शिरोलीकर, दत्तोबा तांबे : (२३ जुलै १९२१- १८ जुलै १९८१). महाराष्ट्रातील तमाशा कलावंत, तमाशा फड मालक. ते समाजसेवक म्हणून सर्वपरिचित होते. कलगी संप्रदायाचे शाहीर, रचनाकार, तमाशा कलावंत दगडूबाबा साळी शिरोलीकर हे दत्तोबांचे वडील होत. त्यांच्या मातोश्रींचे नाव ठकुबाई. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बोरी जवळील शिरोली या गावी झाला. गावात तिसरी पर्यंत शिक्षण झालेल्या दत्तोबांना तमाशा कलेचे संस्कार प्राप्त झाले ते वडील दगडूबाबा साळी यांच्याकडून. वयाच्या पंचविशीत दत्तोबा तमाशात विनोदवीर म्हणून प्रकाशात आले ते दगडूबाबांमुळे. दगडूबाबा केवळ कलगी संप्रदायाची रचनाकार नव्हते तर उत्तम सोंगाडे होते. त्यांनी बडोद्याच्या गायकवाड राणी सरकारांपुढे शिमग्याच्या महोत्सवात तमाशा सादर केला होता. त्यांनी घेतलेल्या गरोदरबाईंच्या सोंगावर खुश होऊन राणी सरकारांनी त्यांना सोन्याचे कडे बक्षीस म्हणून दिले होते. अशा दगडूबाबांचे चिरंजीव दत्तोबांनी घरच्या तमाशा परंपरेचा लौकिक वाढविला. दगडूबाबांच्या फडातील संगमनेरचे प्रसिद्ध शाहीर गोविंद वाडेकर यांची मुलगी लक्ष्मीबाई हिच्याबरोबर दत्तोबांचा विवाह झाला. दगडूबाबांना १९५० च्या दरम्यान अंधत्व आले आणि २८ डिसेंबर १९५३ रोजी त्यांचे देहावसान झाले. त्यानंतर आपली भावंडे दिगंबर, जयराम, देवराम यांना सोबत घेऊन दत्तोबांनी तमाशा फडाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.चंद्राबाई पुणेकर, सोनुबाई केडगावकर, हौसाबाई काळे पिंपळवंडीकर या अनुभवी स्त्री कलावंतांसह तसेच वैद्यमास्तर उजगावकर, सोपानराव पांगारकर, पुंडलिक देहरेकर, कोंडीबा टोणपे मराठवाडीकर, सैदोबा नायगावकर हलगीवाले घाडगे अशा बहुगुणी तमाशा कलावंतांची साथ त्यांना लाभली.

वगनाट्ये आणि सोंगाडपण ही दत्तोबा तांबे यांच्या तमाशाची बलस्थाने होती. गोकुळचा चोर अर्थात कंसवध, पृथ्वीराज चौहान, सीताहरण, अहिल्या उद्धार ही दत्तोबा तांबे यांच्या तमाशातील वगनाट्ये अतिशय लोकप्रिय होती. झाशीची राणी हे वैद्यमास्तर लिखित वगनाट्य खूपच गाजले. गोकुळचा चोर मधील पेंद्याची भूमिका दत्तोबांनी लोकप्रिय केली. आपल्या तमाशाचा तंबू आकर्षक असावा असा दत्तोबांचा आग्रह होता त्यासाठी त्यांनी वडगाव पान येथील मोरे सर्कसवाले यांचा सल्ला घेतला. मोरे सर्कसवाले यांनी त्यांना तमाशाचा भव्य तंबू बनवून दिला. तमाशाचा तंबू आणि टाटा कंपनीची पॅसेंजर गाडी हे दत्तोबा तांबे तमाशा फडाचे आणखी एक आकर्षण होते. एकेकाळी तमाशा कलावंत बैलगाडीतून फिरत. हिला, टेम्ब्यांच्या (मशाल) प्रकाशात प्रयोग करीत त्यात दत्तोबांनी बदल घडविले. तमाशा रसिक आणि अन्य तमाशा कलावंत त्यांना आदराने दादा म्हणत.

दत्तोबा केवळ तमाशा कलावंत नव्हते तर सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यकर्ते, नेते होते. ते शिरोली भूषण ठरले. जुन्नर तालुका पंचायत समितीच्या सदस्यपदी निवडून आले. बोरी गावच्या सरपंचपदी दत्तोबा आणि उपसरपंचपदी त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई असा त्यांचा गौरव बोरीच्या ग्रामस्थांनी केला. दत्तोबा तांबे यांच्या तमाशा फडाने पंधरा दिवस नेफा आघाडीवर जाऊन भारतीय सैन्याचे मनोरंजन केले. त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रपती भवनाने घेऊन त्यांना राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले. दत्तोबांनी शाळा, महाविद्यालये, मंदिरे यासाठी आपल्या तमाशा फडाच्या माध्यमातून अनेक गावांना आर्थिक मदत प्राप्त करून दिली. १९८० मध्ये बीड – औरंगाबाद मार्गावर त्यांच्या तमाशाच्या गाडीला मोठा अपघात झाला त्यात त्यांच्या हात, पाय, कंबरेला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर अल्पावधीतच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र कैलास, विलास, विनायक, नंदकुमार यांनी त्यांच्या तमाशाची परंपरा सुरु ठेवली. दत्तोबांचे चिरंजीव विलास, विनायक यांचेही निधन झाले. सन २००४ पासून दत्तोबा तांबे तमाशा फडाची परंपरा खंडित झाली.

संदर्भ : क्षेत्र संशोधन