डार्विन, चार्ल्स : (१२ फेब्रुवारी १८०९ – १९ एप्रिल १८८२ ) इंग्लंडच्या श्रुसबरी येथे चार्ल्स यांचा जन्म झाला. त्यांनी शालेय शिक्षण आपल्याच गावात घेतले. औपचारिक शिक्षणात त्यांनी फार उत्साह दाखवला नाही. जंगलात फिरायला जाणे, फुलपाखरांचे निरीक्षण करणे, दगड गोळा करणे अशा कामात त्यांना आनंद वाटत असे. इतर पालकांप्रमाणेच आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या वडलांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी चार्ल्सला एडिनबर्गला पाठविले. परंतु वैद्यकीय शिक्षणात त्यांचे लक्ष लागले नाही. वैद्यकीय महाविद्यालयापेक्षा त्यांना शहरातील संग्रहालय जास्त आवडत असे. हे लक्षात येताच त्यांच्या वडलांनी त्यांना तेथून परत बोलावले आणि केंब्रिज विद्यापीठातील क्राइस्टचर्च कॉलेजमध्ये दाखल केले. महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच इतर अनेक बाबींमध्ये ते लक्ष घालत असत. जॉन स्टिवन्स हन्स्लो यांचेकडून वनस्पतीचे संरक्षण कसे करावे याचे धडे त्यांनी घेतले. तसेच ॲडम स्मिथ यांचेकडून वेगवेगळ्या दगडांची माहिती त्यांनी करून घेतली. फुलपाखरांचा संग्रह करण्याचे काम त्यांनी सुरूच ठेवले.

एकोणिसाव्या शतकात समुद्र आणि समुद्रकिनारे यांचा अभ्यास करण्यासाठी यूरोपियन देश मोहिमा आखत असत. अशाच एका मोहिमेवर इंग्लंडने १८२८ मध्ये ‘बिगल’ नावाचे एक जहाज पाठविले होते. ती मोहीम पूर्ण होऊ शकली नाही. म्हणून १९३१ मध्ये रॉबर्ट फिट्झरॉय यांच्या नेतृत्वाखाली दुसरी बिगल मोहीम आखण्यात आली. आपल्या चमूत एखादा निसर्ग निरीक्षक असावा अशी कॅप्टन फिट्झरॉय यांची इच्छा होती. त्यांचे मित्र जॉन हन्स्लो यांनी या कामासाठी २२ वर्षाच्या चार्ल्स यांचे नाव सुचविले. २७ डिसेंबर १९३१ रोजी प्लायमाऊथ या बंदरातून ‘बीगल’ जहाजाचे प्रस्थान झाले. ही मोहीम ५ वर्षे चालली. २ ऑक्टोबर १९३६ रोजी बीगल जहाज इंग्लंडच्या फालमथ बंदरात परत आले.

आपल्या पाच वर्षांच्या प्रवासात बीगलने एक पूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा केली. आपल्या प्रवासात ते वेगवेगळ्या बेटावर थांबत असे. या संधीचा उपयोग करून चार्ल्सनी निसर्गाचे बारकाईने निरीक्षण केले. आपल्या बारीकसारीक निरीक्षणाची ते नोंद ठेवत असत. ते परत आले तेव्हा त्यांच्या नोंदवहीची एकूण १७५० पाने भरली होती. याखेरीज अनेक ठिकाणाहून त्यांनी वनस्पती, प्राण्यांचे अवशेष आणि दगड गोळा केले. ते जेव्हा इंग्लंडला परत आले तेव्हा त्यांच्याजवळ या वस्तूंचा मोठा संग्रह होता.

बीगल जहाजावरील पाच वर्षांच्या वास्तव्याने चार्ल्स यांच्या जीवनाला पूर्णपणे कलाटणी दिली. या प्रवासात निसर्गाची अनेक गुपिते त्यांनी स्वत:च्या डोळ्याने पाहिली होती. या निरीक्षणांमध्ये सुसूत्रता आणणे आवश्यक होते. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य याच कामी खर्च केले. बीगल मोहीमेवरून परत आले तेव्हा ते लंडन शहरात राहात होते. लंडनपासून जवळच डाऊन हाऊस नावाच्या इमारतीत चार्ल्स रहात, ती इमारत आता राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन केलेली आहे.

चार्ल्स यांनी डोळे उघडे ठेवून जी निरीक्षणे केली त्यावरून त्यांच्या असे लक्षात आले की, सजीव सृष्टी आज ज्या स्वरूपात आपल्याला दिसते त्या स्वरूपात निर्माण झालेली नाही. पृथ्वीवर आधी अप्रगत अशी सजीव सृष्टी होती. तिच्यात क्रमाक्रमाने बदल होत जाऊन आजचे स्वरूप प्राप्त झाले आहे असे त्यांचे मत बनले. त्यांचे हे मत प्रचलित धार्मिक मताला छेद देणारे होते. त्यामुळे ते समाजात स्वीकारले जाणार नाही याची त्यांना भीती वाटत होती. म्हणून त्यांनी आपला उत्क्रांतीवादाचा सिद्धांत जगापुढे मांडायला तब्बल २३ वर्षे घेतली. १८५९ साली त्यांनी आपले ‘दि ओरिजीन ऑफ स्पिशीज्’ हे पुस्तक प्रकाशित केले. मधल्या काळात जीवशास्त्रावर विपुल लेखन करून त्यांनी आपले नाव विज्ञान जगतात प्रस्थापित केले. त्याचबरोबर आपल्या म्हणण्याला दुजोरा देण्यासाठी काही प्रयोगही केले.

सन १८५० च्या दशकात विज्ञानात चांगलीच प्रगती झाली होती. प्रयोगाच्या कसोटीवर आधारलेले निष्कर्ष मान्य करण्याची एक प्रवृत्ती यूरोपात निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर डार्विनच्या क्रांतीकारी सिद्धांताला विज्ञान जगतात स्वीकृती मिळू लागली. काही वर्षांतच डार्विन यांचे नाव जगभर प्रसिद्ध झाले.‌

रॉयल सोसायटीने कोपले मेडल देऊन त्यांचा सत्कार केला.

त्यांच्या मृत्यूपश्चात सरकारी इतमानाने लंडनच्या वेस्टमिन्स्टर ॲबे येथे त्यांचे दफन झाले .

संदर्भ :

  • Encyclopedia Britannica

समीक्षक : मोहन मद्वाण्णा