केंद्रीय स्वरूपाच्या ज्वालामुखी उद्रेकामुळे, ज्वालामुखीच्या माथ्यावरील निर्गमद्वाराशी (मुखाशी) खोलगट बशीसारखा खळगा तयार झालेला दिसतो. असा खळगा लहान म्हणजे साधारणपणे एक किमी. पेक्षा कमी व्यासाचा असल्यास त्याला ‘ज्वालामुखी कुंड’ म्हणतात आणि जर तो साधारणपणे एक किमी. पेक्षा जास्त व्यासाचा असेल, तर त्यास ज्वालामुखी महाकुंड किंवा कटाह किंवा काहील म्हणून ओळखले जाते. अनेकदा कुंड आणि महाकुंड या दोन संज्ञा एकाच अर्थाने वापरल्या जातात; परंतु महाकुंड हे कुंडाचे विस्तारित रूप आहे. कुंड आणि महाकुंड यांच्या निर्मितीची प्रक्रिया वेगवेगळी असते. उद्रेकाच्या वेळी माथ्याचा भाग स्फोटक उद्रेकाने उडून गेल्यामुळे किंवा ज्वालामुखी निर्गम द्वारातून शिलारस, खडक आणि इतर ज्वालामुखी पदार्थ बाहेर फेकले जाण्याने कुंडाची निर्मिती होते. याउलट, ज्वालामुखीच्या शिलारस कोठीत निर्माण झालेल्या पोकळीत माथ्याचा भाग कोसळून महाकुंडाची निर्मिती होते. कुंडापेक्षा महाकुंड हा फार मोठा भूविशेष असल्यामुळे त्याला ‘महाकुंड’ असे म्हणतात. शंकूच्या मुख्य माथ्याप्रमाणेच त्या शंकूच्या बाजूने असणाऱ्या उपशंकूंवरही कुंड असल्याचे दिसते. निर्मितीनुसार ज्वालामुखी कुंडांचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आढळतात.
ज्वालामुखी क्रियेतून निर्माण झालेल्या कुंडांपैकी काही कुंड खोल असतात व त्यांचे काठ कड्यांसारखे एकदम तीव्र स्वरूपाचे असतात; तर काही कुंड रुंद व उथळ असतात. अनेक ज्वालामुखी कुंडे सामान्यपणे शंक्वाकार टेकडीच्या माथ्यावर, ज्वालामुखी निर्गम द्वाराच्या भोवती निर्माण झालेली आढळतात. ज्वालामुखीच्या माथ्यावर आढळणाऱ्या कुंडांना शंकू-कुंड असे म्हटले जाते. अशा कुंडांमध्ये ज्वालामुखी पदार्थ शिखरावर किंवा शिखराजवळ आढळतात. काही ज्वालामुखींमध्ये लाव्हा नेहमी मधल्या एकाच नळीतून बाहेर येतो. त्यामुळे तेथे एकच शंकू-कुंड असते. उदा., जपानमधील फूजियामा. याउलट, काही ज्वालामुखींमध्ये मधल्या एकाच नळीतून लाव्हा व लाव्हाजन्य पदार्थ बाहेर न येता मुख्य शंकूच्या उताराच्या बाजूवरील उपशंकूंवरील निर्गम द्वारांतून ते बाहेर येतात. त्यामुळे तेथे एकापेक्षा अधिक उपशंकू-कुंडे निर्माण झालेली आढळतात. त्यांना बाह्य शंकू-कुंडे असे म्हणतात. उदा., जगातील सर्वाधिक जागृत ज्वालामुखींपैकी एक असलेल्या इटलीतील एटना या ज्वालामुखीच्या बाजूवर अशी २०० हून अधिक उपद्वारे व उपशंकू-कुंडे आहेत. मुख्य शंकू-कुंडापेक्षा अशा बाह्य कुंडांमधून जे उद्रेक होतात, ते फार धोकादायक असतात. असे बाह्य शंकू- कुंड टेकडीवरील मुख्य कुंडापेक्षा कमी उंचीवर, टेकडीलगतच्या नगरांजवळ निर्माण होतात. बाह्य शंकू-कुंडांमधून उद्रेकाच्या वेळी बाहेर पडणारा लाव्हा व लाव्हाजन्य पदार्थ उतारावरून खाली वाहत जातात. या आविष्काराला ‘अग्निदलिक प्रवाह’ असे म्हणतात. एटना या ज्वालामुखी कुंडातून वारंवार धोकादायक उद्रेक होत असतात. इ. स. १९२८ मध्ये मुख्य कुंडाबरोबरच अशा बाह्य शंकू-कुंडांमधून झालेल्या उद्रेकात संपूर्ण मस्काली गावाचा विध्वंस झाला होता.
काही ज्वालामुखी पुरेसे शांत असतात. अशा ठिकाणी शिखरावरील कुंडाच्या अगदी जवळ जाऊन शास्त्रज्ञ त्यांचे निरीक्षण करू शकतात. उदा., अंटार्क्टिका खंडावरील मौंट एरेबस या ज्वालामुखी शिखरावरील कुंडात जेथे शिलारसाचे बुडबुडे भूपृष्ठावर येतात, तेथे लाव्हारसाचे सरोवर आहे. ज्वालामुखीवैज्ञानिक मौंट एरेबस शिखरावरील कुंडापर्यंत जाऊन त्याची पाहणी करू शकतात. त्यामुळे त्या लाव्हा सरोवराचा सद्यस्थितीचा अभ्यास करून भविष्यातील स्थितीचा अंदाज बांधता येतो.
काही शंकू-कुंडांमध्ये ज्वालामुखी पदार्थ पृष्ठभागालगत असले, तरी ते स्पष्टपणे दिसत नाहीत. उदा., फुजियामा हा जागृत ज्वालामुखी असून त्यातील शिलारस आणि वायू हे शंकू-कुंडाच्या खालीच स्थित असतात. त्याच्या उद्रेकाचा धोका कमी असतो. फुजियामा हा जपानमधील सर्वोच्च पर्वत असून देशातील पायरपेटीसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. काही ज्वालामुखींच्या बाबतीत लहान किंवा अस्फोटक उद्रेकांमुळे नव्याने वर आलेल्या ज्वालामुखी पदार्थांपासून तेथील कुंड भरते. उदा., अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी वॉशिंग्टन राज्यातील सेंट हेलन्झ ज्वालामुखीच्या इ. स. १९८० मध्ये झालेल्या उद्रेकात, त्या शिखराच्या माथ्याचा ४०० मीटर परिसराचा भाग फोडून एक मोठे कुंड निर्माण झाले होते. त्यानंतर सुरू झालेल्या लहानलहान उद्रेकांद्वारे बाहेर पडलेला लाव्हा आणि राख त्या कुंडात साचत जाऊन हळूहळू त्या शिखराचा माथा मूळ स्थितीत आला.
ज्वालामुखी क्रियेत जेव्हा शिलारस भूमिगत पाण्याच्या संपर्कात येतो, तेव्हाही कुंड निर्माण होते. ज्वालामुखीच्या अंतर्गत भागात जेव्हा शिलारस प्रवाही असतो किंवा तेथे बुडबुडे उसळतात, तेव्हा त्यांचा तेथील भूजलाशी संपर्क येतो. असे घडते तेव्हा तेथे लहान उद्रेक होऊन मुख्य निर्गम द्वाराभोवती कुंडाची निर्मिती होते. अशा प्रकारच्या ज्वालामुखी कुंडाला ‘मार’ असे संबोधले जाते. सामान्यपणे अशा मार कुंडांमध्ये पाणी साचून तेथे उथळ सरोवर निर्माण होते. अशा सरोवरांचे पातळ भूस्तर प्रत्यक्षात ज्वालामुखी निर्गमद्वाराचे छप्पर असते. त्यानंतर पुन्हा तेथील अंतर्भागातील शिलारसाचा भूजलाशी संपर्क येतो. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी अलास्का राज्यातील ‘सूअर्ड पेनिन्स्यूला’ या द्वीपकल्पावर असे मार्स आढळतात; परंतु तेथील शिलारसाचा भूजलाऐवजी कायमस्वरूपी गोठलेल्या पाण्याशी संपर्क येतो. शिलारसाचा पाण्याशी संपर्क आल्यामुळे निर्माण झालेल्या वाफेच्या प्रचंड दाबामुळे उद्रेक होऊन मोठ्या प्रमाणावर वाफ, पाणी, राख आणि वितळलेल्या खडकाची राशी वेगाने बाहेर फेकली जाते. अशा उद्रेकाला वाफेच्या स्फोटामुळे झालेले उद्रेक किंवा ‘फ्रियाटिक उद्रेक’ असे म्हणतात. सेंट हेलन्झ येथे आजपर्यंत असे वाफेचे शेकडो विस्फोट झालेले आहेत. यामध्ये जलसंपृक्त खडकांच्या भागातून शिलारस वर ढकलला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाफेची निर्मिती होते. त्या वाफेच्या प्रचंड दाबामुळे खडक वरच्या बाजूला जोराने रेटला जाऊन तेथे खळगा, म्हणजेच ज्वालामुखी कुंड निर्माण होते. अशी कुंडे इतर कोणत्याही प्रत्यक्ष दिसणाऱ्या ज्वालामुखीपासून दूर किंवा मैदानात निर्माण होत असल्यामुळे त्यांचा शोध घेणे कठीण असते. जगातील अनेक ज्वालामुखी कुंडांच्या परिसरात प्रसिद्ध राष्ट्रीय उद्याने आहेत. बरीचशी कुंडे पर्यटकांची प्रमुख आवडती पर्यटनस्थळे बनली आहेत.
जगातील काही प्रसिद्ध ज्वालामुखी कुंडे पुढीलप्रमाणे आहेत : (१) केरिड (आइसलँड), (२) मौंट कॅटमाई (अलास्का, अ. सं. सं.), (३) कोको क्रेटर (ओआहू, हवाई), (४) ताल (लूझॉन बेट, फिलिपीन्स), (५) सांता आना किंवा इझॅल्को (एल् साल्वादोर), (६) रानो कान (ईस्टर बेट, चिली), (७) क्रेटर सरोवर (ऑरेगन, अ. सं. सं.), (८) ओकामा (होन्शू, जपान), (९) हाला (चेजू बेट, दक्षिण कोरिया), (१०) ब्रोमो (जावा, इंडोनेशिया) इत्यादी.
समीक्षक : श्रीनिवास वडगबाळकर