीमधील विविध टप्प्यांचे व निसर्गाचे भरभरून वर्णन केलेले दिसते. ही चित्रे समृद्धतेची प्रतीके आहेत.
वारली चित्रांमधील कलाप्रेरणा ओळखून दिल्लीच्या भारतीय हस्तव्यवसाय व हातमाग निर्यात निगम तत्कालीन प्रमुख भास्कर कुलकर्णी यांनी १९७० च्या दरम्यान ही कला समाजासमोर आणली. त्यांनी ही चित्रे कागदावर उतरवण्यास आदिवासींना प्रेरित केले. सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकार पुपुल जयकर यांच्या पुढाकाराने अनेक शासकीय कलायोजनांमध्ये वारली चित्रकलेला महत्त्वाचे स्थान मिळाले. वारली चित्रकला स्त्रीप्रधान असली तरी या कलेमधील नावाजलेले चित्रकार पुरुष आहेत. प्रसिद्ध वारली चित्रकार जिव्या सोम्या मशे यांना २०११ याली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांची अनेक वारली चित्रे भारतातील व जगातील विविध कलादालनात प्रदर्शित करण्यात आलेली आहेत. शांताराम तुंबडा या वारली चित्रकारांच्या कलाकृतीस फ्रान्समधील लीआँ शहरातील टोनी गॉर्वियर संग्रहालयात कायमस्वरूपी प्रदर्शित करण्यात आलेले आहे. अलीकडे वारली चित्रे धार्मिक कार्याबरोबरच विविध वस्तू, कपडे, मातीची भांडी इत्यादींवर काढली अथवा छापली जातात. अशा वस्तूंना जागतिक बाजारपेठ मिळत असल्याने अनेक तरूण चित्रकार आज वारली चित्रनिर्मिती करत आहेत. भारतीय टपाल खात्याने या चित्रकलेच्या सन्मानार्थ एका टपाल तिकिटाचे अनावरण केलेले आहे.
संदर्भ :
- गारे, गोविंद, वारली चित्र संस्कृती, पुणे, २००७.
समीक्षक : स्मिता गीध