बडे, हरिभाऊ : (१५ ऑगस्ट १९३५). महाराष्ट्रातील परंपरेने तमाशाफड चालवणारे फडमालक, तमाशा दिग्दर्शक, लेखक आणि तमाशा कलावंत. हरिभाऊ यांचे आजोबा गणपत बडे आणि वडील दशरथ बडे हे उत्तम तमाशा कलावंत होते. त्यांचा छोटा तमाशाफड होता. गणपतराव आणि दशरथराव या दोघांना तमाशा कलेतील नैपुण्य लाभले होते. हिरामण हे हरिभाऊ यांचे धाकटे बंधू होत. हिरामण यांनीही तमाशाकलेत सोंगाड्या म्हणून नावलौकिक मिळविला आहे. हरिभाऊ यांचा जन्म चिंचपूर (जि.अहमदनगर,ता. पाथर्डी) या गावी झाला. वडिलांचा स्वतःचा तमाशाफड असला तरी, निश्चित अशी बिदागी (मानधन) मिळत नसल्याने त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती. गावचे पाटील किंवा इतर पुढारी देतील त्या बिदागीवर तमाशाचे कार्यक्रम व्हायचे. कधी बैलगाडीत तर कधी पायीपायी जाऊन, चावडीवर टेंभ्याच्या उजेडात गावोगाव परवानगीने तमाशा सादर केला जायचा. तमाशा कलावंताकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोण काहीसा तुच्छतेचा असतो याचा अनुभव दशरथ बडे यांना येत असे. या काळात वडिलांनी हरिभाऊला  डमाळवाडी या गावी आजोबांकडे ठेवले. आजोबा मारुती डमाळे यांचाही छोटासा तमाशाफड होता. या दोन्ही कुटुंबातल्या तमाशाकलेचे संस्कार हरिभाऊंवर लहानपणापासून होत गेले. वडिलांचा आणि आजोबांचा तमाशा बघता बघता त्यांनी त्यातले अनेक बारकावे शिकून घेतले आणि वयाच्या अकराव्या वर्षी तमाशात काम करायला सुरुवात केली.

आयुष्यात बराच संघर्ष केल्यानंतर बडे कुटुंब पाथर्डी तालुक्यातल्या कोरडगाव या छोट्याशा खेड्यात स्थायिक झाले. दरम्यानच्या काळात त्यांना अहमदनगरला आश्रय घ्यावा लागला. तिथे कुणीही परिचित नसल्याने एका झाडाखाली त्यांनी मुक्काम केला. पण लोकांनी झाडाखालून हाकलून दिल्यावर अहमदनगरच्या बसस्थानकात काही महिने त्यांनी वास्तव्य केले. तिथे कलारसिक असलेल्या एका सफाई कामगाराला हरिभाऊंच्या कलेची महती जाणवली आणि त्याने त्यांना स्वत:च्या घरी नेले. आपल्या अहमदनगरच्या अल्पशा वास्तव्याची आठवण म्हणून त्यांनी आपल्या नावापुढे नगरकर हे आडनाव लावायला सुरुवात केली. शालेय शिक्षण झाले नसले तरी उपजत जिज्ञासूवृत्तीमुळे त्यांनी अक्षरओळख करून घेतली होती. समाजात काय सुरु आहे याचे बारकाईने निरीक्षण करण्याची, मोठी माणसे काय बोलतात हे काळजीपूर्वक ऐकण्याची त्यांना सवय होती. पुढे ते महात्मा गांधींचे चाहते बनले. गांधीहत्येनंतर व्यथित झालेल्या तेरा चौदा वर्ष वयाच्या हरिभाऊंनी तमाशात महात्मा गांधीजींच्या कर्तृत्वाचे गुणगान करणारी कवणे रचून ती स्वतः गायली. देशाला नुकतेच स्वातंत्र्य मिळालेले होते. अशा भारावलेल्या काळात तमाशा रसिकांनी त्यांच्या कवनांना चांगली दाद दिली.

हरिभाऊंचे वैशिष्ट्य म्हणजे ते उत्तम कवी व गायक तर होतेच पण ते उत्तम अभिनेते, वादक, दिग्दर्शक आणि लेखक होते. ते उत्तम भजने म्हणायचे. त्यांची अनेक वगनाट्ये त्याकाळात सर्वदूर गाजली. त्यांच्या वगांची वैशिष्ट्ये म्हणजे कलाकरांच्या सादरीकरणाबरोबरच त्यातल्या म्हणण्या आणि कवणे होत. ही कवणे ऐकताना प्रेक्षक भान हरपून जायचे. त्यांनी ऐतिहासिक, धार्मिक वगनाट्यांबरोबरच सामाजिक आणि प्रासंगिक
विषयावरही वग सादर केले. जय भवानी, पंढरीचा पांडुरंग, राजा हरिश्चंद्र अशा वगांबरोबरच त्यांचे डाकू फुलन, पापाआधी भरला घडा, मुंबईची गोल्डन गँग, वनराज केसरी हे वग गाजले.

हरिभाऊंनी तब्बल सात दशके तमाशाच्या रंगमंचावर काम केले. तमाशा सृष्टीतील अस्थिरतेचे आघात त्यांच्या आयुष्यात अनेकदा आले; परंतु त्यातूनही ते वारंवार जिद्दीने उभे राहिले. २०१५ मध्ये पक्षाघाताच्या आजारामुळे त्यांच्यावर शारीरिक बंधने आली त्यामुळे त्यांनी तमाशात काम करणे सोडले होते. मात्र तोवर त्यांच्या पुढच्या पिढ्या तमाशात आल्या होत्या. हरिभाऊ तमाशा क्षेत्रातल्या जीवघेण्या स्पर्धेत कधीही उतरले नाहीत. त्यांनी कधी इतर तमाशा फडांशी किंवा फड मालकांशी स्पर्धा केली नाही. त्यांच्या तमाशासृष्टीतील कारकिर्दीचा गौरव म्हणून त्यांना तमाशा क्षेत्रातील योगदानासाठी असलेला महाराष्ट्र शासनाचा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

कोरडगाव तालुका पाथर्डी येथे वृद्धापकाळामुळे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : क्षेत्रसंशोधन