अटलांटिक आणि पॅसिफिक या महासागरांना एकत्र जोडणारी सामुद्रधुनी किंवा खाडी (चॅनेल). दक्षिण अमेरिका खंडाच्या अगदी दक्षिण टोकावरील उत्तरेकडील मुख्य भूमी आणि दक्षिणेकडील टिएरा डेल फ्यूगो बेट यांच्या दरम्यान ही सामुद्रधुनी आहे. ही संपूर्ण सामुद्रधुनी चिली देशात असून तिच्या अगदी पूर्वेकडील भागाला अर्जेंटिनाची सीमा येऊन भिडलेली आहे. या सामुद्रधुनीची लांबी ५६० किमी. आणि रुंदी ३ ते ३२ किमी. आहे. अटलांटिक महासागरातील केप व्हर्जिन्स आणि केप अस्पिरटू सँतो या भूशिरांपासून तिच्या पश्चिमेकडील विस्तारास सुरुवात होते. सुरुवातीला ती नैर्ऋत्य दिशेत विस्तारलेली आहे. त्यानंतर ती ब्रंझविक द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकावरील केप फ्रोवर्ड भूशिराजवळ एक मोठे वळण घेऊन वायव्येकडे विस्तारत जाते. डेसलेशन बेटावरील केप पिलर भूशिराजवळून पुढे जाऊन पॅसिफिकमध्ये पोहोचते. या सामुद्रधुनीवरील पूंता अरेनस हे प्रमुख बंदर ब्रंझविक द्वीपकल्पावर आहे. या बंदरातून मोठ्या प्रमाणावर चिलीयन मटणाची निर्यात केली जाते.

पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला पोर्तुगीज समन्वेषक व दर्यावर्दी फर्डिनंड मॅगेलन यांनी पहिल्यांदा या सामुद्रधुनीचा शोध लावून २१ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर १५२० या कालावधीत तिच्यातून यशस्वी रित्या प्रवास केला. मॅगेलन सामुद्रधुनीचे मूळ नाव ‘एस्ट्रेचो दे तोडस लॉ सांतस’ (स्ट्रेट ऑफ ऑल सेंट्स) असे होते. स्पेनचे सम्राट चार्ल्स पाचवा यांनी मॅगेलन-एल्कानो यांच्या सफरीसाठी अनुदान दिले होते. मॅगेलन यांनी या सामुद्रधुनीचा शोध लावून त्यांनीच पहिल्यांदा तिच्यातून प्रवास केल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ तिचे नाव मॅगेलनची सामुद्रधुनी असे बदलण्यात आले. ब्रिटिशांनी इ. स. १८२६ ते इ. स. १८३४ या कालावधीत या सामुद्रधुनीचे सखोल समन्वेषण केले.

सभोवतालच्या पर्वतरांगांमुळे तसेच मार्गातील अनेक बेटांमुळे व खाडीमुळे या सामुद्रधुनीचा आकार वाकडातिकडा, नागमोडी बनला आहे. वाकडातिकडा आकार, मार्गातील बेटे, ठिकठिकाणचा अरुंद भाग, थंड व धुकेयुक्त हवामान, जोरदार वारे आणि प्रवाह यांमुळे तिच्यातून वाहतूक करणे खूपच जिकीरीचे असे. तरीही पनामा कालवा बांधून पूर्ण होईपर्यंत (इ. स. १९१४) अटलांटिक – पॅसिफिक यांदरम्यानचा हा अगदी जवळचा आणि महत्त्वपूर्ण नैसर्गिक जलमार्ग होता. पनामाच्या निर्मितीनंतर मात्र या सामुद्रधुनीमार्गाचे महत्त्व कमी झाले. या सामुद्रधुनीतून वाहतूक करणे फार जिकिरीचे असल्यामुळे अलीकडे जहाजांवर कुशल व्यावसायिक कप्तान ठेवणे सक्तीचे केले आहे. दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण टोकावरील केप हॉर्न भूशिर आणि साउथ शेटलंड बेटे (अंटार्क्टिका) यांदरम्यानच्या अटलांटिक व पॅसिफिक यांना जोडणाऱ्या ड्रेक पॅसेज मार्गापेक्षा या सामुद्रधुनीतील मार्ग अधिक सुरक्षित आहे; कारण ड्रेक पॅसेज मार्ग खुल्या सागरी प्रदेशातील असून तेथील हवामान नेहमी वादळी स्वरूपाचे असते. मुख्य भूमीवरील पूंता डन्जेनेस आणि टिएरा डेल फ्यूगोवरील काबो देल अस्पिरटू सँतो यांच्या दरम्यानच्या चिली-अर्जेंटिना सीमेवरील मॅगेलन सामुद्रधुनीचे पूर्वेकडील (अटलांटिकमधील) निर्गमद्वार उपसागरी व रुंद आहे. चिली-अर्जेंटिना यांच्यात १९८४ मध्ये झालेल्या ट्रीटी ऑफ पीस अँड फ्रेंडशिप करारानुसार त्यांच्यातील सीमारेषा निश्चित करण्यात आली आहे. पॅसिफिकच्या पश्चिम निर्गमद्वाराला पॅसिफिकचे प्रवेशद्वार मानले जाते.

मॅगेलन सामुद्रधुनीत स्माइथ खाडी, मॅग्डालीना खाडी, पूंता डन्जेनेस भूभाग, डॉसन बेट, रीएस्को बेट, सेनो ऑट्वे साउंड इत्यादी महत्त्वाच्या जल व भूरचना आहेत. सामुद्रधुनीत अनेक बेटे आहेत. यांपैकी मॅग्डालीना बेटावर फार मोठ्या संख्येने पेंग्विनच्या वसाहती आढळतात. हे बेट लॉस पिंग्विनोज नॅचरल मॉन्युमेंटचा एक भाग मानले जाते. सामुद्रधुनीच्या मध्यात लॉस पिंग्विनोज नॅचरल मॉन्युमेंट असून त्यामध्ये ६०,००० पेक्षा अधिक पेंग्विन पैदास केंद्रे आहेत. पेंग्विनशिवाय इतर असंख्य सागरी पक्षी, जलचर आणि सागरी प्राणी येथे आढळतात.

मॅगेलन सामुद्रधुनी पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाची ठरली आहे. सामुद्रधुनीच्या काठांवर चिलीची अनेक राष्ट्रीय उद्याने व सागरी संरक्षित प्रदेश आहेत. येथे पर्यटकांना क्रूझ सफरींचा आनंद घेता येतो. त्यादृष्टीने निसर्गसुंदर बेटे, हिमनद्या, जलप्रपात, अरण्ये, वन्य प्राणिजीवन इत्यादींची मजा लुटता येईल अशा ठिकाणी क्रूझचे थांबे ठेवले जातात. या सामुद्रधुनीवर अनेक दीपगृहे उभारली आहेत.

समीक्षक : वसंत चौधरी