स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ यन्स याकॉप बर्झीलियस (१८१७) यांनी शोधलेले सिलिनियम हे मूलद्रव्य मानवी प्रकृतीसाठी हितकारक आहे किंवा नाही यासंबंधी शास्त्रज्ञांचे परस्परविरोधी दावे आहेत. मानवी पेशीमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढले आणि काही जैवरासायनिक प्रक्रियामध्ये अनावश्यक बदल झाले की, ऑक्सिजनपासून उपद्रवकारी घटक निर्माण होतात आणि प्रथिने, न्यूक्लिइक आम्ले व पेशी पटले यांना इजा पोहोचते. या क्रियेसाठी लागणार्‍या विकराचा सिलिनियम हा महत्त्वाचा घटक आहे. जॅन्सनने सिलिनियम हे मूलद्रव्य कॅन्सरसारख्या व्याधीशी सामना देताना पेशींच्या उपयोगी पडते हे सिद्ध केले (१९८०). होरी व त्याच्या सहकार्‍यांना या मूलद्रव्यात एड्सचा प्रादुर्भाव थांबविण्याची क्षमता असल्याचे आढळून आले (१९९७ ), मात्र सत्तर वर्षांपूर्वी अतिरिक्त सिलिनियमचे मानवी आरोग्यावर होणारे काही घातक परिणाम ट्रेझ व बीभ् यांच्या लक्षात आले. १९८० मध्ये सिलिनियममुळे झालेले प्रतिकूल परिणाम शास्त्रज्ञांना अधिक ठळकपणे जाणवले. हे मूलद्रव्य अधिक मात्रेत पोटात गेल्यामुळे पक्षी व मासे यांच्या चयापचयात काही विकृती निर्माण झाल्या, त्यांच्या पुनरुत्पादनावर विपरीत परिणाम झाले तर काहीचे मृत्यूही ओढवले.

सिलिनियमचे समृद्ध असे खडक पृथ्वीवर अनेक ठिकाणी आढळतात. या खडकांच्या सतत होत असलेल्या र्‍हासामुळे शेतीसाठी वापरण्यात येणार्‍या पाण्यातील सिलिनियमचे प्रमाण अतिशय वाढते. याखेरीज तेलशुद्धीकरण कारखान्यातून व वीजनिर्मिती केंद्रातून बाहेर पडणार्‍या सांडपाण्यातही सिलिनियम आढळते. अतिरिक्त सिलिनियम प्राणघातक ठरू शकते हे सिद्ध झाल्यामुळे सिलिनियमचे प्रदूषण कसे रोखावे ही पर्यावरणतज्ज्ञामोरची समस्या आहे.

सिलिनियम समृद्ध जमिनीत आढळणार्‍या वनस्पतीच्या रूपाने या प्रश्नावर एक व्यवहारी तोडगा सापडलेला आहे. अशा जमिनीमध्ये फुलणार्‍या ॲस्टर, अट्रिगॅलिया, अट्रिप्लेक्स, ग्रिंडेलिया, कोमॅन्ड्रा या वनस्पतींना सिलिनियमबद्दल विशेष आकर्षण असल्यामुळेच त्या आपल्या शरीरात सिलिनियमचा लक्षणीय संचय करताना आढळतात. या वनस्पतींच्या मुळात जमिनीतून प्रवेश करण्यासाठी सिलिनियम हे सल्फेटबरोबर स्पर्धा करते आणि सल्फेटच्या जोडीनेच मुळाच्या अंतर्भागात प्रवेश करते. मुळातून खोडाकडे व खोडाद्वारे पानाकडे असा या सेलेनेटचा प्रवास होतो, परिणामी पानामध्ये या मूलद्रव्याचा संचय होण्यास प्रारंभ होतो. हवेमध्ये वायुरूपात आढळणारी सिलिनियमची संयुगे पर्णछिद्राद्वारे बार्ली, मुळा, टोमॅटो यांसारख्या वनस्पतींच्या शरीरात प्रवेश करतात आणि बीजोत्पादन सुरू झाले की, सिलिनियम पानाकडून बीजाकडे पोहोचते व बीजामध्ये त्याचा संचय होतो.

शैवालासारख्या वनस्पतींच्या वाढीसाठी अतिसूक्ष्म प्रमाणात सिलिनियम लाभदायक असले तरी, अन्य उत्क्रांत वनस्पतीसाठी सिलिनियम खरोखरीच गरजेचे आहे अथवा नाही याविषयी अदयापी निश्चिती नाही. प्राण्यांच्या शरीरात सापडणारी सिलिनियमयुक्त प्रथिने वनस्पतीमध्ये आढळलेली नाहीत. काही वनस्पतींच्या पर्णपेशीतील हरितलवकामध्ये सेलेनेट व ग्लुटॅथायॉन यांची युती होऊन ग्लुटॅथामॉन सेलेनाइड हे संयुग तयार होते, तर अन्य वनस्पतीत सिस्टीन या सल्फरयुक्त ॲमिनो आम्लाबरोबर सिलिनियम बद्ध होते व सेलेनोसिस्टीन हे संयुग तयार होते. या सेलेनोसिस्टीनचे रूपांतर सेलेनोमिथिओनाइनमध्ये होते. डायमिथिल सेलेनाइड या वायुरूप संयुगाची निर्मिती सेलेनोमिथिओनाइनद्वारे होते. हे वायूरूप संयुग पर्णछिद्राद्वारे वनस्पतींच्या शरीराबाहेरच्या वातावरणात प्रवेश करते. जमिनीमध्ये धोकादायक प्रमाणात साठलेले सिलिनियम शोषून घेऊन त्याचे वायुरूप संयुगात रूपांतर करून पर्णछिद्राव्दारे उत्सर्जन करण्याची काही वनस्पतींची क्षमता हा सिलिनियमच्या प्रदुषणावर एक समाधानकारक तोडगा होऊ शकेल असे टेरि, कार्लसन या अमेरिकन शास्त्रज्ञांना वाटते. मोहरीसारखी द्रुतगतीने वाढणारी वनस्पती या संदर्भात अधिक उपयुक्त आहे. पिलॉन आणि स्टिमस् यांनी जनुक अभियांत्रिकीच्या माध्यमातून या वनस्पतीची सिलिनियम शोषण करण्याची क्षमता वाढविण्यात यश मिळविले (१९९९).

भविष्यकाळात जनुक अभियांत्रिकीद्वारे उत्क्रांत झालेल्या अशा वनस्पती जनावरे व माणसाला गरजेप्रमाणे खादयातून सिलिनियमचा पुरवठा करतील आणि जेव्हा सिलिनियम जमिनीमध्ये धोक्याची पातळी ओलांडेल, तेव्हा या अतिरिक्त सिलिनियमपासून जमिनीची मुक्तताही करतील. लीव्हेंडर व बर्क (१९९६) यांच्या मते आपल्या दैनंदिन आहारात ७० मायक्रोग्रॅम इतके सिलिनियम आवश्यक असून हे प्रमाण ९१० मायक्रोग्रॅमच्या वर गेले तर ते अनारोग्याला आमंत्रण ठरते.

संदर्भ :

  • Allaway, W.H., Control of the Environmental levels of Selenium. Proc. 2nd Annual Conference on Trace Substances in Environmental Health, 181-206, University of Missouri, Columbia, 1968.
  • Bisbjerg, B &  Gissel-Nelsen,G.,  The uptake of applied Selenium by agricultural plants.1. The influence of soil type and plant species. Plant Soil, 31:187, 1969.
  • Scott, M.L.,& J.N. Thompson, Selenium in Nutrition and Metabolism, p.1-10. In Proc. Md. Nutr. Conf. for feed Manufacturers. College Park, Md., 1968.

 समीक्षक : नागेश टेकाळे