व्यापाराच्या उद्देशाने वस्तूंच्या अथवा मालाच्या वाहतुकीसाठी सातत्याने वापरात असणारे मार्ग. प्राचीन मानवी संस्कृतींच्या उदयापासून रस्त्यांचा, तसेच सागरी व नदीप्रवाहातील जलमार्गांचा उपयोग महत्त्वाकांक्षी व्यापारी व उद्योजक करीत आले आहेत; परंतु त्यांमध्ये सर्वांत आधी जमिनीवरील (खुष्कीचे) मार्ग अस्तित्वात आले. प्राचीन ईजिप्शियन, मेसोपोटेमिया, सिंधु, चिनी इत्यादी संस्कृतींच्या दरम्यान व्यापारी मार्ग अस्तित्वात असल्याचे पुरावे मिळतात. पूर्वी दूरवरच्या प्रदेशातील लोकांमध्ये वस्तुविनिमय पद्धतीनुसार एकमेकांच्या वस्तूंची देवाणघेवाण करण्याचे काम व्यापारी तांडे करीत. या व्यापारी तांड्यांचे मार्ग ठरलेले असत. हे मार्ग प्रामुख्याने खुष्कीचे होते. प्रादेशिक वैशिष्ट्यांनुसार व्यापारी तांडे वाहतुकीसाठी घोडा, गाढव, उंट, लामा, बैल इत्यादी प्राण्यांचा वापर करीत असत. प्राचीन काळातील फिनिशियन, ग्रीक, रोमन तसेच मध्ययुगीन काळातील यूरोपीय व अरब लोकांनी वापरलेल्या सागरी मार्गांचा मोठा इतिहास आहे. व्यापारी मार्गांवरील भौगोलिक, राजकीय व आर्थिक घटकांचा प्रभावही महत्त्वाचा ठरतो.

प्राचीन व मध्ययुगीन व्यापारी मार्ग : भूमध्य समुद्रातील क्रीट बेटावरील मिनोअन लोक इ. स. पू. २५०० ते १५०० या काळात समुद्रमार्गे ईजिप्त व ग्रीसशी व्यापार करीत असत. फिनिशियन व्यापारी खुष्कीच्या मार्गाने दूरवरच्या प्रदेशात व्यापारी दळणवळण करीत. ग्रीक काळात पश्चिमी देशांचे मध्य आशिया व भारताशी व्यापारी दळणवळण वाढले होते. रोमन राज्यकर्त्यांनी पश्चिम यूरोपभर सुंदर रस्ते बांधले, तसेच पहिल्यांदाच फरसबंदी व्यापारी सडका तयार केल्या. भूमध्य समुद्रकिनार्‍यालगतच्या ग्रीस आणि रोम यांचा भूमध्य समुद्र व तांबडा समुद्रमार्गे आफ्रिकेचा पूर्व किनारा आणि अरेबियन द्वीपकल्पावरील प्रदेशांशी व्यापार चालत असे.

टायग्रीस व युफ्रेटीस नद्यांच्या दुआब प्रदेशातील प्राचीन सुमेरियन संस्कृतीतील लोक व्यापारी तांडे घेऊन संपूर्ण पश्चिम आशियातून भूमध्य समुद्रापर्यंत प्रवास करीत असत. फिनिशियन व्यापारी ईजिप्त, ग्रीस, आशिया मायनर, इटली व ब्रिटिश बेटे यांना जोडणार्‍या जलमार्गांनी व्यापार करीत असत. पूर्वी आशिया ते यूरोपदरम्यानचा व्यापार बराच समृद्धावस्थेत होता. तो प्रामुख्याने उत्तर, मध्य व दक्षिण अशा तीन प्रमुख व्यापारी मार्गांनी केला जाई. त्यांपैकी उत्तरेकडील मार्ग म्हणजे रेशीम मार्ग. दुसरा मधला मार्ग पर्शियन आखातातून (इराणचे आखात) पुढे युफ्रेटीस नदीखोर्‍यातून काळ्या समुद्रकिनार्‍यापर्यंत किंवा सिरियातील दमास्कस शहरापर्यंत जात होता. तिसरा दक्षिणेकडील व्यापारी मार्ग चीनपासून सुरू होऊन भारताच्या दक्षिण टोकाला वळसा घालून तांबड्या समुद्रापर्यंत जलमार्गाने, तर तेथून पुढे नाईल नदीखोर्‍यातून उत्तर ईजिप्तपर्यंत खुष्कीच्या मार्गाने जात होता. श्रीलंकेवरून (सीलोन) मसाल्याचे पदार्थ व मोती; भारतातून कापूस, मसाल्याचे पदार्थ, मौल्यवान खडे आणि औषधी पदार्थ, तर अरेबियातून दालचिनी व धूप आणण्यासाठी या व्यापारी मार्गाचा अवलंब केला जाई.

प्राचीन रोमन साम्राज्यातील व्यापारी तत्कालीन ज्ञात जगात मोठ्या प्रमाणावर व्यापार करीत असत. रोमन रस्ते आल्प्स पर्वत पार करून त्यांचे फाटे स्पेन, फ्रान्स व जर्मनीपर्यंत नेण्यात आले होते. यूरोपीय व्यापारात जलमार्ग वाहतूकही महत्त्वाची ठरली होती. पश्चिम यूरोपातील सेन (Seine), र्‍हाईन, डॅन्यूब आणि पूर्व यूरोपातील व्होल्गा, डॉन या नद्यांमधून व्यापारी मालाची वाहतूक केली जात असे. त्याकाळी अटलांटिक महासागर किनार्‍यावरील बॉर्दो (Bordeaux) आणि नँट्स या बंदरांत फ्रान्सची वाइन व धान्य, ब्रिटनमधील धातू आणि स्पेनमधील तेल व शिसे यांची देवघेव केली जाई.

व्यापाराच्या निमित्ताने मध्ययुगीन कालखंडात (पाचवे ते पंधरावे शतक) मध्यपूर्वेतील मुस्लिम लोकांकडील नवनव्या नाविन्यपूर्ण वस्तू आणि ज्ञान यूरोपीय देशांकडे जाऊ लागले. मध्ययुगात यूरोपातील व्हेनिस आणि जेनोआ या शहरांनी व्यापारात जबरदस्त वर्चस्व प्रस्थापित केले होते. जहाजांद्वारे पूर्व आशियातील विविध प्रकारचा विकण्याजोगा माल या दोन बंदरांत आणला जाई. त्यानंतर त्यातील काही माल इटालियन जहाजांद्वारे स्पेन, इंग्लंड आणि फ्लँडर्स (सांप्रत बेल्जियममधील प्रांत) या देशातील बंदरांत नेला जाई. उर्वरित माल इटलीतील खुष्कीच्या मार्गाने आल्प्स पर्वत ओलांडून फ्रान्स आणि जर्मनीतील र्‍हाईन व डॅनूब नद्यांच्या काठावरील शहरांत आणला जाई. ‘हॅन्सिॲटिक लीग’ या व्यापारी संस्थेचे व्यापारी हा माल फ्लँडर्स किंवा जर्मनीत आणत असत. त्यानंतर तो माल इंग्लंड, पोलंड, रशिया व इतर बाल्टिक देशांत नेला जाई.

मानव जसजसा सुसंस्कृत बनत गेला तसतसा व्यापारी मार्गांचा विस्तार होत गेला. जगातील पूर्वी अस्तित्वात असलेल्या व्यापारी मार्गांपैकी काही मोजकेच व्यापारी मार्ग ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे ठरले असून त्यांनी जगाच्या इतिहासाला आकार दिला. विशिष्ट व्यापारी मार्गांवरून विशिष्ट मालाची सर्वाधिक वाहतूक केली जाई. त्या मालाच्या नावावरून ते-ते मार्ग ओळखले जात. प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या व्यापारी मार्गांपैकी काही प्रमुख नामनिर्देशित व्यापारी मार्ग खालीलप्रमाणे आहेत.

१) रेशीम मार्ग (Silk Route) : इ. स. पू. सुमारे पहिल्या शतकात सुरू झालेला हा एकच एक मार्ग नसून त्यात मुख्य मार्गाबरोबरच इतरही अनेक मार्गांचा समावेश होतो. चीनमधील प्राचीन व्यापारी केंद्रापासून पश्चिमेस हिंदुस्थान, आशिया मायनर, भूमध्य समुद्रकिनारा, कॅस्पियन व काळा समुद्रकिनारा, बायझंटिन (सांप्रत इस्तंबूल) आणि त्याच्याशी पुढे यूरोपपर्यंत या मार्गाचे फाटे होते. व्यापाराबरोबरच वेगवेगळ्या प्रदेशातील समाजा-समाजांमधील आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक आणि आचार-विचारांच्या देवाण-घेवाणीच्या दृष्टीनेही हा मार्ग विशेष महत्त्वाचा होता. या मार्गाने चीनकडून रोमन साम्राज्याकडे रेशीम पाठवून त्याच्या बदल्यात लोकर, तांबे, सोने इत्यादी माल आणला जाई. तेराव्या शतकात इटालियन प्रवासी मार्को पोलो याच मार्गाने चीनकडे गेला होता.

२) मसाला मार्ग (Spice Route) : या मार्गाने आशिया, आफ्रिका व यूरोप एकमेकांना जोडले गेले होते. या मार्गाने मिरी, लवंग, दालचिनी, जायफळ इत्यादी मसाल्याच्या पदार्थांची आशियाकडून यूरोपकडे वाहतूक केली जाई. पंधराव्या शतकापूर्वी या मार्गावरून होणार्‍या व्यापारावर अरब आणि उत्तर आफ्रिकेतील दलालांचे वर्चस्व होते. त्यामुळे हा माल महाग आणि दुर्मिळ असायचा; परंतु त्यानंतरच्या समन्वेषण युगात (पंधरावे ते सतरावे शतक) नव्या सागरी मार्गांच्या शोधामुळे आणि जलवाहतुकीतील नव्या तंत्रज्ञानामुळे दूरवरचे सागरी प्रवास शक्य होऊ लागले. त्यामुळे यूरोपीयनांचे आशियातील हिंदुस्थान, इंडोनेशिया, चीन, जपान इत्यादी प्रदेशांशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित झाले.

३) धूप मार्ग (Incense Route) : अरेबियन द्वीपकल्पाच्या अगदी दक्षिण भागातून (सांप्रत येमेन व ओमान) मोठ्या प्रमाणावर धूप आणि हिराबोळचे उत्पादन होत असे. या प्रदेशांतून भूमध्य समुद्रकिनार्‍यावरील ईजिप्त, ग्रीक व रोमन साम्राज्यांकडे ज्या मार्गाने धूप व हिराबोल पाठविला जाई, त्या मार्गाला धूप मार्ग म्हणून ओळखले जाते. धूप व हिराबोळ व्यापाराच्या उत्कर्षाच्या काळात त्याची प्रतिवर्षी सु. ३,००० टनांची वाहतूक या मार्गावरून केली जाई.

४) अंबर मार्ग (Amber Route) : पुरातत्त्वीय पुराव्यांनुसार अंबरपासून बनविलेल्या वस्तूंचा वापर ख्रिस्तपूर्व सु. ३००० वर्षांपूर्वीपासून केला जाई. बाल्टिक समुद्रकिनार्‍यालगतच्या खडकांत अंबरचे साठे आढळत असत. त्या प्रदेशातून उर्वरित यूरोपीय देशांकडे अंबरच्या वस्तू पाठविण्यासाठी विकसित केलेल्या मार्गाला अंबर मार्ग म्हणून ओळखले जाई. प्राचीन यूरोपातील अंबर मार्गाचा वापर इ. स. पू. १९०० ते इ. स. पू. ३०० या काळात इट्रुस्कन व ग्रीक व्यापारी करीत असत.

५) चहा मार्ग (Tea Route) : चीनमधील हेंगडुआन पर्वतातील चहा उत्पादक प्रदेशापासून तिबेटमार्गे हिंदुस्थानपर्यंत येणार्‍या व्यापारी मार्गाला चहा मार्ग म्हणून ओळखले जाई. हा रस्ता अनेक नद्यांना पार करत जात असल्यामुळे प्राचीन व्यापारी मार्गांपैकी हा सर्वांत असुरक्षित मार्ग होता. या मार्गाने चीनचा चहा आणि तिबेटी लढाऊ घोडी यांच्या देवघेवीचा व्यापार होई. सुंग घराण्याच्या राजवटीत (इ. स. ९६० – १२७९) या मार्गावरून सर्वाधिक म्हणजे प्रतिवर्षी सु. २०,००० तिबेटी घोड्यांच्या बदल्यात सु. ८,००० टन चहाचा व्यापार केला जात असे. सागरी मार्ग अधिक लोकप्रिय होऊ लागल्यानंतर या मार्गाचे महत्त्व कमी झाले; परंतु दुसर्‍या महायुद्धात जपानने अनेक सागरी बंदरांवर प्रवेशबंदी आणल्यामुळे पुन्हा त्याचे महत्त्व वाढले होते.

६) मीठ मार्ग (Salt Route) : मिठाच्या व्यापारासाठी वापरात असलेल्या वेगवेगळ्या मार्गांपैकी इटलीतील व्हाया सलॅरीअन हा २४२ किमी. लांबीच्या प्राचीन रोमन मार्ग विशेष प्रसिद्ध होता. रोमजवळील ऑस्टियापासून इटलीमार्गे एड्रिॲटिक समुद्रकिनार्‍यापर्यंत जाणार्‍या मार्गाला मीठ मार्ग म्हणून ओळखले जाई. जर्मनीच्या उत्तर भागातील ल्यूनबर्गपासून ल्यूबेकपर्यंतचा सु. १०० किमी. लांबीचा मार्ग जुना मीठ मार्ग म्हणून ओळखला जातो.

७) सहारातील व्यापारी मार्ग (Trans-Saharan Trade Route) : उत्तर आफ्रिकेपासून पश्चिम आफ्रिकेपर्यंतच्या विस्तृत सहारा वाळवंटी प्रदेशातून अनेक आडवे-तिडवे गेलेले व्यापारी मार्ग आढळत. हे मार्ग इ. स. चौथ्या शतकात अस्तित्वात आले. अकराव्या शतकात या मार्गावरून हजारो उंटांच्या काफिल्यामार्फत सहारा प्रदेशातून प्रामुख्याने सोने, तांबे, मीठ, कापड इत्यादींची वाहतूक केली जाई.

८) कथील मार्ग (Tin Route) : पहिल्या सहस्रकात ब्रिटनच्या अगदी नैऋत्य भागातील कॉर्नवॉल येथील खाणीतून मिळणारे कथील समुद्रमार्गाने फ्रान्स, ग्रीस व त्याच्याही पुढे पाठविले जाई. ब्राँझयुगापासून लोहयुगापर्यंत कथील मार्ग महत्त्वाचा होता.

९) गुलामांचा व्यापारी मार्ग (Slave Trade Route) : आफ्रिका – यूरोप – अमेरिका व कॅरिबियन बेटे यांदरम्यानच्या त्रिकोणी व्यापार मार्गांपैकी ज्या मिडल पॅसेज किंवा अटलांटिकमार्गे गुलामांचा व्यापार केला जाई, त्या मार्गाला गुलामांचा व्यापार मार्ग म्हणून संबोधले जाते.

१०) मलाक्का सामुद्रधुनी मार्ग (Malacca Strait Route) : इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर यांदरम्यानच्या मलाक्का सामुद्रधुनीतून जाणार्‍या मार्गामुळे हिंरी व पॅसिफिक महासागर एकमेकांना जोडले गेले आहेत. पुरातन काळापासून रोमन, ग्रीक, चिनी व भारतीय व्यापार्‍यांनी या नैसर्गिक सामुद्रधुनी मार्गाचा वापर केल्याचे आढळते. सुएझ कालव्याच्या निर्मितीनंतर तर या मार्गाचे महत्त्व अधिकच वाढले. आज हा जगातील प्रमुख सागरी मार्गांपैकी एक बनला आहे. भूराजनिती आणि लष्करी डावपेचाच्या दृष्टीने या मार्गाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

११) लापीस लाझूली मार्ग (Lapis Lazuli Route) : सांप्रत पाकिस्तानाच्या पश्चिम भागात, पाकिस्तान-अफगाणिस्तान सरहद्दीदरम्यान असलेल्या चागाई टेकड्यांत लापीस लाझूली हे खनिज मोठ्या प्रमाणावर मिळत असे. त्याचा उपयोग चैनीच्या व धार्मिक वस्तूंच्या निर्मितीसाठी केला जाई. प्राचीन ईजिप्तमध्ये त्या वस्तूंना मोठी मागणी असे. त्यांच्या व्यापारासाठी चागाई टेकड्यांपासून ईजिप्तमधील नाईल नदीच्या तीरावरील हायरकॉन्पलसपर्यंतचा व्यापारी मार्ग इ.स.पू. चौथ्या सहस्रकात सुरू झाला होता. मानवी इतिहासातील सर्वांत जुन्या ज्ञात व्यापारी मार्गांपैकी हा एक मार्ग आहे.

नव्या व्यापारी मार्गांचा शोध (The search for New Routes) : पंधराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंतचा काळ हा समन्वेषणाचा काळ मानला जातो. यूरोपीयनांना आशियाकडे जाण्यासाठीच्या पूर्वीच्या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर कर द्यावा लागे. त्यामुळे वस्तू महाग पडायच्या. तसेच दीर्घ प्रवासात लूटालूट व इतर अनेक अडथळे यायचे. त्यासाठी गस्त पथकेही नेमावी लागत. त्याचबरोबर इटालियन शहरे आणि राज्यांची व्यापारात मक्तेदारी निर्माण झाली होती. त्यामुळे यूरोपीय व्यापार्‍यांना मालाच्या खरेदीसाठी जास्त किंमत मोजावी लागे. त्यामुळे त्यांना नफा कमी मिळत असे. मध्ययुगात यूरोपकडून पूर्वेकडे जाणार्‍या मार्गांपैकी एक प्रमुख मार्ग कॉन्स्टँटिनोपल (इस्तंबूल) या शहरातून जात होता. तुर्कांनी १४५३ मध्ये कॉन्स्टँटिनोपल काबीज केल्यानंतर पूर्वेकडे जाणारे खुष्कीचे व्यापारी मार्ग बंद केले. या सर्व कारणांमुळे पर्यायी व्यापारी मार्गांचा शोध घेण्याची निकड निर्माण झाली. पंधराव्या शतकात यूरोपीय राष्ट्रांनी पूर्व आशियाकडे जाणार्‍या नव्या मार्गांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

यूरोपीयनांनी काढलेल्या समन्वेषण सफरींमुळे नव्या जगाचा (अमेरिकेचा) आणि अनेक नवीन व्यापारी मार्गांचा शोध लागला. त्यांनी उत्तर अमेरिकेतील प्रदेशांचे समन्वेषण करून तेथे आपल्या वसाहती स्थापन केल्यानंतर हडसन, सेंट लॉरेन्स, मिसिसिपी व मिसूरी या नद्यांच्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर फरचा व्यापार सुरू केला. अनेक यूरोपीयन देशांनी आपला व्यापार वाढविण्यासाठी, व्यापारावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि व्यापार नियमनासाठी वेगवेगळ्या व्यापारी कंपन्यांची स्थापना केली. उदा., ईस्ट इंडिया कंपनी. पोर्तुगीजांनी पहिल्यांदा यूरोप ते हिंदुस्थान आणि ईस्ट इंडिज बेटे यांदरम्यान व्यापार विकसित केला. त्यांचे अनुकरण करून स्पॅनिश, डच, फ्रेंच आणि इंग्रज यांनीही आपल्या व्यापारी साम्राज्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रदेशांत आपल्या वसाहतींची स्थापना करून साम्राज्यविस्तार केला.

कोलंबस यांनी लावलेला अमेरिकेचा शोध, फर्डिनंड मॅगेलन यांची पहिली पृथ्वी प्रदक्षिणा, जॉन कॅबट यांनी उत्तर अटलांटिक पार करून न्यू फाउंडलंडजवळील ग्रँड बँक या जगप्रसिद्ध मत्स्यक्षेत्राचा लावलेला शोध, वास्को-द-गामा यांचे आफ्रिकेच्या दक्षिण टोकावरील केप ऑफ गुड होपला वळसा घालून हिंदुस्थानच्या भूमीवर पोहोचणे, यूरोपीयनांनी उत्तर अमेरिकेत स्थापन केलेल्या वसाहती इत्यादींमुळे अटलांटिक महासागरातील तसेच केप व्यापारी मार्गाचा विकास होत गेला. उत्तर अटलांटिक तर आज जगातील सर्वांत गजबजलेला व्यापारी सागरी मार्ग आहे.

एकोणीसाव्या शतकात आंतरराष्ट्रीय व्यापारात फार मोठे बदल झाले. औद्योगिक क्रांतीनंतर उत्पादनांत प्रचंड वाढ होऊन वाहतुकीच्या नवीन साधनांचा विकास होत गेला. लांब पल्ल्याचे रस्ते व लोहमार्ग बांधण्यात आले. विसाव्या शतकात जागतिक दळणवळण व देवाणघेवाण प्रचंड प्रमाणात वाढत गेली. एकविसाव्या शतकात तर सर्व प्रकारचे भू-मार्ग, जलमार्ग व हवाई मार्ग व्यापारासाठी खुले झाले असून आंतरजालावरील (इंटरनेटवरील) व्यापाराचीही नवी वाट उपलब्ध झाली आहे.

आधुनिक व्यापारी मार्ग (Today’s Trade Routes) : आज जगात अगणित व्यापारी मार्ग असून त्यांनी संपूर्ण जग व्यापले आहे. काही आंतरखंडीय महामार्ग, द्रुतगती मार्ग व लोहमार्ग निर्माण करण्यात आले असून रस्ते व लोहमार्गांचे दाट जाळे निर्माण झाले आहे. हवाई मार्गांनी जगातील दूरवरची ठिकाणे एकमेकांना जोडली गेली आहेत. अनेक ठिकाणी अंतर्गत जलमार्गांचे दाट जाळे निर्माण झाले आहे. सागरी मार्गांनी वेगवान आणि बळकट जहाजांच्या साह्याने फार मोठ्या प्रमाणावर व्यापारी मालाची वाहतूक केली जाते.

जगातील प्रमुख रस्त्यांपैकी अ.सं.सं. आणि कॅनडातील पूर्वेस अटलांटिक किनार्‍यापासून पश्चिमेस पॅसिफिक किनार्‍यापर्यंत जाणारे आंतरखंडीय महामार्ग, उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तर टोकापासून दक्षिण अमेरिका खंडाच्या दक्षिण टोकापर्यंत जाणारा पॅन अमेरिकन महामार्ग (लांबी सु. ४८,००० किमी.), ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनार्‍यापासून ते पूर्व किनार्‍यापर्यंतचा महामार्ग हे जगातील काही प्रमुख आंतरखंडीय महामार्ग असून ते व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.

जगातील काही आंतरखंडीय लोहमार्ग व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे ठरले आहेत. त्यांपैकी रशियातील ट्रान्स-सायबीरियन लोहमार्ग (जगातील सर्वांत लांब), कॅनडातील कॅनडियन पॅसिफिक, कॅनडियन राष्ट्रीय लोहमार्ग, दक्षिण अमेरिकेतील ट्रान्स-अँडियन (चिली-अर्जेंटिना), आफ्रिकेतील केप-कैरो या जगातील प्रमुख आंतरखंडीय लोहमार्गांवरून मोठ्या प्रमाणावर व्यापारी मालवाहतूक केली जाते.

जगातील अनेक नद्या, सरोवरे व कालव्यांतून मोठ्या प्रमाणावर व्यापारी माल वाहतूक होते. उदा., उत्तर अमेरिकेतील पंचमहासरोवरे, सेंट लॉरेन्स, मिसिसिपी, मिसूरी या नद्या, दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन, यूरोपातील र्‍हाईन, डॅन्यूब इत्यादी प्रमुख नद्या व त्यांना जोडणारे असंख्य कालवे.

सागरी जलवाहतूक हा सर्वांत स्वस्त वाहतुकीचा प्रकार असल्यामुळे विशेषतः अवजड व्यापारी मालाच्या दूरवरच्या वाहतुकीच्या दृष्टीने त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांपैकी उत्तर अटलांटिक हा जगातील सर्वांत गजबजलेला सागरी मार्ग आहे. त्याशिवाय सुएझा कालवा, पनामा कालवा, केप ऑफ गुड होप मार्ग, दक्षिण अटलांटिक, उत्तर व दक्षिण पॅसिफिक मार्ग हे जगातील महत्त्वाचे सागरी मार्ग आहेत.

वजनाने हलक्या, नाशवंत व मौल्यवान वस्तूंच्या व्यापारी वाहतुकीसाठी हवाई मार्गांचा वापर केला जातो.

भारतातील व्यापारी मार्ग : ख्रिस्तपूर्व पहिल्या सहस्रकात हिंदुस्थान व पश्चिम आशियाई प्रदेश यांच्यात व्यापारी संबंध असल्याचे पुरावे मिळतात. ऋतुनुसार विशिष्ट दिशेने नियमित वाहणार्‍या मोसमी वार्‍यांच्या शोधामुळे भारत-पश्चिम आशिया यांदरम्यान अरबी समुद्रातून व्यापारी जहाजांची ये-जा वाढली. रोमन साम्राज्य काळातही त्या प्रदेशाशी उत्तर हिंदुस्थानचा खुष्कीच्या मार्गाने, तर दक्षिण हिंदुस्थानचा सागरी मार्गाने व्यापार चालत असे. व्यापारी जहाजे प्रथम भारताच्या पश्चिम किनार्‍यावर येत असत व तो माल भूमार्गे पूर्व किनार्‍यावरील प्रदेशात पाठविला जात असे. तत्कालीन सागरी व्यापारी मार्ग प्रामुख्याने हिंदुस्थानातील बंदरांपासून पर्शियन (इराण) आखात व तांबड्या समुद्रापर्यंत आणि तेथून जमिनीवरून भूमध्य समुद्राच्या पूर्वेकडील प्रदेश व ईजिप्तपर्यंत जात असत. भारतीय व्यापारी मार्ग आग्नेय आशियातही पोहोचले होते. नद्यांची खोरी व मौर्यकालीन रस्ते हे भारतातील प्रमुख व्यापारी मार्ग होते. तक्षशिला-पाटलीपुत्र यांना जोडणारा व पुढे ताम्रलिप्तीपर्यंत (गंगेच्या त्रिभुज प्रदेशातील प्रमुख बंदर) गेलेला शाही महामार्ग मौर्यांनी बांधला असल्याचे ग्रीक संदर्भावरून आढळते. पश्चिम किनार्‍यावरील भरूकच्छ किंवा भृगुकच्छ (सांप्रतचे भडोच) बंदर राजस्थानमार्गे व उज्जैनमार्गे गंगेच्या खोर्‍याशी जोडले होते. नर्मदा खोर्‍यापासून दख्खनच्या पठाराच्या वायव्य भागाकडे व तेथून पठारावरील पूर्ववाहिनी नद्यांना अनुसरून जाणारे रस्ते काढण्यात आले होते. या मार्गांवरून बैल व गाढवांच्या तांड्यांमार्फत उन्हाळ्यात व हिवाळ्यात व्यापारी वाहतूक केली जाई. पावसाळ्यात वाहतूक शक्य होत नसे. जेथे शक्य आहे, तेथे सागर किनार्‍याने किंवा नदीतून जलवाहतूक केली जात असे.

उत्तरेकडे तक्षशिलेपासून काबूल कंदाहारपर्यंत रस्ता काढला होता आणि तेथून त्याचे फाटे विविध दिशांना गेलेले होते. प्राशिया (इराण) पासून काळ्या समुद्र किनार्‍यावरील बंदरांना जोडणार्‍या रस्त्यांना हे रस्ते जोडले होते. चीनपासून मध्य आशियामार्गे बॅक्ट्रियापर्यंत जाणारा रस्ताच पुढे जुना रेशीम मार्ग (ओल्ड सिल्क रुट) म्हणून प्रसिद्ध झाला. या रस्त्याने कॅश्गार, यार्कंद, खोतान, कूप, काराशर व तुर्फान ही खारकच्छे जोडलेली होती. या प्रत्येक ठिकाणी व्यापारी ठाणी स्थापनाच्या कामी भारतीय व्यापार्‍यांचा सहभाग होता. मध्य आशियाई मार्गाने मोठ्या प्रमाणावर चिनी वस्तू हिंदुस्थान व पश्चिम आशियाई बाजारपेठांत आणल्या जात असत.

आज भारतात रस्ते आणि लोहमार्गाचे दाट जाळे निर्माण झाले आहे. कोलकाता-अमृतसर हा ग्रँड ट्रंक रोड; दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या प्रमुख चार शहरांना जोडणारा सुवर्ण चतुष्कोण महामार्ग हे प्रवासी वाहतुकीबरोबरच व्यापारी माल वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले आहेत. गंगा, ब्रह्मपुत्रा इत्यादी नद्या अंतर्गत जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरल्या आहेत. भारतीय द्वीपकल्पाच्या तिन्ही बाजूने समुद्र असल्यामुळे व्यापारी दृष्ट्या किनारी वाहतूक महत्त्वाची ठरली आहे.

समीक्षक : माधव चौंडे