अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी पॅसिफिक किनाऱ्यावरील ऑरेगन राज्यातील एक सरोवर. पृथ्वीवरील सर्वांत प्राचीन सरोवर म्हणून या सरोवरास मान्यता आहे. इतिहासपूर्व काळात येथील कॅस्केड पर्वतश्रेणीत स.स.पासून ३,६५० मी. उंचीचा मझामा हा ज्वालामुखी पर्वत होता. हा ज्वालामुखी मृत होता. या पर्वताच्या हिमाच्छादित उतारांवरून हिमनद्या वाहत असत. सुमारे ७,००० वर्षांपूर्वी झालेल्या प्रचंड ज्वालामुखी उद्रेकांच्या वेळी ज्वालामुखी निर्गम द्वाराच्या सभोवतालचा ज्वालामुखी शंकू ढासळून नष्ट झाला आणि त्या ठिकाणी विस्तृत आकाराचे ज्वालामुखी महाकुंड (काहील) निर्माण झाले. त्यात शेकडो वर्षे पाणी साचून या सरोवराची निर्मिती झाली. त्यानंतर या महाकुंडात दोन छोट्या खंगारक शंकूमधून काही उद्रेक झाले. उद्रेकाच्या वेळी बाहेर पडलेल्या ज्वालामुखी द्रव्यामधून या सरोवरातील विझर्ड आणि फॅटम शिप या दोन बेटांची निर्मिती झाली आहे. विझर्ड बेट सरोवराच्या पश्चिम भागातील किनाऱ्याजवळ असून फॅटम शिप बेट म्हणजे नैसर्गिक पाषाणाचा उभा स्तंभ आहे. स. स. पासून १,९०० मीटर उंचीवर असलेल्या क्रेटर सरोवराची कमाल खोली ५९२ मी. आहे. हे संयुक्त संस्थानांतील सर्वांत खोल, तर उत्तर अमेरिकेतील ग्रेट स्लेव्ह सरोवर (Great Slave Lake)नंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे खोल सरोवर आहे. सरोवराचा आकार गोलाकार आहे. या महाकुंडाचा परीघ ४२ किमी. व व्यास १० किमी. असून सरोवराचे क्षेत्रफळ ५२ चौ. किमी. आहे. हे सरोवर १५० ते ६०० मी. उंचीच्या विविधरंगी उभ्या खडकांनी वेढलेले आहे. सरोवराला बाहेरून मिळणारा किंवा त्यातून बाहेर पडणारा एकही प्रवाह नाही. परिसरातील पर्जन्यवृष्टी व हिमवृष्टी यांपासून सरोवराला पाणीपुरवठा होत असून जलपातळी सामान्यपणे स्थिर राहते. पाण्यात कोणतीही प्रदूषके मिसळत नसल्यामुळे पाणी शुद्ध आहे. नितळ, निळ्या व स्वच्छ पाण्यासाठी हे सरोवर प्रसिद्ध आहे.

मौल्यवान धातूंच्या खाणींचा शोध घेणारा जॉन वेस्ली हिलमन या अनिवासी अमेरिकन व्यक्तीने जून १८५३ मध्ये क्रेटर सरोवराचा शोध लावला. त्याने या सरोवराला ‘डीप ब्लू लेक’ (खोल निळे सरोवर) असे नाव दिले. त्यानंतर पुढे ते मॅजेस्टी नावाने आणि आता ते क्रेटर नावाने ओळखले जाऊ लागले. क्लॅमथ इंडियन लोक या सरोवरातील पाणी आरोग्यवर्धक असल्याचे मानत. १८८५ मध्ये विल्यम ग्लॅडस्टोन स्टील क्रेटर सरोवर पाहण्यासाठी गेला होता. त्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष थीओडर रूझवेल्ट (Theodore Roosevelt) यांनी २२ मे १९०२ रोजी सरोवराच्या सभोवतालचा सु. ६५० चौ. किमी.च्या प्रदेशास अमेरिकेतील सहावे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले. त्यामध्ये समृद्ध पशू, पक्षी आणि वनस्पतिजीवन आढळते. येथे पाईन, फर, हेमलॉक इत्यादी वृक्षांचे आधिक्य आहे. उन्हाळ्यात कुरणांच्या प्रदेशात पुष्कळ फुलझाडे व रानफुले दिसतात. राष्ट्रीय उद्यानात हरिण, अस्वल, गरुड, शिकरा, घुबड इत्यादी प्राणी व पक्षी आहेत. विशेषत: उन्हाळ्यात गाणारे आणि कीटकभक्षी गणातील पक्षी येथे मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात. सरोवरात मूळ मत्स्यजीवन नव्हते; परंतु त्याच्यात मर्यादित प्रमाणात मत्स्यपैदास केली जाते. राष्ट्रीय उद्यानात स्पंजाश्म (Pumice) खडकाचे निक्षेप आढळतात. क्रेटर सरोवर आणि निसर्गसुंदर क्रेटर राष्ट्रीय उद्यान ही पर्यटाकांची प्रमुख आकर्षणे आहेत. साधारणत: जुलै ते सप्टेंबर या काळात जास्तीत जास्त पर्यटक येथे येतात. सरोवरातून बोटीच्या साह्याने जलसफर करता येते आणि विझर्ड बेटावरही जाता येते. राष्ट्रीय उद्यानाची पश्चिमेकडील आणि दक्षिणेकडील प्रवेशद्वारे वर्षभर खुली असतात. सरोवराच्या सभोवतालच्या राष्ट्रीय उद्यानातून काढलेल्या रिम ड्राइव्ह या निसर्गसुंदर मार्गाने ५६ किमी.ची रपेट (फेरफटका, सहल) मारता येते. सरोवराच्या आग्नेय काठाजवळ, सरोवरापासून ८४० मी. उंच असलेल्या मौंट स्कॉट या शंकू टेकडीवरून सरोवराचे विहंगम दृश्य अतिशय चांगल्या प्रकारे पाहता येते.

समीक्षक संतोष ग्या. गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा