बोरगावकर, गुलाब मोहम्मद  : (७ जुलै १९३१ – १८ जानेवारी १९८४). महाराष्ट्रातील विनोदी तमाशा कलावंत. बोरगाव ता. वाळवा जि. सांगली येथे नामांकित पहिलवान व स्वातंत्र्यसैनिक खाजेखान जमादार यांच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. गुलाबरावांना वडील खाजेखान यांच्याकडून प्रारंभी कुस्तीचे बाळकडू मिळाले. अनेक कुस्त्यांच्या फडातून ते हिरिरीने सहभाग घेत असत. कुस्ती सोबत कबड्डी या खेळातही ते पारंगत झालेले होते. कबड्डी खेळात गावच्या संघातून अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. घरातील गरिबी, दारिद्र्य पाचवीला पुजलेले असतानाही आपल्या हजरजबाबी स्वभावाने त्यांना कलेची आवड निर्माण झाली आणि त्यांनी लोकनाट्य तमाशात प्रवेश केला. लहानपणापासूनच त्यांना नाटक, भजन आणि तमाशा या कलाप्रकारांचे प्रचंड आकर्षण होते. हजरजबाबी स्वभाव, संवादफेकीची शैली आणि भाषेचे सौंदर्य या बाबी त्यांच्या कला आणि निवेदनात होत्या. सोंगड्याच्या रूपाने नावारूपाला आलेल्या गुलमहमंद या नावात बदल करून विनोदसम्राट गुलाबराव बोरगावकर असे नाव नंतर त्यांनी धारण केले.

गणपतराव व्ही माने चिंचणीकर लोकनाट्य तमाशा मंडळ आणि संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकरसह विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर तमाशा मंडळ या मंडळांची त्यांच्या काळात स्थापना झाली. त्या दोन्ही तमाशा मंडळात गुलाबरावांचा खूप मोठा सहभाग होता.तमाशातील ‘सोंगाड्या’ हे महत्त्वाचे पात्र असते. सोंगाड्या तमाशा रसिकांना क्षणभर दुःख विसरायला लावतो. तमाशातील सोंगाड्या वातावरणनिर्मिती करून, वास्तव टीका-टिप्पणी करून, शब्दांची  विविधांगी उधळण करीत असतो. तमाशातील दगडू साळी सुरालीकर, हरिभाऊ वडगावकर, शंकरराव अवसरीकर, सावळा औरंगपूरकर, काशीनाथ नारायणगाववर, खंडू खेडकर, ही प्रसिद्ध सोंगाड्याची पात्रे रंगविणारी मंडळी होती. या सर्व सोंगाड्याच्या बरोबरीच्या भूमिका गुलाबराव बोरगावकर यांनी साकारल्या. सोंगाड्याच्या भूमिकेतील नवनव्या प्रतिभांचे लेणे आत्मसात करण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. हसवण्याचे कौशल्य आपल्या प्रतिभेच्या बळावर सादर करण्याचे कलावैभव त्यांनी आत्मसात केले होते.

गुलाबरावांनी वगनाट्यात देखील भूमिका केल्या. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर माऊली या वगनाट्यातील त्यांनी केलेल्या धार्मिक, ऐतिहासिक व सामाजिक स्वरूपाच्या भूमिका खूप गाजल्या. १९८३ साली त्यांनी सादर केलेले ही झुंज मुरारबाजीची (पुरंदरचा रणसंग्राम) हे वगनाट्य खूप गाजले. त्यांनी दत्ता महाडिक यांच्यासह भिल्लांची टोळी, सत्ताधारी तो भ्रष्टाचारी, सुडाने पेटली लावणी, असे घराणे नष्ट करा ही वगनाट्ये अतिशय ताकदीने आणि प्रभावीपणे सादर केली.

गुलाबरावांनी तनमन लावून लोककलेची आजन्म सेवा केली. तमाशाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना, सामाजिक भान सतत जपण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांचे गाव मामासाहेब म्हणून त्यांना आदराने संबोधित करायचे. गावचा लाडका कलावंत म्हणून त्यांनी गावाची नाळ कधी तुटू दिली नाही. अनेक गावांमध्ये शाळेसाठी खास कार्यक्रम अगदीच कमी बिदागी घेऊन त्यांनी केले. १९७१ साली महाराष्ट्रातील मान्यवर मुख्यमंत्री आणि राजकीय नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. अतिशय मनमिळावू, संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून गुलाबरावांचे नाव तमाशासृष्टीत आदराने घेतले जाते.

संदर्भ : क्षेत्रसंशोधन