फॅन, जियानक्विन्ग : (१९६२ -) फॅन यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथून संख्याशास्त्रात पीएच्.डी. प्राप्त केली. १९८९ ते २००३ नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठ, चॅपेल हिल (North Carolina University, Chapel Hill) येथे सहाय्यक, सह व पूर्ण प्राध्यापक आणि १९९७ ते २००० मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजेलिस येथे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. २०००-०३ मध्ये फॅन हे हाँगकाँग येथील चिनी विद्यापीठात संख्याशास्त्राचे प्राध्यापक व विभाग प्रमुख होते, तर २००३ पासून प्रिन्स्टन विद्यापीठात प्राध्यापक आणि २००६ पासून तिथे ते फ्रेडरिक लमूर’१८ वित्तीय प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत.

जियान क्विन्ग यांचे संशोधन संख्याशास्त्रीय पद्धती, वित्तीय अभियांत्रिकी, उच्च मितीय आधारसामग्री, जैवसंख्याशास्त्र, आणि संगणनक्षम जीवविज्ञान (Computational Biology) या विषयांत असून फॅन यांचे स्वतंत्र आणि सहलेखित असे २००हून अधिक शोधलेख ख्यातनाम जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत. ज्यांचे लेख इतर संशोधक संदर्भ म्हणून आपल्या लेखांत देतात अशा जगातील पहिल्या दहा लेखकांत फॅन यांचा समावेश मागील काही वर्षे सतत होत आहे हे विशेष.

फॅन यांची गाजलेली पुस्तके पुढील प्रमाणे आहेत : Local Polynomial Modelling and its Applications, Nonlinear Time Series: Nonparametric and Parametric Methods आणि The Elements of Financial Econometrics. याशिवाय फॅन यांनी चार पुस्तके सहसंपादीत केली असून इतर लेखकांच्या पुस्तकातही त्यांनी महत्त्वाची प्रकरणे लिहीली आहेत. तसेच फॅन यांनी पुढील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या जर्नल्ससाठी संपादकीय योगदान दिले आहे : जर्नल ऑफ इकनॉमेट्रिक्स, जर्नल ऑफ अमेरिकन स्टॅटिस्टीकल ॲसोसिएशन इन चायना आणि जर्नल ऑफ कोरियन स्टॅटिस्टीकल सोसायटी.

जगातील अनेक नामवंत संस्था आणि विद्यापीठांशी फॅन वैज्ञानिक सल्लागार म्हणून संलग्न आहेत. उदा., अर्थशास्त्रीय संस्था (Institute of Economics), ॲकेडेमिया सिनिका (Academia Sinica), गणित विज्ञानसंस्था (Institute of Mathematical Sciences), सिंगापूर राष्ट्रीय विद्यापीठ, पेकिंग विद्यापीठ, आणि हंबोल्ड्ट विद्यापीठ.

फॅन यांना कॉप्स्स अध्यक्षीय पारितोषिक, जीवनगौरव हंबोल्ड्ट संशोधन पारितोषिक, मॉर्निंगसाइड उपयोजित गणितातील सुवर्णपदक, पओ-लु-ह्स्यु पारितोषिक आणि गाय रौप्यपदक असे प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेले आहेत.

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर