मोर्स, एडवर्ड रो : (२४ जानेवारी १७३१- २२ नोव्हेंबर १७७८) एडवर्ड रो मोर्स यांचा जन्म लंडनच्या केंटस्थित टन्स्टलमध्ये झाला. मोर्स लंडन येथील मर्चंट टेलर्स शाळेंत दाखल होऊन मॅट्रिक्युलेट झाले. त्यानंतर ते ऑक्सफर्डमधील क्वीन्स महाविद्यालयातून बी.ए. व नंतर एम.ए. उत्तीर्ण झाले.

ऑक्सफर्डच्या विद्यार्थी दशेत आपल्या तीव्र बुद्धिमत्तेने आणि सखोल विचारशीलतेने त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. त्यांना गणिताची विशेष आवड होती. याबरोबरच वंशावळींचा अभ्यास (heraldry) करून तत्संबंधीचे ऐतिहासिक दस्तऐवज संग्रहित करण्याचा त्यांना छंद होता. ऑक्सफर्डमधील काळातच त्यांचे सुप्रसिद्ध संकलित आणि संपादित काम ‘Nomina et insignia gentilitia nobilium equitumque Sub Edoardo Primo Rege militantium. Accedunt classes exercitus Edoardi tertii regis Caleten obsidentis’ प्रकाशित झाले. या आधारे त्यांना सोसायटी ऑफ अँटिक्वेरीजने सदस्यत्व दिले.

त्यांनी १७५०-५१ या काळात सालिस्बेरीत पुरासंशोधन केले. १७५२ मध्ये ते लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ आर्मस (हेराल्ड) मध्ये नोकरीस होते. नंतरच्या काळांत त्यांनी अनेक व्यक्ती, संस्था, कला (विशेषतः मुद्रण) या संदर्भांतील अर्वाचीन कागदपत्रांची छाननी करून, ते कालक्रमानुसार संग्रहित केले. त्यांच्या अपूर्व आणि उपयुक्त कार्यांची नोंद घेत १७५२ मध्ये सोसायटी ऑफ अँटिक्वेरिजने त्यांना अधिछात्रत्व दिले.

जेम्स डोडसन यांनी सर्वप्रथम द सोसायटी फॉर इक्विटेबल ॲश्युअरन्सेस ऑन लाईव्हज् अँड सर्व्हायव्हरशिपची कल्पना १७५६च्या सुमारास मांडली होती. सोसायटीच्या संकल्पनेपासून ते तिच्या चालणाऱ्या सर्वच कामकाजांत डोडसन यांच्यासह कायमच सहभागी होते. त्यामुळे १७५७ मध्ये डोडसन निधन पावल्यावर, मोर्स यांच्याकडे सोसायटीचे नेतृत्त्व एकमताने सोपविण्यात आले. मूळच्या सोळा सदस्यांसह मोर्सनी एका कराराद्वारे ‘द सोसायटी फॉर इक्विटेबल ॲश्युअरन्सेस ऑन लाईव्हज् अँड सर्व्हायव्हरशिप’ (आताची ओळख इक्विटेबल लाईफ) १७६२मध्ये रीतसर स्थापन केली. शंभर पौंड वार्षिकीवर मोर्स सोसायटीचे कायमस्वरूपी संचालक झाले.

सोसायटीची घटना लिहिण्याची जबाबदारी प्रामुख्याने मोर्स यांची होती. नव्या सोसायटीच्या मुख्य प्रभारी अधिकाऱ्याला त्यांनी ॲक्च्युअरी हे पदनाम सुचविले. रोमन साम्राज्यांतील सिनेटमध्ये चालणाऱ्या कामकाजांची नोंद ठेवणाऱ्या अधिकाऱ्याला ॲक्च्युअरीअस (actuaries) संबोधले जाई. या ॲक्च्युअरीअसमधूनॲक्च्युअरी शब्द उगम पावला आहे. पूर्वीच्या काळी ॲक्च्युअरीवर सचिवाची जबाबदारी असे. परंतु संचालक म्हणून मोर्सवर नोंदी ठेवण्यासह, गणिती प्रगणन करण्याची जबाबदारीही होती. १७७५ पासून मात्र ॲक्च्युअरीच्या पदासाठी आधुनिक गरजांनुसार संभाव्यता आणि आर्थिक व्यवहारांत कुशल असलेल्या विलियम मॉर्गनसारख्या गणितींची निवड केली जाऊ लागली.

नव्या विमाग्राहकांसाठी सोसायटीची माहितीपुस्तिका तयार करण्याचे काम मोर्स यांनी केले. यांत मोर्स यांनी तत्कालिन समकक्ष, संयुक्त (union) विमा कार्यालये, सुप्रसिद्ध ॲमिकेबल सोसायटी यांच्या विमापत्रांचा संदर्भ दिला होता. त्यांच्या तुलनेत, आपल्या सोसायटीचे वेगळेपण, विमाधारक होणाऱ्या कोणत्याही वयाच्या व्यक्तिसाठी समन्यायी (equitable) हप्ता ठरविण्याची भक्कम गणिताधारित पद्धत, भविष्यातील दावे निपटण्यासाठी सक्षम आर्थिक परिस्थिती निर्माण करण्याची शास्त्रीय योजना, इत्यादी स्पष्ट केले होते. आयुर्विमा म्हणजे केवळ जीवनातील आकस्मिकपणे उद्भवणाऱ्या खर्चांपासूनचे कवच नसून उत्तरायुष्यात निश्चित आणि नियमित उत्पन्न देणारा मार्ग असल्याची मांडणीही मोर्स यांनी केली होती.

मोर्स यांच्या विचार मंथनातून तयार झालेला शास्त्रीय विमा योजनेचा आराखडा नंतरच्या बऱ्याच आधुनिक विमा योजनांचा पाया ठरला. हप्त्यांचे नियंत्रण वयांनुसार तर झालेच, परंतु विमा योजनेला वय, आरोग्य किंवा आर्थिक परिस्थितीची मर्यादा राहिली नाही. डोडसन यांच्या सारण्यांचा आधार घेत दीर्घ मुदतीच्या जीवन विम्याच्या हप्त्याचा दर शास्त्रोक्त पद्धतीने निश्चित करणारी, इक्विटेबल लाईफ ही पहिली संस्था होती. ज्या विमा कंपन्या गणिती किंवा शास्त्रीय पायाविनाच विमा व्यवसाय करीत होत्या, त्यांना व्यवसायांत टिकून राहण्यासाठी मोर्स यांच्या शास्त्रीय पद्धती स्विकाराव्या लागल्या.

मोर्स यांनी सोसायटीच्या कार्याला दिशा देण्यासाठी विमाशास्त्र-गणित, तत्संबंधी कायदे, विमा व्यवहार यांचा सखोल अभ्यास, तोपर्यंत उपलब्ध असलेली प्रमाण विमापुस्तके, सारण्या वापरून केला होता. सोसायटीकडील उपलब्ध हस्तलिखितांच्या तीन खंडांत मोर्स यांच्या हस्ताक्षरातील आकडेमोड आणि विमाहप्त्यांच्या सारण्या आहेत.

मोर्स यांच्या कार्याचे वेगळेपण म्हणजे, साचेबद्ध नसलेल्या जीवनविम्याचा हप्ता निश्चित करणे. ठराविक पद्धतीच्या जीवनविम्याचा हप्ता डोडसन यांच्या किंवा सोसायटीकडे असलेल्या इतर तयार सारण्या वापरून निश्चित करता येत. परंतु विमा ग्राहकांच्या गरजेनुसार विशेष करार करताना हप्त्यांचे मूल्य उपलब्ध सारण्या पाहून निश्चित करता येत नसे. यासाठी मोर्स वेगळी आकडेमोड करत. १७६४ मध्ये मोर्स यांनी सोसायटीने १७६७ पर्यंत देय होणाऱ्या सर्व विमापत्रांची अद्ययावत यादी जाहीर केली. यात कोणत्या प्रकारची किती विमापत्रे वितरीत झाली त्याचा तपशील असून ठराविक मुदतीच्या किंवा संपूर्ण आयुष्याच्या, विविध प्रकारच्या जीवन वार्षिकींची आणि विम्यांची नोंद आहे. शेवटच्या चार पृष्ठांत, सोसायटीने वितरित केलेल्या खास विमापत्रांचे वर्णन आहे.

संस्थांचे कालवृत्तांत तयार करण्याच्या मोर्स यांच्या आवडीनुसार त्यांनी १७६२ मध्ये ‘A Short Account of the Society for Equitable Assurances, & Co.’, सोसायटीचा अहवाल प्रकाशित केला. १७६६ मध्ये त्यांनी ‘The Statutes and Precedents of sundry Instruments relating to the Constitution and Practice of the Society’ प्रकाशित केले. १७६८मध्ये त्यांनी ‘Deed of Settlement with the Declaration of Trust’, आणि ‘List of the Policies and other printed Instruments of the Society’, प्रकाशित केले. यामुळे सोसायटीचा इतिहास नंतरच्या काळांतील कामकाजाशी निगडीत लोकांना ज्ञात होत राहिला.

मोर्स यांची इक्विटेबल लाईफ सुमारे २०० वर्षांहून अधिक काळ विमा व्यवसायात उत्तम प्रकारे टिकून राहिली होती. याला कारण म्हणजे मोर्स यांनी संस्थेला घालून दिलेला भक्कम शास्त्रीय पाया होता.

संदर्भ :

समीक्षक :  विवेक पाटकर