मेस, जॉर्जिना : (१२ जुलै १९५३ – १९ सप्टेंबर २०२०) जॉर्जिना मेस यांचा जन्म लंडन येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सिटी ऑफ लंडन स्कूल फॉर गर्ल्समध्ये झाल्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल येथून प्राणीविज्ञानाचे शिक्षण घेतले. ब्रायटन येथील ससेक्स युनिव्हर्सिटीतून त्यांनी पीएच्.डी. ही पदवी मिळवली. तेथे त्यांचे तज्ञ मार्गदर्शक जॉन मेनार्ड स्मिथ हे होते. ते गणिती दृष्टीकोनीय उत्क्रांतीविषयक पारिस्थितिकी वैज्ञानिक होते. पीएच्.डी. नंतरचे त्यांचे संशोधन वॉशिग्टन येथे स्मिथसोनियन इन्स्टिट्यूटमध्ये झाले. त्यांच्या संशोधनाचे क्षेत्र पाळीव प्राण्यामधील आंतरप्रजननाचा परिणाम असा होता.
मेस नंतर लंडनच्या झूऑलॉजिकल सोसायटीतील इन्स्टिट्यूट ऑफ झूलॉजीच्या संशोधन विभागात रुजू झाल्या. येथे २३ वर्षे त्यांनी काम केले. सन २००० ते २००६ या काळात त्या संस्थेच्या संचालक होत्या. प्राण्यांच्या नमुन्यातील जनुकीय व्यवस्थापन आणि अल्पसंख्या असलेल्या प्राण्यातील आनुवंशिक प्रश्न असा त्यांचा अभ्यास चालू होता. त्यांच्या संशोधनामुळे पश्चिमी सपाटीच्या प्रदेशातील गोरीला (गोरीला गोरीला हे त्याचे शास्त्रीय नाव आहे) याशिवाय अरेबियन ओरिक्स किंवा ओरिक्स ल्यूकोरिक्स (पांढऱ्या रंगाचा असल्याने या अरेबियन हरणाचे नाव ‘ल्यूकोरिक्स’ ठेवले आहे Oryx leucoryx), आणि प्रेझ्वाल्स्की घोडा (Equus przewalskii) या तीन जवळजवळ नामशेष झालेल्या प्राण्यांचा बंदिस्त प्रजननातून संवर्धन करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यांनी अमेरिकेतील संख्या जीववैज्ञानिक (population biologist) रसेल लॅन्डे यांनी धोक्यात आलेल्या प्राण्यांच्या केलेल्या वर्गीकरणावर आक्षेप घेतला. त्यांनी केलेले वर्गीकरण गंभीर (critical), चिंताजनक (endangered), आणि संवेदनशील/असुरक्षित (vulnerable) असे होते. एखादी प्रजाती पुढील पाच वर्षात किंवा दोन पिढ्यांनंतर नामशेष होण्यासारखी स्थिती असल्यास त्यांच्या संरक्षणाचा प्रयत्न करावा असा होता. प्राणी संख्याजीव विज्ञानानुसार त्यांनी असे वर्गीकरण केले होते. मेस यांनी सध्या नामशेष होत नसेल परंतु नजीकच्या भविष्यात परिसर बदल झाल्यामुळे नामशेष होण्याची शक्यता असलेल्या प्राण्यांचा नवा गट करावा असे सुचवले. आता मात्र आययूसीएन आंतरराष्ट्रीय निसर्ग संरक्षण संघटना (IUCN –International Union for Conservation of Nature) मेस यांनी केलेल्या वर्गीकरणानुसार प्राण्यांची नोंद ठेवते. २००६ साली मेस या सेंटर फॉर पॉप्युलेशन बायॉलॉजी या इम्पिरियल कॉलेजतर्फे चालवल्या जाणाऱ्या संस्थेच्या संचालक झाल्या. या संस्थेमध्ये वातावरण/हवामान बदलामुळे कमी होत असलेल्या प्रजातीच्या नोंदी ठेवल्या जातात. त्यांनी वातावरणातील कार्बनडाय ऑक्साइड कमी करणाऱ्या नैसर्गिक पद्धतीवर मानवी हस्तक्षेपामुळे होणारा परिणाम, औषधांचा व कचरा व्यवस्थापन यांचा संबंध स्पष्ट केला.
मेस यांनी आनुवंश विज्ञान, संख्या जीवविज्ञान आणि स्थूल परिसरविज्ञान यामधील संबंध प्रथापित केला. या तीनही क्षेत्रात चाललेल्या संशोधनावर त्यांचे लक्ष असे. सहस्त्रकातील जैवविविधता पारिस्थिकी मूल्यांकन (Biodiversity on Millennium ecosystem assessment) या २००१ साली जाहीर केलेल्या ग्रंथाच्या त्या एक प्रमुख लेखिका होत्या. अन्न, गोडे (पिण्याचे) पाणी, लाकूड, तंतू आणि इंधन यांच्या वाढत्या मागणीमुळे जैवविविधतेवर अपरिवर्तनीय बदल झाला आहे, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. २०१० पर्यंत पर्यावरण व जैवविविधता संरक्षण धोरणास प्राधान्य द्यावे असे त्यांनी सुचवले होते.
मेस यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय जैवविविधता क्षेत्रात अनेक नवे बदल झाले. आंतरराष्ट्रीय जैवविविधता संघाच्या पहिल्या अमेरिकेबाहेरील प्रेसिडेंट म्हणून त्यांची निवड झाली. ब्रिटिश पारिस्थिकिय मंडळाच्या (British Ecological Society) त्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. त्यांना मिळालेल्या प्रतिष्ठित सदस्यत्वामध्ये २०१६ साली मिळालेल्या रॉयल सोसायटीच्या सदस्यत्वाचा समावेश आहे. त्यांचे स्वभाववैशिष्ट्य म्हणजे पर्यावरण रक्षण व जैवविविधता विभागात काम करणाऱ्या अनेक संस्था व व्यक्ती यांची अचानक एखाद्या समितीवर झालेली निवड. दूर राहून ज्या व्यक्ती किंवा संस्था खरेच काम करीत असतात त्यांच्यावर त्यांचे बारीक लक्ष असे. स्वत:बद्दल अत्यंत कमी बोलणे या त्यांचा गुण होता. मृत्यूपूर्वी केवळ नऊ दिवस आधी नेचर या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये त्यांचा परिसर संरक्षण आणि जैवविविधता यावर शोधनिबंध प्रसिद्ध झालेला होता. (D. Leclère et al. Nature 585, 551–556; 2020).
त्यांच्या पूर्ण व्यावसायिक कारकीर्दीत त्यांनी कोणतेही धोरण पुराव्याशिवाय मान्य केले नाही. त्यांच्या कारकीर्दीपूर्वी रेड डाटा बुकमध्ये एखादा प्राणी किंवा वनस्पती यांची नोंद त्या क्षेत्रातील तज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे होत असे. त्यात अचूकपणाचा अभाव होता. त्यांनी पूर्वीची पद्धत आमूलाग्र बदलली. सध्याची रेड लिस्ट अधिक उपयोगी व संदर्भ म्हणून खात्रीलायक मान्य होण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
लंडन येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
समीक्षक : मोहन मद्वाण्णा