गोवारीकर, वसंत रणछोडदास : (२५ मार्च १९३३ ते २ जानेवारी २०१५) वसंत गोवारीकर यांचा जन्म पुण्यात झाला. पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी कोल्हापूरमध्ये घेतले आणि पुढच्या शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. बर्मिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी एम.एस्सी. ही पदवी मिळवली. त्याच विद्यापीठात डॉ. एफ. एच. गार्नर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून त्यांनी पीएच्.डी. मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते हार्वेल येथील इंग्लंडच्या अणूऊर्जा संशोधन विभागात काम करू लागले. त्यावेळेस भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांची त्यांच्यावर नजर पडली. गोवारीकरांनी भारतात परत येऊन अंतराळ संशोधन कार्याला हातभार लावावा अशी साराभाई यांची इच्छा होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन गोवारीकर भारतात परत आले.

भारतात आल्यावर गोवारीकरांनी थुंबा येथील अंतराळ संशोधन केंद्रात कामाला सुरुवात केली. त्यावेळेस भारतीय अंतरिक्ष कार्यक्रम अगदीच बाल्यावस्थेत होता. अंतरिक्षात झेप  घेण्यासाठी अनेक क्षेत्रात संशोधन करणे आवश्यक होते. गोवारीकरांनी अग्निबाणात वापरावयाच्या इंधनावर आपले लक्ष केंद्रित केले. थोड्याच अवधीत त्यांना योग्य घन इंधन मिळविण्यात यश आले. त्यांच्या या महत्त्वाच्या कामामुळे भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाला गती मिळाली.

भारतीय अंतरिक्ष आयोगात गोवारीकर यांनी अनेक पदांवर कामे केली. १९७३ ते १९७९ या कालावधीत ते विक्रम साराभाई अंतराळ केंद्र, या संस्थेतील रसायन विभागाचे प्रमुख होते. १९७९ मध्ये ते या केंद्राचे प्रमुख झाले. या पदावर ते १९८५ पर्यंत होते. त्यानंतर पाच वर्षे त्यांनी भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे सचिव म्हणून काम केले. १९९१ ते १९९३ या कालावधीत त्यांनी पंतप्रधानांच्या सल्लागाराची भूमिका बजावली. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू पद स्वीकारले. या प्रत्येक पदावर आपल्या कार्यक्षमतेची आणि बुद्धिमत्तेची छाप त्यांनी सोडली आहे.

भारतातील शेती ही प्रामुख्याने मोसमी वाऱ्यांच्या पावसावर अवलंबून असते. त्यामुळे पावसाचा अचूक अंदाज करणे आवश्यक असते. या कामात गोवारीकरांनी पुढाकार घेतला. मोसमी वाऱ्यांच्या पावसावर प्रभाव टाकणाऱ्या १६ घटकांचा सखोल अभ्यास करून त्यांनी हवामानाचा अंदाज करण्यासाठी एक आराखडा तयार केला. हा आराखडा खूपच यशस्वी ठरला आहे.

शेतीसाठी कोणती खते वापरायची यासाठी त्यांनी बनवलेला खतांचा कोश संपूर्ण जगातला असा पहिला कोश ठरला आणि त्याला आंतरराष्ट्र्रीय प्रसिद्धी लाभली.

विज्ञानाचा समाजात प्रसार व्हावा यासाठी ते प्रयत्नशील असत. ते एक उत्तम वक्ते होते. विज्ञानातील बोजड संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगण्यात त्यांचा हातखंडा होता. मराठी भाषेतून विज्ञान प्रसार करणाऱ्या मराठी विज्ञान परिषदेशी त्यांची जवळीक होती. या संघटनेचे ते १९९४ ते २००० या काळात अध्यक्ष होते.

गोवारीकर यांचा कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना भारतीय खगोल मंडळाच्या वतीने आर्यभट्ट पुरस्कार देण्यात आला होता. भारत सरकारच्या वतीने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे सन्मान देऊन गौरविण्यात आले होते.

पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना मृत्यू आला.

संदर्भ :

समीक्षक : श्रीनिवास केळकर