समुद्राचा किंवा महासागराचा जमिनीकडे आत घुसलेला जलभाग सामान्यपणे आखात या संज्ञेने ओळखला जातो. काही ठिकाणी मात्र अशा जलभागास उपसागर, समुद्र, बाइट, फर्थ, साउन्ड किंवा फ्योर्ड या संज्ञांनीही संबोधित केले आहे. तिन्ही बाजूंनी किंवा क्वचित अंशत: भूवेष्टीत, अरुंद मुख, मोठा विस्तार, जास्त खोली, खारे पाणी, दंतुर किनारा, जलवाहतुकीस योग्य ही आखाताची सामान्य वैशिष्ट्ये आहेत; मात्र अनेक आखातांच्या बाबतीत ही सर्व वैशिष्ट्ये आढळतीलच असे नाही. उपसागराच्या मानाने आखाताचा आकार लहान असतो आणि त्याचे मुखही अरुंद असते. उपसागर हा लहानसा समुद्रच असतो. तो बराचसा रुंद असतो. आखाताची वैशिष्ट्ये काही उपसागरांमध्येही दिसून येतात. इंग्रजीतील गल्फ (आखात) याचा अर्थ ‘समुद्राचा जमिनीकडे घुसलेला भाग’ आणि बे (उपसागर) याचा अर्थ ‘लहान भाग’ असा होतो. त्यामुळे ‘गल्फ’ आणि ‘बे’ यांतील फरक निश्चित स्वरूपाचा दिसत नाही. त्यामुळे तिन्ही बाजूंनी जमिनीने वेढलेल्या जलभागास आखात किंवा उपसागर केव्हा म्हणावे, याचे निश्चित मोजमाप नाही. जगात असंख्य आखाते आहेत; परंतु त्या प्रत्येकाचे भूशात्रीय स्वरूप व तळाची रचना, आकार, विस्तार, खोली, त्यातील पाण्याचे गुणधर्म, निर्मितीची कारणे इत्यादींमध्ये भिन्नता आढळते. प्रामुख्याने भूकवचातील हालचालींमुळे यांची निर्मिती झालेली आढळते. भूकवचात प्रस्तरभंग होऊन त्यातील दोन्ही बाजूचे प्रस्तर तूटून एकमेकांपासून दूर जाण्याने, त्यांचे निमज्जन होण्याने, भूकवचातील भूपट्टांच्या सांध्यांच्या दरम्यान निर्माण होणाऱ्या दाब किंवा ताणामुळे खड्डा पडण्याने किंवा एक भूपट्ट दुसऱ्या भूपट्टाखाली सरकण्याने (दाबला जाण्याने) निर्माण झालेले खोल भाग सागरमग्न होऊन किंवा भूहालचालींमुळे द्रोणी प्रदेश निर्माण होण्याने आखातांची निर्मिती होते. आखाते सामान्यपणे लगतच्या सामुद्रधुनीने समुद्राशी किंवा महासागराशी जोडलेली असतात.

जगातील वेगवेगळ्या आखातांची वैशिष्ट्ये वेगवेगळी आढळतात. एडनचे आखात हे अरबी समुद्राचा एक भाग असून दोन्ही भागातील भरती-ओहोटी, बाष्पीभवन, वर्षण इत्यादींत साम्य आढळते. तांबडा समुद्र व एडनचे आखात यांना बाब-एल्-मांदेब सामुद्रधुनीने जोडले आहे. तांबड्या समुद्रात सुएझ व अकाब ही दोन आखाते आहेत. सुएझ आखातातून सुएझ कालव्याने भूमध्य समुद्रात जाता येते. अकाबचे आखात अरब व इझ्राएल यांचे संघर्षक्षेत्र बनले आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र हे दोन्ही साधारण सारखे आकारमान आणि समान मोसमी अभिसरण प्रवाह असलेली; परंतु आखाताची सर्व वैशिष्ट्ये आढळत नसली, तरी काही वेळा ती आखातेच असल्याचे मानले जाते. आखात म्हणून मानले, तर बंगालचा उपसागर (क्षेत्रफळ २१,७२,००० चौ. किमी.) हे सर्वांत मोठे आखात ठरेल. आखाते ही एका किंवा अधिक सामुद्रधुनींनी समुद्राशी किंवा महासागराशी जोडलेली असतात. काही आखाते दोन विरुद्ध दिशांना समुद्राला किंवा दुसऱ्या आखाताला मिळतात. उदा., बॅफिन उपसागर, एडनचे आखात व ओमानचे आखात. पर्शियन (इराणचे) आखात हॉर्मझ सामुद्रधुनीने ओमानच्या आखाताशी जोडलेले आहे, तर ओमानचे आखात हा अरबी समुद्राचा फाटा आहे. पर्शियन आखाताभोवती मध्यपूर्व आशियातील प्रसिद्ध तेल उत्पादक देश आहेत. काही आखातांच्या मुखाशी द्वीपसमूह आढळतात. उदा., स्वीडन-फिनलंडदरम्यानचे बॉथनियाचे आखात. मार्मारा समुद्र, अ‍ॅझॉव्ह समुद्र यांना समुद्र म्हटले जात असले, तरी ते प्रत्यक्षात दुसऱ्या समुद्राची आखाते आहेत. अ‍ॅझॉव्ह समुद्र हे काळ्या समुद्रातील आखात आहे. उत्तर अमेरिका खंडाच्या आग्नेय भागात मेक्सिकोचे आखात आहे. जगातील हे सर्वांत मोठे (क्षेत्रफळ १५,५०,००० चौ. किमी.) आखात मानले जाते. फ्लॉरिडा सामुद्रधुनीने ते अटलांटिक महासागराशी जोडलेले आहे. उत्तर अमेरिकेतील सर्वांत लांब व मोठी मिसिसिपी नदी या आखाताला मिळते. या आखातामुळे तेथून जाणाऱ्या उष्ण प्रवाहाला ‘गल्फ स्ट्रीम’ हे नाव देण्यात आले आहे.

एडनचे आखात

खोल, कोनीय आखाते प्रामुख्याने प्रस्तरभंग किंवा खचदऱ्यांत निर्माण झालेली आढळतात. या आखातातील तळाची रचना अनियमित असते. उदा., नॉर्वेतील वॉरंगर फ्योर्ड. समांतर प्रस्तरभंगांच्या दरम्यान निर्माण झालेली आखाते खोल, अरुंद व समांतर किनारे असलेली असतात. उदा., कॅलिफोर्नियाचे आखात. हे सर्वांत लहान आखातांपैकी एक आहे. अस्सल फ्योर्ड आखाताच्या बाबतींत रुंदीपेक्षा लांबी कितीतरी जास्त असते. उदा., सेंट लॉरेन्सचे आखात. काही आखातांच्या बाबतींत त्यांच्या लांबीपेक्षा रुंदी अधिक आहे. उदा., ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनाऱ्यावरील ग्रेट ऑस्ट्रेलियन बाइट (रुंदी २,८०० किमी.). गिनीचे आखात सर्वाधिक खोल (६,३६३ मी.) असून त्याची खोली बंगालच्या उपसागराच्या खोलीपेक्षा सुमारे १,००० मी. पेक्षाही अधिक आहे.

सागरी किनारा साधारण सरळ असेल, तर तेथे क्वचितच एखादे आखात आढळते; परंतु किनारा अनियमित, दंतुर व भूशास्त्रीय

मेक्सिकोचे आखात

दृष्ट्या जटिल असेल, तर तेथे एकाच प्रकारची अनेक आखाते निर्माण झालेली आढळतात. दंतुर किनारा लाभलेल्या आखातांवर बंदरांचा विकास होऊन त्यांतून मोठ्या प्रमाणावर जलवाहतूक होते. उदा., पर्शियन आखात, एडनचे आखात, मेक्सिकोचे आखात. आखात जर नरसाळ्याच्या आकाराचे असेल, तर त्याच्या शीर्षभागाकडे खोली कमी होत जाते आणि तेथे भरती-ओहोटीची तीव्रता खुल्या सागरापेक्षा कितीतरी जास्त असते. उदा., इंग्लंड-वेल्स यांदरम्यानचा ब्रिस्टल चॅनेल, दक्षिण अमेरिकेतील यूरूग्वाय-अर्जेंटिना यांदरम्यानचे अटलांटिकमधील रिओ दे ला प्लाता आखात, रशियाच्या पूर्व किनाऱ्यावरील शेलिकॉफ आखात. कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावरील फंडी उपसागर (आखात) भरतीच्या वेगवान व उंच लाटांसाठी प्रसिद्ध असून तेथे भरतीची कक्षा १८ मी. इतकी अधिक आढळते. अशा आखातांत भरतीजन्य उरफाटा धबधबा निर्माण होतो. अरुंद मुख आणि महासागरापासून तुटक असलेल्या आखातातील पाण्यात लयबद्ध पद्धतीने हेलकावे चालू असतात. अशी लयबद्ध आंदोलने उत्तर समुद्रातील हेल्गोलँडर उपसागरात आणि फिनलंडच्या आखातात दिसून येतात. ज्या आखातात खुल्या सागरातील लाटांचा प्रभाव नसतो किंवा केवळ स्थानिक लहान लाटा आढळतात, अशी आखाते बंदरांच्या विकासास व जलवाहतुकीस अनुकूल ठरतात. महासागरापासून आखात जर दूर असेल आणि नद्या (विशेषत: बारमाही) मोठ्या प्रमाणावर मिळत असतील, तर अशा आखातांत गाळाचे संचयन जास्त होऊन ती उथळ बनतात; परंतु तेथे भरती-ओहोटीचा प्रभाव अधिक असेल, तर मात्र अवसादाचे प्रमाण कमी राहते. येथील पाण्याची लवणताही कमी राहते.

कॅलिफोर्नियाचे आखात

आखात आणि लगतचा समुद्र किंवा महासागर यांच्यातील पाण्याचे गुणधर्म किंवा इतर घटकांत साधर्म्य असतेच असे नाही. ही तफावत आखाताचे क्षेत्र, त्याचे आकारमान, खोली, तळाची भूरचना, महासागरापासूनचे अंतर, हवामान, मुखाजवळची रुंदी इत्यादी घटकांवर अवलंबून असते. समुद्र व आखात यांदरम्यानच्या तळावर कटकरचना असेल, तर दोन्ही भागातील पाण्याची अदलाबदल होत नाही. आर्द्र हवामानाच्या प्रदेशात तेथील आखातांना नद्यांमार्फत गोड्या पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे लगतच्या समुद्रापेक्षा येथील पाण्याची लवणता कमी राहते. उदा., बाल्टिक समुद्र व कारा समुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावरील आखाते. स्वीडन-फिनलंड यांदरम्यानचे बॉथनियाचे आखात सर्वांत कमी क्षारतेसाठी (दर हजारी २) प्रसिद्ध आहे. ज्या प्रदेशात वसंत ऋतूत बर्फ वितळून गोड्या पाण्याचा पुरवठा होतो, त्या आखाताच्या शीरोभागी पाण्याची लवणता कमी राहते. याउलट ओसाड प्रदेशातील आखातांना नद्यांमार्फत मर्यादित गोड्या पाण्याचा पुरवठा होतो आणि तेथे बाष्पीभवन अधिक होत असते. त्यामुळे तेथे लवणता अधिक आढळते. उदा., पर्शियन आखात आणि कॅस्पियन समुद्रातील कारा-बोगाझ-गल आखात. या सर्वांचा परिणाम तेथील परिसंस्थांवर होतो.

भारताच्या पाश्चिमेकडील अरबी समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या गुजरात राज्याच्या किनाऱ्यावर कच्छचे आणि खंबायतचे अशी दोन आखाते आहेत. पुष्कळदा कच्छच्या आखातातील पाणी कच्छच्या छोट्या रणात शिरते. या आखातावर ओखा, मांडवी, कांडला व बेदी ही बंदरे आहेत. खंबायतच्या आखाताला साबरमती, मही, नर्मदा व तापी या प्रमुख नद्या मिळतात. खंबायत, भावनगर, भडोच, सुरत ही आखातावरील बंदरे आहेत. या आखात परिसरात महत्त्वाची तेलक्षेत्रे आहेत (उदा., अंकलेश्वर). भारताच्या आग्नेय टोकाशी भारत-श्रीलंका यांदरम्यान मानारचे आखात आहे. नैसर्गिक मोती मिळविण्याच्या उद्योगासाठी हे आखात पूर्वीपासून प्रसिद्ध आहे.

समीक्षक : माधव चौंडे