भारतीय लघुचित्रशैलींतील एक महत्त्वाची शैली. या शैलीस ‘सुरपूर लघुचित्रे’ (Surpur Miniature Arts) असेही म्हणतात. दख्खनमधील हैदराबाद येथे चित्रशैलीच्या दोन शाखा विकसित झाल्या. त्यांतील एक शोरापूर येथे आणि दुसरी कडप्पा (कुरनूल) येथे विकसित झाली. शोरापूर हे दख्खनच्या संस्थानांपैकी एक संस्थान. येथे १७५०च्या सुमारास या चित्रकामाची सुरूवात झाली. महाराष्ट्रातील अनेक संतांची चित्रे तेथे मोठ्या प्रमाणावर चित्रित झालेली आहेत. तेथील चित्रांत व्यक्तिचित्रे, धार्मिक विषयांतील चित्रे तसेच शैवधर्मीय कथाचित्रे यांना विशेष महत्त्व दिल्याचे दिसते.

कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यातील देगाव येथील गरुडाद्री कुटुंबीय हे येथील महत्त्वाचे कलावंत. त्यांना राजा वेंकटप्पा नायक यांनी साहाय्य केले. त्यांच्या कलेला राजाश्रय दिला व प्रोत्साहन दिले. बनाइह गरुडाद्री हा त्यांच्यापैकी एक महत्त्वाचा व प्रसिद्ध चित्रकार होता. त्याने अनेक चित्रकार ह्या शैलीत तयार केले.

राज नलवाडी वेंकटप्पा नायक यांचे शोरापूर चित्रशैलीतील व्यक्तिचित्र (१८५७)

शोरापूर शैलीतील सुरुवातीच्या काळातील चित्रांचे रंगकाम सुरेख आहे व रेखांकन दर्जेदार आहे. चित्रांत वापरलेल्या रंगांमध्ये सोन्याच्या वर्खाचा वापर आणि म्हैसूर येथील रंगसंगतीप्रमाणे भडक उठावात केलेले रंगकाम ‍महत्त्वपूर्ण आहे. नंतरच्या काळातील चित्रकामांत ह्या घटकांचा अभाव जाणवतो.

चित्राकृतींतील पुरुष व स्त्री आकृतींमध्ये महाराष्ट्रातील वेशभूषा दिसते. पुरुषांच्या वेशभूषेत बारीक लाल काठाची धोतरे दिसतात, तर स्त्रियांनी नऊवारी साडी आणि चोळी परिधान केलेली आहे.

शोरापूर शैलीतील चित्रांवर साहजिकच दक्षिणेतील हैदराबाद येथील चित्रशैली व नायक परंपरेतील चित्रकामाचा प्रभाव ‍ दिसून येतो. इंग्रजी आमदानीच्या काळातील चित्रकामांत छायाचित्राचा वापर दिसतो. शोरापूर पारंपरिक चित्रकला शैलीतील शोरापूरचा राजा नलवाडी वेंकटप्पा नायक यांचे एक छायाचित्र (१८५७) लक्षवेधक आहे. हे अगदी शेवटच्या काळातील बदल असले, तरी सुरुवातीच्या काळातील सुरपूर लघुचित्रांना भारतीय लघुचित्रशैलीतील महत्त्वाची शैली म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे.

सुरपूर लघुचित्रे सालारजंग संग्रहालय, हैदराबाद; जगमोहन पॅलेस, म्हैसूर; व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय लंडन येथे जतन करून ठेवली आहेत. डॉ. पटेल, डॉ. प्रधान इत्यादींनी त्या शैलीवर सखोल अभ्यास व प्रकल्प केलेले आहेत.

कडप्पा येथे विकसित झालेल्या चित्रशैलीस कुरनूलच्या नबाबशाहीने पाठिंबा दिला. कुरनूल लघुचित्रांत (Kurnool painting) प्रामुख्याने नबाब व त्याच्या कुटुंबियांची व्यक्तिचित्रे दिसतात.

संदर्भ :

  •  Marg (Special No. On Deccani Painting) Vol. No. XVI Part 2, Marg publications, Bombay, 1963.
  • माटे, म. श्री. ; चव्हाण,कमल, मध्ययुगीन कलाभारती,  कॉटिनेंटल प्रकाशन, पुणे, २००२.

समीक्षक : मनीषा पोळ


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.