स्पेनच्या दक्षिण भागातील प्रमुख नदी व जलवाहिनी. आयबेरियन द्वीपकल्पावरील ही पाचव्या क्रमांकाची लांब नदी आहे. ही नदी दक्षिण स्पेनच्या अँदेल्युसिया प्रांतातून वाहते. ‘वादी अल-कबीर’ या अरबांनी दिलेल्या मूळ अरेबिक भाषेतील नावावरून या नदीस ‘ग्वादलक्वीव्हर’ असे नाव मिळाले आहे. याचा अर्थ ‘महान नदी’ असा होतो. पूर्वीच्या काळी रोमन या नदीस ‘बेटीस’ असे संबोधत असत. ग्वादलक्वीव्हर नदीची एकूण लांबी सुमारे ६५७ किमी. असून पाणलोट क्षेत्र ५७,८०३ चौ. किमी. आहे. ग्वादलक्वीव्हर नदीचा उगम दक्षिण जेन प्रांतात, सिएरा नेवाडा पर्वतरांगेच्या उत्तरेस स्थित कॅझोर्ला पर्वतांत, स. स. पासून सुमारे १,६०० मीटर उंचीवर होतो. उगमानंतर ही नदी उत्तरेस ४८ किमी. पर्यंत एका अरुंद दरीतून वाहते. एल ट्रँको दे बेस या जलाशयातून बाहेर पडल्यानंतर ग्वादलक्वीव्हर नदी सर्वसाधारणपणे प्रथम नैर्ऋत्येस, त्यानंतर पश्चिमेस आणि पुन्हा नैर्ऋत्येस वाहते. अंदुजार आणि मॉन्टोरो या दोन शहरांदरम्यान ही नदी रुंद मैदानांतून वाहते. कॉर्डोबा शहरातून पुढे आल्यानंतर ग्वादलक्वीव्हर नदी पोसाडास आणि लॉरा डेल रिओ या सुपीक प्रदेशांना जलसिंचन करत पुढे सेविला शहरात प्रवेश करते. सेविलाच्या पुढे ती दक्षिण वाहिनी होते. पुढे किनारी मैदानांमधून शांतपणे नागमोडी वळणे घेत लास मारिस्मस या स्पेनच्या सर्वांत मोठ्या दलदलीच्या प्रदेशातून वाहत ग्वादलक्वीव्हर नदी कॅडीजच्या आखाताच्या पूर्व टोकाशी असलेल्या सॅनलकार दे बॅरमेडा येथे अटलांटिक महासागरास मिळते.

एब्रो, टॅगस आणि ग्वाद्द्याना या नद्यांप्रमाणे ग्वादलक्वीव्हर नदी ही स्पेनमधील सर्वाधिक लांबीच्या नद्यांपैकी एक आहे. जेनील ही ग्वादलक्वीव्हर नदीची प्रमुख उपनदी आहे.  जेनील नदी सिएरा नेवाडाच्या पर्वतरांगेत उगम पावते आणि पाल्मा देल रिओ येथे ग्वादलक्वीव्हर नदीस मिळते. ग्वादलक्वीव्हर नदीस सुमारे ८०० उपनद्या मिळतात. त्यांपैकी ग्वादियाना, मेनॉर, ग्वादालबुलन, ग्वादाझोस, कॉर्बोन्स, ग्वादैरा या डाव्या काठावरील; तर ग्वादलीमार, ग्वादियामर, जॅनडूला, येगुस, ग्वादालमेलातो, ग्वादियातो, बेंबेझर, व्हियार या उजव्या काठावरील महत्त्वाच्या उपनद्या आहेत.

ग्वादलक्वीव्हर नदीकाठच्या वनस्पती आणि प्राणिजीवनाच्या वैविध्यतेमुळे या नदीखोऱ्यातील नैसर्गिक पर्यावरण यूरोपातील एक समृद्ध पर्यावरण मानले जाते. यूरोप खंडातील तसेच उत्तर आफ्रिकेतील अर्ध्याहून अधिक वनस्पतीप्रजाती येथे आढळून येतात. आजूबाजूचे पर्वतीय प्रदेश पाईन आणि ओक या वृक्षांनी आच्छादलेले आहेत. वनस्पतीजीवनाप्रमाणेच येथील प्राणी जीवनही यूरोप खंड आणि उत्तर आफ्रिकेतील प्रजातींनी समृद्ध केले आहे. पर्वतीय प्रदेशांमध्ये रानडुक्करे, शेळ्या, लहान जातीचे हरणे, छोटी काळवीटे तसेच तितर यांसारखे प्राणी व पक्षी आढळतात. यामुळे ग्वादलक्वीव्हर नदीचा हा प्रदेश यूरोपातील एक महत्त्वाचा शिकारी प्रदेश ठरला आहे. ग्वादलक्वीव्हर नदीच्या मुख्य प्रवाहात, जलाशयांत आणि उपनद्यांमध्ये ट्राऊट आणि बार्बेल यांसारखे गोड्या पाण्यातील मासे मुबलक प्रमाणात मिळतात.

ग्वादलक्वीव्हर नदीवर अनेक पूल तसेच धरणे बांधण्यात आली आहेत. कॉर्डोबा शहरातील रोमनकालीन पूल हा यातील सर्वांत जुना पूल आहे. एकोणिसाव्या शतकातील प्युएन्ते दे त्रियाना तसेच विसाव्या शतकातील प्युएन्ते दे अलमिलो, प्युएन्ते दे व्ही सेन्तेनारिओ हे महत्त्वाचे पूल आहेत. नदीच्या वरच्या पात्रातील एल ट्रँको दे बेस हे धरण इ. स. १९२९ मध्ये बांधले गेले आणि इ. स. १९४४ मध्ये त्यावरील जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित झाला. डेन प्रांतातील उबेदा नगरातील डोना अल्डोंझा हेदेखील एक महत्त्वाचे धरण आहे.

ग्वादलक्वीव्हर नदीच्या रुंद आणि सुपीक मैदानांतील सिंचन क्षमतेमुळे अँदे ल्युसिया प्रांतातील शेती विकसित झाली आहे. ग्वादलक्वीव्हर नदीकाठावरील एक तृतीयांशपेक्षा जास्त क्षेत्र ऑलिव्हच्या उपवनांनी व्यापलेले आहे. त्याच बरोबर ग्वादलक्वीव्हर नदीच्या खोऱ्यात गहू आणि बार्ली यांसारख्या तृणधान्यांची आणि द्राक्षलागवडीची शेतीदेखील केली जाते. तसेच अभियांत्रिकी प्रगतीमुळे नदीकाठावरील नगरांचे औद्योगिकीकरण शक्य झाले आहे. जलसिंचनाबरोबरच जलवाहतुकीच्या दृष्टीनेही ही स्पेनमधील प्रमुख नदी आहे.

ग्वादलक्वीव्हर नदीच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे हा प्रदेश पर्यटनासाठी महत्त्वाचा आहे. या नदीकाठावरील सेविला या बंदरास विशेष महत्त्व आहे. इ. स. १५१९ मध्ये फर्डिनांड मॅगेलान या खलाशाने याच बंदरातून सागरी प्रदक्षिणेस सुरुवात केली होती. तसेच सोळाव्या शतकात हे बंदर यूरोपचे महत्त्वाचे सागरी व्यापारी केंद्र होते. ग्वादलक्वीव्हर नदीच्या डाव्या काठावर स्थित सेविला नगरात ‘द टॉरे देल ऑरो’ हा अरबांनी तेराव्या शतकात बांधलेला मनोरा आज पर्यटनाचे केंद्र बनले आहे. सध्या या मनोऱ्यामध्ये सेविलाचे नाविक वस्तुसंग्रहालय वसलेले आहे. येथे रोइंग आणि कनोइंग यांसारख्या क्रिडाप्रकारांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा भरविल्या जातात.

समीक्षक : वसंत चौधरी