इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर अ‍ॅन्ड नॅचरल रिसोर्सेस – आययूसीएन : (स्थापना: ५ ऑक्टोबर, १९४८) आंतरराष्ट्रीय निसर्ग व नैसर्गिक स्रोत संवर्धन संघटना म्हणजेच इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर अ‍ॅन्ड नॅचरल रिसोर्सेस – आययूसीएन (IUCN) ही आंतरराष्ट्रीय संस्था निसर्ग संवर्धन, नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर करण्यासाठी स्थापन झालेली आहे. अधिकृतपणे संस्थेच्या उद्देशामध्ये निसर्ग संवर्धन व नैसर्गिक संसाधन यांचे शाश्वत वापर सामाविष्ट केलेले आहे. (पहा संकेतस्थळ ) संस्थेची प्रमुख कामे माहिती गोळा करणे, माहिती विश्लेषण, संशोधन, स्थानिक प्रकल्प, प्रकल्प पाठपुरावा व प्रशिक्षण अशी आहेत. आययूसीएन जगभरात निसर्ग संवर्धनासाठी सर्व व्यक्ती व संस्था यांना नैसर्गिक स्त्रोतांचे वाटप पर्यावरणाची हानी न होता कसे करता येईल याची माहिती देते.

गेल्या काही दशकात आययूसीएनने आपले क्षेत्र संवर्धन व शाश्वत विकास असे केले आहे. आपल्या उद्दिष्टासाठी समाजाकडून निसर्ग संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी आययूसीएन शासन, उद्योग व या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था यांच्याकडून माहिती मिळवते. त्यांच्याबरोबर संयुक्त करार करते. अनेक व्यक्ती व संस्था यांच्याकडून आलेल्या सूचनेनुसार आयूसीएन संरक्षण आवश्यक असलेल्या प्राण्यांची व वनस्पतींची यादी बनवते. आययूसीएन यांच्याकडून प्रसिद्ध झालेल्या यादीस ‘रेड डाटा बुक’ किंवा ‘रेड लिस्ट ऑफ थ्रेटन्ड स्पेसिज’ असे म्हणण्याची  पद्धत आहे. त्यानुसार जगभरातील संरक्षित प्रजातीबद्दलचे धोरण ठरवता येते. जवळपास १,४०० शासकीय व अशासकीय संस्था आययूसीएनबरोबर सहयोगी किंवा सभासद संस्था म्हणून जोडलेल्या आहेत. १६,००० वैज्ञानिक आणि तज्ञ आययूसीएनचे काम स्वयंस्फूर्तीने करतात. पन्नास देशातून त्यांचे पूर्ण वेळ हजार कर्मचारी आययूसीएनचे काम पाहतात. स्वित्झर्लंड येथील ग्लॅन्ड या ठिकाणी संस्थेचे प्रमुख कार्यालय आहे. युनो कार्यालयातील आययूसीएनचा एक कायमस्वरूपी निरिक्षक आंतरराष्ट्रीय पातळीवर जैवविविधता आणि निसर्ग संवर्धन यावर लक्ष ठेवतो. वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड फॉर नेचर (WWF) आणि वर्ल्ड कॉन्झर्वेशन मॉनिटरिंग सेंटर यांच्या उभारणीत आययूसीएनचा वाटा आहे.

आययूसीएनची स्थापना फ्रांस मधील फुटनब्लू (Fountain blue) येथे झाली. संस्थेचे १९४८- १९५६ या काळातील नाव ‘इंटरनॅशनल युनियन फॉर प्रोटेक्शन ऑफ नेचर (आययूपीएन)’ होते. याच दिवशी फ्रान्स शासन व यूनेस्को यांच्या प्रतिंनिधींनी इंटरनॅशनल युनियन फॉर प्रोटेक्शन ऑफ नेचर (आययूपीएन) साठी एक कायदा संमत केला. युनेस्कोचे पहिले संचालक ब्रिटिश जैववैज्ञानिक सर ज्युलियन हक्सले यांची प्रेरणा यासाठी कारणीभूत ठरली. आययूपीएनची स्थापना झाली त्यावेळी निसर्ग संवर्धनासाठी असलेली ही एकमेव संस्था होती. फक्त याला अपवाद १९२२ साली स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय पक्षी संवर्धन मंडळाचा (Bird life International) होता.

आययूसीएन जेव्हा यूनेस्कोच्या सहकार्याने ब्रुसेल्समध्ये सुरू झाली त्यावेळी त्याच्या बरोबर ५६ सभासद देश सामील झाले. १९४९ साली झालेल्या लेक ससेक्स येथील निसर्ग संवर्धन कॉन्फरन्समध्ये अत्यंत धोक्यात आलेल्या सजीवांची पहिली यादी प्रसिद्ध झाली. पहिल्या काही वर्षांमध्ये आययूसीएन आर्थिक मदतीसाठी पूर्णपणे यूनेस्कोवर अवलंबून होती. त्यामुळे १९५४ साली त्यांना अनेक उपक्रम हळूहळू बंद करावे लागले. पण लवकरच वैज्ञानिकांच्या मदतीने कीडनाशकांचा वन्य जीवावर होणारा गंभीर परिमाण यासारख्या उपक्रमामुळे शासनाची त्यांना मदत मिळू लागली. सध्याचे ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर अ‍ॅन्ड नॅचरल रिसोर्सेस’ हे नाव १९५६ साली ठेवण्यात आले. १९६४ साली संयुक्त राष्ट्र संघ (युनो)च्या सहकार्याने कौन्सिल ऑफ यूरोपसोबत केलेल्या करारानंतर त्याच वर्षी आययूसीएनने सध्या प्रसिद्ध असलेल्या रेड डाटा बुकच्या प्रकाशनाचा प्रारंभ केला. प्रजातींच्या संवर्धन व संरक्षणाची अचूक व खात्रीलायक माहितीमुळे त्यांची विश्वासार्हता वाढली. लवकरच आंतरराष्ट्रीय संवर्धन कार्यक्रम व करारात सहकार्य करण्यात आफ्रिकन कन्व्हेंशन ऑन कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेसमध्ये आययूसीएन सामील  झाली.

आर्थिक दृष्टीने स्वयंपूर्ण होण्यासाठी आययूसीएनने १९६१ साली वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड फॉर नेचर (WWF) बरोबर सहकार्य केले. आययूसीएनच्या कार्यक्रमास आर्थिक मदत मिळवणे हे WWF चे काम ठरवले गेले. १९६१ साली आययूसीएनचे प्रमुख कार्यालय बेल्जियममधून स्वित्झरलँड येथील मोरजेस येथे आले. १९८० साली या दोन्ही संस्थांमध्ये तात्त्विक मतभेद होऊन WWF या संस्थेने आपले स्थानिक प्रकल्प स्वत: कार्यान्वित करण्यास सुरुवात केली.

एकविसाव्या शतकात आययूसीएन ही महत्त्वाची सल्लागार संस्था झाली आहे. जागतिक प्रकल्पांना त्यांच्या सहा उपशाखा निसर्ग संवर्धन अहवालावरून शासकीय परवानग्यांसाठी ना हरकत दाखले देतात. निसर्ग आधारित उपाय असे या पद्धतीस नाव दिले आहे. हवामान बदल, अन्न सुरक्षा आणि नैसर्गिक आपत्ती यावर सल्ला देणे हे आता आययूसीएनचे आणखी एक काम झाले आहे. जागतिक बँक आणि आययूसीएन संयुक्तपणे सागरात भिंत घालणे, नद्या अडवणे, जैवविविधता रक्षण यासारख्या प्रकल्पावर विचार करते.

संदर्भ :

समीक्षक : किशोर कुलकर्णी