उत्तर अमेरिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थित असलेले पूर्व पॅसिफिक महासागरातील एक आखात. याला कॉर्तेझचा समुद्र किंवा मार दे कॉर्तेस या नावांनीही ओळखले जाते. मेक्सिको देशाच्या वायव्य किनाऱ्यावर हे आखात आहे. हे आखात पूर्वेस मेक्सिकोच्या मुख्य भूमीने, तर पश्चिमेस बाजा कॅलिफोर्निया या पर्वतीय द्वीपकल्पाने वेढलेले आहे. वायव्य‌‌-आग्नेय दिशेत पसरलेल्या या आखाताचा आकार लांबट व अरुंद आहे. या आखाताची लांबी सुमारे १,२०० किमी. व सरासरी रुंदी १५३ किमी. असून मुखाजवळची रुंदी सुमारे ३२० किमी. आहे. त्याचे क्षेत्रफळ १,६०.००० चौ. किमी. असून किनारपट्टीची लांबी सुमारे ४,००० किमी. आहे. या आखातामध्ये ९०० पेक्षा अधिक बेटे व द्वीपके आहेत. त्यांपैकी ३७ बेटे मोठी असून त्यांतील आंहेल दे ला ग्वार्दा व तीबरोन ही दोन बेटे सर्वांत मोठी आहेत. येथील बेटे ज्वालामुखी क्रियेतून निर्माण झालेली असून काही बेटांवर ज्वालामुखीही आढळतात. बहुतांश बेटे पश्चिम किनाऱ्यावर आहेत. आखाताच्या अरुंद भागात असलेल्या आंहेल दे ला ग्वार्दा व तीबरोन या दोन बेटांमुळे हे आखात उत्तर आणि दक्षिण अशा दोन भागांत विभागले आहे. उत्तरेकडील भाग उथळ असून क्वचितच त्याची खोली १८० मी. पेक्षा जास्त आहे. दक्षिण भागात अनेक ठिकाणी खळगे असून त्यांपैकी सर्वाधिक खळग्यांची खोली ३,००० मी. पेक्षाही अधिक आढळते. आंहेल दे ला ग्वार्दा आणि तीबरोन या बेटांजवळच्या अरुंद भागात विशेषत: सॅल्सिप्यूड्स बेसिनमध्ये धोकादायक अशा भरतीच्या लाटा निर्माण होत असल्यामुळे जलवाहतुकीत अडथळे येतात. आखाताचा किनारा अनियमित असल्यामुळे तेथे अनेक उपसागर निर्माण  झाले आहेत.

आखाताच्या उत्तर टोकाशी कोलोरॅडो नदी येऊन मिळते. तिने आपल्या मुखाशी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती केली आहे. आखाताच्या पूर्व किनाऱ्यावर रुंद किनारपट्टी मैदान तयार झाले असून किनारपट्टी मैदानाला लागून उच्चभूमी प्रदेश आहे. या उच्चभूमी प्रदेशातून आणि किनारपट्टी मैदानातून अनेक नद्या वाहत येऊन या आखाताला मिळतात. रीओ देल फुअर्ती, मायो, सीनालोआ, सनोरा व याकी या प्रमुख नद्या आखाताला पूर्वेकडून मिळतात. आखाताच्या पश्चिम किनाऱ्यावरील बाजा द्वीपकल्पावर ल पाझ, तर मुख्य भूमीच्या किनारपट्टीवर ग्वायमस ही प्रमुख बंदरे आहेत. त्याशिवाय पश्चिम किनाऱ्यावर सँता रोझालीआ, सॅन फलीपे आणि पूर्व किनाऱ्यावर प्वेर्तो पीनास्को, बहीआ कीनो, टपोलोबाम्पो ही बंदरे आहेत.

बाजा कॅलिफोर्निया द्वीपकल्पावरील पर्वतरांगांमुळे या प्रदेशात सागरी हवामानापेक्षा अधिक खंडीय प्रकारचे हवामान अनुभवास येते. पारिस्थितिकीय दृष्ट्या कॅलिफोर्नियाचे आखात हा पृथ्वीवरील समृद्ध सागरी प्रदेश आहे. या आखातात ५,००० पेक्षा अधिक जातीचे सूक्ष्म-अपृष्ठीय जीव, असंख्य सागरी जीव आणि ९०० पेक्षा अधिक मत्स्यप्रकार आढळतात. त्याशिवाय येथे प्रवाळशैलभित्ती, डॉल्फिन मासे, सागरी कासवे इत्यादी मोठ्या संख्येने आढळतात. आखातात काही समृद्ध व्यापारी मत्स्यक्षेत्रे असून त्यांत प्रामुख्याने कोळंबी, टुना व सार्डिन जातीचे मासे मोठ्या प्रमाणात पकडले जातात. आखातातील अनेक छोट्याछोट्या बंदरांत क्रीडा मासेमारी करणारी जहाजे आढळतात. नैर्ऋत्य किनाऱ्यावर काही प्रमाणात मोती मिळविण्याचा व्यवसाय केला जातो. इ. स. १९७८ पासून येथील सर्व बेटे आणि द्वीपके वन्यप्राणिजीवन व स्थलांतरित पक्ष्यांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. २००० पासून ती सर्व बेटे वनस्पती व प्राण्यांसाठी संरक्षित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आली असून यूनोस्कोने त्या सर्वांचा  समावेश जागतिक वारसास्थळांत केला आहे.

भूशास्त्रीय अभ्यासानुसार या आखाताची निर्मिती भूपट्टांच्या हालचालींमुळे सुमारे ५.३ द. ल. वर्षांपूर्वी झालेली असावी. भूपट्टांच्या हालचालींमुळे येथील ‘सॅन अँड्रेअस फॉल्ट’ या विभंगरेषेवर बाजा कॅलिफोर्निया द्वीपकल्प उत्तर अमेरिकन भूपट्टापासून सावकाशपणे अलग झाल्यामुळे या आखाताची निर्मिती झाली. त्याच बरोबर या भागात काही उर्ध्वगामी हालचाली होत असाव्यात. त्यामुळे हे द्वीपकल्प वर उचलले जाऊन आखाताचा भाग खाली खचला असावा. भूवैज्ञानिकांचा असा अंदाज आहे की, भूखंडवहनामुळे भविष्यात बाजा कॅलिफोर्निया द्वीपकल्प मुख्य भूमीपासून पूर्णपणे वेगळे होऊन एका नवीन बेटाची निर्मिती होऊ शकते.

स्पॅनिश समन्वेषक नून्येथ दे गुझमन हे पॅसिफिक किनाऱ्याचे समन्वेषण करत असताना इ. स. १५३२ मध्ये या भागात आले होते; परंतु हे एक आखात असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यानंतर  इ. स. १५३५ मध्ये एर्नान कॉर्तेस यांनी स्वत:च दुसरी सफर काढली. त्या वेळी हे आखात पार करून ते बाजा द्वीपकल्पावर आले. त्या वेळी त्यांना बाजा द्वीपकल्प हे बेट असल्याचे वाटले. इ. स. १५३९ मध्ये स्पॅनिश समन्वेषक फ्रांथीस्को दे ऊयोआ यांनी मेक्सिकोच्या पश्चिम किनाऱ्याचे समन्वेषण करत असताना बाजी हे बेट नसून ते द्वीपकल्प असल्याचे दाखवून दिले. या आखातातील पाण्यात प्लवक आढळल्यामुळे त्यांनी या आखाताला ‘मार बर्मेहो’ (व्हर्मिल्यन समुद्र) हे नाव दिले. तसेच त्यांनी एर्नान कॉर्तेस यांच्या नावावरून कॉर्तेसचा समुद्र (सी ऑफ कॉर्तेस) हे नावही दिले. ग्वादलूप करारानुसार संयुक्त संस्थानांनी कॅलिफोर्नियाचे आखात, बाजा द्वीपकल्प आणि बाजा द्वीपकल्प व मेक्सिकोची मुख्य भूमी यांना जोडणारी जमिनीची अरुंद पट्टी मेक्सिकोला दिली.

समीक्षक : वसंत चौधरी