मत्स्य वर्गातील अस्थिमत्स्य उपवर्गातील टेट्राओडोंटिफॉर्मिस (Tetraodontiformes) गणामध्ये या माशाचा समावेश होतो. पंखामध्ये अर (Finray) असलेल्या माशांतील त्वचेमध्ये काटे असलेल्या माशांपैकी हा एक मासा आहे. पाण्याबाहेर काढला असता याचा आकार फुग्याप्रमाणे होतो, म्हणून यास पफरफिश किंवा फुगु मासा असे म्हणतात.

फुगु मासा हा जीवविज्ञानातील संशोधनात विशेषत: जीनोम-विज्ञानामध्ये (Genomics) वापरला जाणारा एक प्रातिनिधिक सजीव आहे. फुगु या शब्दाचा जपानी भाषेतील अर्थ आहे नदीमधील डुक्कर. या माशाची जॅपनीज पफर (Japanese puffer), टायगर पफर (Tiger puffer), किंवा तोराफुगु (Torafugu) ही अन्य काही नावे प्रचलित आहेत. फुगु माशाच्या २० प्रजातींपैकी ताकीफुगु रुब्राईप्स (Takifugu rubripes) ही प्रजाती संशोधनासाठी वापरतात. अत्यंत विषारी असणारा हा मासा जपानी खाद्यसंस्कृतीत एक महागडे पक्वान्न समजले जाते.

फुगु मासा (ताकीफुगु रुब्राईप्स)

प्रातिनिधिक सजीव म्हणून फुगु माशाचा उपयोग १९९०−२००० च्या दशकात सुरू झाला. सिडने ब्रेन्नर (Sydney Brenner) या प्रसिद्ध वैज्ञानिकांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर फुगु माशाच्या जीनोमचे विश्लेषण करण्याचे कार्य हाती घेतले आणि आकाराने लहान व संक्षिप्त असलेल्या फुगु माशाचा जीनोम (Genome) संशोधनात वैशिष्ट्यपूर्ण ठरतो हे दाखवून दिले. जगभरातील अनेक प्रमुख प्रयोगशाळांमध्ये आता फुगु माशाचा वापर वाढत आहे. या माशाचा जीनोम मुख्यत: जनुकीय विश्लेषणाच्या तौलनिक अभ्यासात उपयोगी पडतो. फुगु माशाच्या जीनोममधील वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत —

(१) ४०० दशलक्ष आधारक (Base) जोड्या (Mb) असलेल्या फुगु माशाचा जीनोम पृष्ठवंशीय प्राण्यांमधील सर्वांत लहान आकाराचा आहे. या माशाचा जीनोम मानवी जीनोमच्या (Human genome) तुलनेत साडेसात पटीने लहान आहे. आकाराने लहान असल्याने या जीनोमचा अभ्यास करणे वैज्ञानिकदृष्ट्या सुकर आहे, तसेच आर्थिकदृष्ट्याही किफायतशीर आहे.

(२) फुगु माशाच्या जीनोमचा मूलभूत आराखडा मानव व अन्य पृष्ठवंशीय प्राण्यांच्या जीनोमशी मिळताजुळता आहे. आकाराने आटोपशीर असूनही पृष्ठवंशीय प्राण्यांच्या जीनोममध्ये आढळणारे जनुकीय संच, त्यांची ढोबळ रचना आणि जनुकांचे नियंत्रण करणाऱ्या प्रणाली फुगु माशामध्येही आढळतात. म्हणूनच या प्रणालींबद्दल अधिक खोलात जाऊन माहिती मिळवण्याच्या प्रयोगांमध्ये हा छोटा जीनोम उपयुक्त ठरत आहे.

(३) मानव व फुगु माशांच्या जीनोममधील रचनेत आणि गुणसूत्रांच्या संख्येत समानता आहे. मानवामध्ये २३ गुणसूत्रे असतात, तर फुगु माशाचा जीनोम हा २२ गुणसूत्रांमध्ये विभागलेला आहे.

(४) फुगु माशाच्या जीनोममध्ये जनुके एकमेकांच्या जवळ आणि संक्षिप्त स्वरूपात आढळतात. उत्क्रांतीमध्ये जनुकांचे विशिष्ट समूह कसे तयार होतात व त्यांमागे कोणते घटक काम करतात, उत्क्रांतीमध्ये जीनोमची रूपरेषा कशी ठरते यांसारख्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी फुगु माशाचा जीनोम दिशादर्शक झाला आहे.

(५) फुगु माशाच्या जीनोमचे संपूर्ण क्रमनिर्धारण (Sequencing) झाले आहे. इंटरनॅशनल फुगु जीनोम कॉन्सॉरशियम (International Fugu Genome Consortium) या संस्थेने २००२ मध्ये फुगु माशाचा संपूर्ण जीनोम प्रसिद्ध केला. हा संपूर्ण जीनोम व जनुकीय नकाशा www.jgi.doe.gov/fugu आणि www.fugubase.org या संकेतस्थळांवर उपलब्ध असून तो सर्वांसाठी खुला आहे. सर्वांसाठी खुला केला गेलेला मानवेतर प्राण्याचा हा पहिला जीनोम आहे.

(६) आजवर केल्या गेलेल्या जनुकीय विश्लेषणातून ३०,००० पेक्षा अधिक जनुकांची ओळख पटवली गेली आहे. मानवी जनुकांपैकी बहुतांश जनुकांना समतुल्य (Equivalent) जनुके फुगु माशामध्ये सापडली आहेत. तसेच मानव आणि फुगु मासा यांची शारीरिक रचना, चयापचय प्रक्रिया आणि प्रतिकार यंत्रणा यांमधील फरक जनुकीय स्तरावर ठळकपणे दिसून आले आहेत. या दोन जीनोमचा तौलनिक अभ्यास करून वैज्ञानिकांनी असा अंदाज बांधला आहे की, आजवर माहित न झालेले १००० पेक्षा अधिक नवीन जनुके मानवी जीनोममध्ये अस्तित्त्वात आहेत. या जनुकांचा शोध घेऊन त्यांचे कार्य जाणून घेण्यासाठी फुगु माशाच्या जनुकांचा अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे.

फुगु माशाचा प्रातिनिधिक सजीव म्हणून वापर तुलनेने नवीन असून हा वापर मुख्यत्वे जनुकांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी होतो. तथापि फुगु माशाच्या जीनोमवरील संशोधनाला वेग आला आहे. सध्या फुगु माशाच्या विविध प्रजातींच्या जीनोमचे विश्लेषण केले जात आहे. हंटिंग्टन आजाराशी (Huntington’s disease) संबधित जनुक आणि ऑक्सिटोसिन (Oxytocin), व्हासोप्रेसीन (Vasopressin), पी-५५ (p55) व पिकेडी-१ (PKD1) या मानवी जनुकांच्या समांतर जनुकांचा (Orthologous) अभ्यास फुगु माशाचा जीनोम वापरून केला जात आहे. या जनुकांमधील बदलांचे बाह्य परिणाम व या जनुकांचे नियंत्रक यांच्याबद्दल माहिती मिळवण्यात हे संशोधन मोलाचे आहे. या अभ्यासातून उत्क्रांती विज्ञानामधील काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्यास मदत होईल.

पहा : प्रातिनिधिक सजीव.

संदर्भ :

  • Elgar Greg; Sandford Richard; Aparicio Samuel; Macrae Alexander; Venkatesh Byrappa; Brenner Sydney, Small is beautiful : comparative genomics with the pufferfish (Fugu rubripes), Trends in Genetics12 (4) : 145, 1996.
  • Elgar Greg, Quality not quantity : the pufferfish genome, Human Molecular Genetics 5(1) : 437, 1996.
  • https://mycocosm.jgi.doe.gov/Takru4/Takru4.home.html
  • http://www.genomenewsnetwork.org/articles/08_02/pufferfish_genome.shtml
  • https://www.sciencedaily.com/releases/2002/07/020731081327.htm\
  • Myers P., Pufferfish and ancestral genomes, Nature Education 1(1) : 53, 2008.

समीक्षक : प्रमोद जोगळेकर