फ्लॉसी वॉन्ग–स्टाल : (२७ ऑगस्ट, १९४६ – ८ जुलै, २०२०) फ्लॉसी वॉन्ग–स्टाल यांचा जन्म चीनमधील ग्वांगझाऊ येथे झाला. त्यांचे मूळ नाव ‘यी चिंग वॉन्ग’ असे होते. चीनी कम्युनिस्ट क्रांतीनंतर १९५२ साली हे कुटुंब हाँगकाँग येथे स्थलांतरित झाले. मेरीनॉल सिस्टर स्कूल येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्या लॉस एंजलीस येथील  कॅलिफोर्निया विद्यापीठात दाखल झाल्या. त्यांनी अमेरिकन राष्ट्रीयत्व स्वीकारले. येथे त्यांच्या पालकांनी शिक्षकांच्या सांगण्यावरून ‘फ्लॉसी’ हे नाव धरण केले.  जिवाणूशास्त्रात बी.एस्सी. आणि रेणवीय जीवशास्त्रात त्यांनी  पीएच्.डी. पदवी संपादन केली. पुढे सान दियागो येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात १९७३ सालापर्यंत आपले संशोधन पुढे सुरू ठेवले. रॉबर्ट गॅलो हे त्यांचे शैक्षणिक सल्लागार होते. पुढे  मेरीलँडच्या बेथेसडा येथील राष्ट्रीय कॅन्सर संस्थेत रॉबर्ट गॅलो यांच्या मार्गदर्शनाखाली १७ वर्षे त्यांनी कॅन्सरवर काम केले.

एड्सच्या विषाणूत सातत्याने जनुकीय उत्परिवर्तन होत असल्यामुळे या विषाणूची जनुकीय रचना  आणि त्याची मानवी प्रतिकारशक्तीवर हल्ला करण्याची  प्रणाली  याचे विश्लेषण करून त्यातील परस्पर संबंध समजून घेणे अनिवार्य होते. एचआयव्ही विषाणू हा ‘रेट्रोविषाणू’ कुटुंबातील आहे. म्हणजे, हा विषाणू मुळात ‘आरएनए’ विषाणू असला तरी मानवी लिम्फोसाईट पेशीत प्रवेश झाल्यावर तो ‘आरएनए’चे रूपांतर ‘डीएनए’ मध्ये करून मानवी ‘डीएनए’शी एकरूप होतो. तो काही तासापासून ते काही वर्षापर्यंत अशा रितीने मानवी शरीरात सुप्तावस्थेत वास्तव्य करतो. नंतर पुन्हा उद्दीपीत होऊन त्या ‘डीएनए’चे ‘आरएनए’ मध्ये रूपांतर होते. आणि प्रजोत्पादनाद्वारे तो लिम्फोसाईट पेशीतून बाहेर पडतो. ही एचआयव्ही विषाणूची  दुहेरी वागणुक समजून घेणे म्हणजे मोठे आव्हान होते. ‘रेट्रोविषाणू’ कुटुंबातील विषाणू हे त्यांच्या अनाकलनीय अशा वागणुकीमुळे ७० च्या दशकाच्या शेवटपर्यंत ‘ह्युमन रूमर व्हायरस’ म्हणून संबोधले जायचे. अखेर त्याचा छडा लावण्याचे श्रेय रॉबर्ट गॅलो आणि फ्लॉसी  वॉन्ग–स्टाल यांनाच जाते.  या संदर्भात  फ्लॉसी  वॉन्ग–स्टाल यांचे संशोधनकार्य महत्त्वाचे ठरते.

मेरीलँड येथील राष्ट्रीय कॅन्सर संस्थेत त्यांनी एड्सच्या विषाणूवर संशोधनास सुरुवात केली आणि  १९८३ साली वॉन्ग–स्टाल, रॉबर्ट गॅलो आणि त्यांच्या चमूने एचआयव्ही हा विषाणू एड्स या रोगाचे कारण असल्याचे सिद्ध केले. १९९० साली सान दियागो येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात त्यांची तेथे नव्याने सुरू झालेल्या एड्स संशोधन संस्थेत नेमणूक झाली. या ठिकाणी त्यांनी एड्सच्या ‘जीनथेरपी’ वरती संशोधन सुरू केले. मूळ पेशींमध्ये (Stem cell) रायबोसोम्सच्या सहाय्याने एचआयव्ही निष्प्रभ करता येईल का ? हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. या संशोधनात रायबोसोम्सचा वापर ‘रेणवीय कात्री’ म्हणून करता येईल का ? यावर संशोधन केले गेले. या त्यांच्या प्रकल्पाला अमेरिकन शासनाने अर्थसहाय्य देऊ केले होते.

१९९४ साली सान दियागो येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात नव्याने स्थापन झालेल्या एड्स संशोधन संस्थेच्या अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. याच वर्षी त्यांची अमेरिकन नॅशनल अकॅडमीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीनच्या सदस्य म्हणून निवड झाली.

पुढे दोनच वर्षांनंतर वॉन्ग–स्टाल यांनी एचआयव्ही या विषाणूला प्रथमच ‘क्लोन’ करण्याचा मान मिळवला. १६ मार्च १९९९ रोजी वॉन्ग–स्टाल यांनी एचआयव्हीचा क्लोन करून त्याच्या जनुकीय नकाशाचे एकस्व अधिकार प्राप्त केले. हा एकस्व क्रमांक ५८८३,०८१ एचआयव्हीच्या इतिहासात खूप महत्त्वपूर्ण ठरला. कारण या त्यांच्या संशोधनातून त्या विषाणूची रेणवीय रचना, न्यूक्लेइक ॲसिड शृंखला, प्रथिन शृंखला, रोगनिदान परीक्षण पद्धती, लसनिर्मितीसाठी लागणारी रोगप्रतिकारक जैवरसायने, प्रथिन संश्लेषण घटक, जनुकोपचार घटक अशा अनेक रेणवीय प्रक्रियांचा उलगडा होणार होता.

यातून त्या विषाणूचे तीन महत्त्वपूर्ण गुणधर्म समजून घेण्यास मदत झाली. एक म्हणजे एचआयव्हीचे प्रजोत्पादन नियंत्रित करणारा घटक (Determinants of replication) समजला. दुसरे म्हणजे त्याच्या रोगकारकतेची कार्यप्रणाली (Cytopathic activity) समजू शकली आणि तिसरे म्हणजे त्याची प्रतिजनकता (Antigenicity) समजण्यास मदत झाली.

यातूनच पुढे एड्सची  ‘रक्ततपासणी चाचणी’ ही रोगनिदान पद्धती विकसित झाली. एड्स झालेल्या रोग्याला सर्वसाधारणपणे कॅपॉसिस सार्कोमा हा कॅन्सर होतो. अशा परिस्थितीत एचआयव्ही-१ या विषाणूतील  टॅट प्रथिनांचा (Tat Proteins) कॅन्सर पेशींच्या व्रणांच्या वाढीवर होणारा परिणाम शोधून काढण्यासाठी हा प्रकल्प साकारला होता. विशेष असे की  वॉन्ग–स्टाल यांनी या संशोधनातून  हे सिद्ध केले की टॅट प्रथिनांचा आणि कॅन्सर पेशींवरील व्रणांचा थेट प्रमाणित संबंध आहे. या संशोधनामुळे रोगोपचार पद्धतीत आमूलाग्र क्रांती झाली. एड्सवर मात करण्यासाठी एकच औषध नाही तर अनेक औषधे मिळून उपचार केले जातात हा विचार त्यांच्या संशोधनातूनच आला.

सन २००२ साली कॅलिफोर्निया विद्यापीठातून निवृत्त झाल्यावर त्याच ठिकाणी त्या ‘फ्लोरेन्स रिफोर्ड चेअर’ वर त्यांची मानद प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली.  त्याच वेळी  ‘इम्युसोल’ या संस्थेत प्रमुख विज्ञान अधिकारी म्हणूनसुद्धा त्यांनी जबाबदारी स्वीकारली. कालांतराने या संस्थेचे नाव बदलून ‘iTherX’ औषधी संस्था  असे ठेवण्यात आले. या संस्थेत हेपॅटायटीस-सी या रोगावर औषध निर्मितीसाठी  संशोधन सुरू आहे.

‘डिस्कव्हर’ ने त्यांना २००२साली ‘अति विशेष महिला संशोधक’ म्हणून सन्मानित केले. २००७ साली ‘द डेली टेलिग्राफ’ ने त्यांना ‘उच्चतम १०० हयात विद्वानांपैकी एक’ म्हणून गौरवले. अमेरिकेच्या विज्ञान माहिती संस्थेने त्यांना ‘१९८० च्या दशकातील उच्चतम महिला शास्त्रज्ञ’ म्हणून गौरवले. २०१९साली त्यांचा ‘नॅशनल वूमनस हॉल ऑफ फेम’ मध्ये समावेश करण्यात आला आहे.

कॅलिफोर्निया यथे त्यांचा मृत्यू झाला.

संदर्भ :

  • Flossie Wong-Staal, Robert Gallo ; 1 November 1987 ; Completed Nucleotide Sequences of Functional Clones of the AIDS Virus ; AIDS research and Human Retroviruses , Vol 3.
  • Flossie Wong-Staal, Robert Gallo; 13 January 1989; AIDS-Kaposi’s Sarcoma Derived Cells Express Cytokines With Autocrine and Paracrine Growth Effect.; Science Vol. 243 .
  • Trenton Straube ; July 16 2020 ;  RIP Flossie Wong-Staal , Scientist who made Pivotal HIV Discoveries ; Courtesy : National Cancer Istitute , US.

समीक्षक : मुकुंद बोधनकर