कॅम्बल, रॉबर्ट (Campbell, Robert) : (२१ फेब्रुवारी १८०८ – ९ मे १८९४). कॅनडियन समन्वेषक, फरचा व्यापारी आणि शेतकरी. त्यांचा जन्म स्कॉटलंडमधील ग्लेन लायन/पर्थशर येथे झाला. त्यांना उत्तर अमेरिकेतील सरहद्द प्रदेशात काम करण्यात विशेष रस होता. इ. स. १८३० मध्ये म्हणजे वयाच्या बावीसाव्या वर्षीच हडसन्स बे कंपनीच्या उत्तर अमेरिकेतील रेड रिव्हर या शाखेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली; परंतु त्यांना येथील काम अपेक्षेपेक्षा खूपच कमी आव्हानात्मक वाटले. त्यामुळे त्यांनी आपली फर व्यापारात बदली करण्याची मागणी केली. इ. स. १८३४ मध्ये त्यांना मॅकेंझी नदीच्या खोऱ्यातील प्रदेशात व्यापारी ठाणे स्थापन करण्यासाठी पाठविले. इ. स. १८५२ पर्यंत ते तेथे होते; परंतु व्यापारी ठाणे स्थापण्यास अनुकूल परिस्थिती न मिळाल्यामुळे त्यात त्यांना अपयश आले. त्या प्रदेशात असताना इ. स. १८४० मध्ये त्यांनी पेली नदीचा शोध लावला. त्यानंतर इ. स. १८४३ मध्ये या नदी खोऱ्यातूनच त्यांनी पेली आणि लूअस (अपर यूकॉन) या दोन नद्यांच्या संगमापर्यंतचा प्रवास केला. या दोन नद्यांच्या संगमापासूनचा पुढील संयुक्त प्रवाह यूकॉन नदी या नावाने ओळखला जातो. या संगमस्थानाजवळील फोर्ट सेलकर्क येथे इ. स. १८४८ मध्ये व्यापारी ठाण्याची स्थापना केली. त्यानंतर इ. स. १८५०-५१ मध्ये यूकॉन नदीखोऱ्यातूनच फोर्ट यूकॉन येथील यूकॉन-पॉर्क्यपाइन या नद्यांच्या संगमापर्यंतचा प्रवास केला. अनेक वर्षे दक्षिण यूकॉनमध्ये समन्वेषक आणि फरचा व्यापारी म्हणून कार्यरत राहिल्यामुळे त्यांना ‘यूकॉनचा कॅम्बल’ या टोपणनावानेही ओळखले जाते.
कंपनीचा कारभार पाहत असताना त्यांनी स्थापन केलेली सर्वच व्यापारी ठाणी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर न ठरल्यामुळे काही वर्षांतच बंद करावी लागली होती. हडसन्स बे कंपनीचे गव्हर्नर (प्रशासक) व समन्वेषक सर जॉर्ज सिम्प्सन यांनी अनेकदा कॅम्बल यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी कॅम्बल यांना काही दिवस सक्तीच्या रजेवर इंग्लंडला पाठविले होते. त्या वेळी इ. स. १८५४ मध्ये ते इंग्लंडहून पुन्हा उत्तर अमेरिकेला परतले होते. तेव्हा त्यांना मॅकेंझी नदीच्या खोऱ्यातील फोर्ट लीअर्ड येथे पाठविले होते. हडसन्स बे कंपनीचे काम पाहत असताना त्यांनी कॅनडातील यूकॉन टेरिटरीच्या दक्षिण भागाचे तसेच ब्रिटिश कोलंबिया प्रांताच्या उत्तर भागाचे मोठ्या प्रमाणावर समन्वेषण केले. प्रसिद्ध समन्वेषक म्हणून नाव कमाविण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती; परंतु त्यांना त्यात यश आले नाही.
कॅम्बल यांनी इ. स. १८७१ पर्यंत हडसन्स बे कंपनीचा व्यापारी म्हणून काम केले. त्यानंतर ते त्या कंपनीतून बाहेर पडले. निवृत्तीनंतर मॅनिटोबामध्ये एक पशुपालक शेतकरी म्हणून आपले आयुष्य व्यतित केले. तेथेच त्यांचे निधन झाले. दी डिस्कव्हरी अँड एक्स्प्लोरेशन ऑफ दी पेली रिव्हर (१८८३) हे त्यांनी लिहिलेले पुस्तक होय.
समीक्षक : नामदेव स. गाडे